तो कोणाचा कोण होता माहित नाही पण माझा मात्र बंडूदादाच होता! त्याच्यात माझ्यात सहासात वर्षाचे अंतर होते . तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेल . पण वय कधीच त्याच्या माझ्यात आड आले नाही . मी लहान म्हणून त्याने कधी दुय्यमतेने वागवले नाही कि, तो मोठा म्हणून अंतर ठेवले नाही . तो एक ‘ब्राह्मणाचे अनाथ पोर ‘ हि माहिती नन्तर मिळाली पण ती गौण होती आणि गौणच राहिली . आमच्या घरातहि त्याच्यात माझ्यात कधीच भेदभाव झाला नाही .
कपाळभर अस्ताव्यस्त केस , दाट काळ्याभोर भुवया , त्यातून त्याला पाहायची सवय होती . त्याचे डोळे तपकिरी रंगाचे ,कायम काहीतरी शोधात असणारे ! मला तो रंग खूप आवडायचा .
त्याला सिनेमाचे भयंकर वेड होते . चार दोन महिन्याला एखादा सिनेमा पहायला अण्णा (आमचे वडील ) त्याला पैसे द्यायचे !मला मात्र परवानगी नव्हती . मला आई अण्णा सोबत जावे लागायचे . तो सिनेमा पाहून आला कि ‘ मी तुला स्टोरी सांगतो ‘ म्हणायचा . त्याची स्टोरी सांगणे म्हणजे एक सोहळाच असायचा ! तो कसाही सांगो ,पण त्या काळी माझ्या डोळ्या पुढे सिनेमा उभा राहायचा !
” बंडूदादा ,हिरो कोण होता रे ?”माझी उत्सुकता मला धीर धरू द्यायची नाही .
“हिरो ना ? महिपाल ! एकदम देखणा ! उंच ! गोरापान ! कुरळे केस ! तलवारकट मिशी ! खरं सांगतो सुरश्या , माझे केस कुरळे असते ना तर मी पण तसाच दिसलो असतो ! तुझे थोडे थोडे कुरळे केस आहेत ,तू पण मोठेपणी त्याच्या सारखाच दिसशील बघ ! ” मी मग उगाच अखडायचो !
“मग काय झालं ? हिरोन काय केलं ?”
” हा ,तर हिरो घोड्यावर , खदडक , खदडक ,खदडक, खदडक . घोडा पळतोय ,पळतोय ,कमरेला तलवार लटकतीय –”
“घोड्याच्या ?”
“नाय रे हिरोच्या !”
“मग ?”
“मग ,एकदम घोडा स्टॉप ! घोडा गप्पकन थांबतो ! मागच्या दोन्ही पायावर खडा ,पुढचे दोन्ही पाय छाती जवळ !”
“हिरोच्या ? ”
“नाय रे घोड्याच्या !”
“मग ?”मी मोठाले डोळे करून विचारायचो .
“हिरो घोड्यावरून खाली पडतो ! पण पट्कन उठून तलवार हातात घेऊन उभा रहातो तर काय ?”
“काय ?”
“तर समोर काळाढुस ,मोठाल्या मिशाचा आडदांड राक्षस ! हा हा हा करून हसत कमरेवर हात देऊन उभा असतो !”
“मग ?”
“तुला सांगतो सुरश्या, त्या अक्राळ विक्राळ राक्षसा पुढे आपला हिरो काडी पहिलवानच दिसतो !. पण हिरो तो हिरोच असतोना ?”
” पण पुढे काय ते सांग ना रे !”
” तर हिरो कमरेची तलवार हातात घेतो अन त्या राक्षसाला म्हणतो . भाड्या ये ! तुला चांगलाच इंगा दाखवतो !”
“तो राक्षसाला ‘भाड्या ‘ म्हणतो ?”
” अरे सिनेमात नाही दाखवलं पण मनात तर म्हणतच असेल ना !?”अशी त्याची स्टोरी प्रत्यक्ष सिनेमा पेक्षा ज्यास्त वेळ चालायची !
००००
आपल्याला सगळंच येत अशी समजूत असणारी एक जमात असते . आमचा बंडूदादा त्यातलाच ! एक दिवस टेबलवरील आलारामचे घड्याळ बंद पडले . रोज त्याला किल्ली द्यायचे काम बंडूदादाचेच . बहुदा किल्ली देताना त्या दिवशी जरा ज्यास्त जोर लागला असावा .
“बंडू ,ते घड्याळ समोरच्या घड्याळवाल्या कडे दे . थोडे ऑइलिंग केले कि चालू होईल . मी ऑफिस मधून येताना घेऊन येईन . “अण्णांनी ऑफिसला जाताना सांगितले .
” नको अण्णा, कशाला पैसे वाया घालवता ! मी पहातो उघडून ! जमेल मला !अन नाही जमलं तर देतो घड्याळवाल्या कडे ”
“बंडोबा तुम्ही नका उचापती करू !” अण्णांनी बजावलं. तेव्हा ‘घड्याळ ‘ मोलाची वस्तू होती . पण अण्णाची पाठ वळली कि बंडूदादाची घड्याळ दुरुस्तीची तयारी सुरु झाली . सर्व प्रथम रेडिओ खालचे टेबल मोकळं करण्यात आलं . त्यावरील सगळा पसारा -म्हणजे रेडिओ , पानाचा डब्बा , कंदील , दौत -टाक , अण्णांच्या ऑफिसच्या फाईली घरभर पसरून ठेवण्यात आल्या !. असल्या कामात मी त्याचा असिस्टंट असे !
” हा ,सुरश्या धर टेबल !”दोघांनी मिळून ते जड शीळ टेबल बैठकीच्या खोलीतील खिडकी खाली ठेवलं . कारण तेथे भक्क उजेड येतो ! मग त्यावर अण्णांचे पांढरे धोतर टाकले , कारण घड्याळाचा लहानसा स्क्रू सुद्धा दिसावा ! स्वयंपाक घरातून कडची ,चमचे (स्क्रू ड्रायवरला पारियाय !), पान कुटायचा बत्ता (हातोडी म्हणून )सर्व हत्यारे आली आणि त्या ‘बिमार ‘ घड्याळाचे ऑपरेशन सुरु झाले ! फ्रेम ,त्याखालची काच ,आणि काटे चटकन निघाली . पण आकड्याची चकती निघेना ! दोन्ही पायात घड्याळ धरून बंडूदादाने जोर लावून उचकली तशी भस्सकन एक मजबूत स्प्रिंग त्याच्या नाकासमोर नागासारखी डोलू लागली ! बंडूदादांनी अलगद ते घड्याळ पुन्हा टेबलवर ठेवले .
” सुरश्या या स्प्रिंगला काय म्हणतात माहितंय ?”
” काय ?”मी उत्सुकतेने हे ‘ऑपरेशन ‘ टेबलवर दोन्ही हातात गोबरे गाल टेकून पहात होतो . त्याला असे काही करताना पाहून तेव्हा वाटायचे काय हुशारआहे बंडूदादा ! आपण पण थोडे मोठ झालो कि असेच हुशार व्हायचे !
” याला ‘बालकमान ‘ म्हणतात !”
“म्हंजे ?”
“अरे मी रोज किल्ली देतो तेव्हा हि घट्ट गुंडाळली जाते . मग हळू हळू उलगडत जाते ,त्यावेळी याला लावलेली छोटी छोटी चाके फिरतात अन मग घड्याळाची काटे पण फिरतात !कळलं का ?”
“नाय !”
“जाऊ दे ! अजून तू लहान आहेस ! थोडा मोठा झालास कि मी तुला शिकवीन घड्याळ दुरुस्ती ! सोप्पी असती रे ! पण ती चाके कुठायत ?”
“बंडूदादा , ते बग टेबल खाली कायत पडलाय !”
टेबल खाली घड्याळ्याच्या पोटातले बरेचसे अवयव पडले होते ! ते बसवायचा बंडूदादा जो जो प्रयत्न करायचा तो तो अजून काहीतरी वेगळं व्हायचं !
” सुरश्या , जा बर चटकन एखादी पिशवी आण ! ”
आता कळतंय तेव्हा बंडूदादांनी ‘ऑपरेशन ‘ सोबत घड्याळाचे ‘पोस्ट मॉर्टम ‘ पण उरकले होते ! घड्याळाच्या मृत्यूचे कारण मात्र समजले नव्हते !’ डेथ सर्टिफिकेट ‘ साठी घड्याळजी कडे , सर्व अवयव पिशवीत घालून बंडूदादा रवाना झाला ! सोबत मी पण होतो .
” बंडोबा ! तुम्ही काय केलेत हे मला दिसतंय ! पण कसे केलेत हो ? इतकी वर्ष मी घड्याळाच्या अंनत अवस्था पाहिल्या पण अशी अवस्था रेल्वे खाली सापडलेल्या घड्याळाची पण होत नाही !” अश्या प्रकारचे प्रशास्तिपत्रक घड्याळजीनी दिले !आणि रात्री अण्णांनी श्राद्ध घातले ! पण दुसऱ्या दिवशीपासून अण्णांनी बंडूदादाला त्या घड्याळजी कडे घड्याळ दुरुस्तीची शिकवणी लावली . तेव्हा पासून तो शिस्तबद्धरित्या घड्याळे बिघडवू लागला ! मग त्या घडयाजीने दुकानच बंद करून टाकले ,आणि बूटपॉलिशचे दुकान चालू केल्याचे ऐकिवात आले !
०००००
मुले मोठी झाली तसा आईला दुपारचा वेळ मोकळा मिळू लागला .म्हणून अण्णांनी तिला एक शिलाई मशीन घेऊन दिली होती . पण आई पेक्षा बंडूदादाच ती ज्यास्त चालवायचा . चड्डीच्या नाड्याच शिव , पिशवीच शिव असले काहीतरी त्याचे त्यावर उद्योग चालायचे . एकदा त्याने मला जुन्या चादरीच्या शर्ट शिवला होता ! मी तो घालून आईसमोर उभाराहीलो !
“आई बग्ग् ,मी कसा दिसतोय ? बंडूदादान शिवलाय !”
” सुऱ्या ,निव्वळ झोळीत माकड अडकवल्या सारखा दिसतोस !” ती खूप वेळ हसत होती .
आई दुपारी कल्याण केंद्रात ‘शिवण क्लास ‘ला जायची . तेथे पेपर कटिंगवर चड्डी , ब्लाउज , परकर असले प्रकार शिकवत . आई जमेल तसे डिझाईन उतरून आणि . आई डावखोरी होती . तिला कात्रीने कागद कातरणे जमायचे नाही . बंडूदादा ते काम हौसेने करायचा . एकदा प्रत्यक्ष ब्लाउज शिवून पहाण्याचे ठरले . हा कारभार आई ,मी आणि बंडूदादा गुपचिप करून अण्णांना आश्चर्यचकित करणार होतो ! सुरवातीस कागदावर कटिंग केले . ते मस्त जमले. मग ब्लाउज पीस कापले तेही मस्त झाले . अर्थात कात्री बंडूदादाच्या हाती होती !पण व्हायचा तो घोळ झालाच ! त्याचे काय झाले कि कटिंग करताना आम्ही पलंगावर बसलो होतो . त्यावर गादी होती ,गादीवर चादर होती ! ब्लाउजच्या कपड्या बरोबर चादर आणि गादीचा कपडा पण बंडूदादाच्या कात्रीतून सुटला नाही ! त्या दिवशी आम्हा सर्वाना अण्णा कडून ‘सरप्राईस ‘मिळाले ! लाखोली म्हणजे काय हे ज्ञान आम्हास मिळाले !
०००००००
आमच्या गावाबाहेर एक नदी होती . दर पावसाळ्यात तिला पूर यायचा . पाण्याला चिक्कार ओढ असायची . नदीला सुंदर लांबसडक घाट होता . घाटावर एक पिंपळाचे झाड होते . पावसाळ्यात मी अन बंडूदादा नदीवर पूर पहायला नेहमी जायचो . मुख्य उद्देश असायचा पिंपळाच्या पानाच्या पिपाण्या करून वाजवणे ! तसेच मोडफुटलेल्या चिंचोक्यांना बाभळीचा काटा टोचून भिंगोऱ्या करून फिरवणे . पिपाण्या अन भिंगोऱ्या बंडूदादाच करायचा मी फक्त वाजवायचो अन फिरवायचो ! बंडूदादाने एक नुकतेच उगवलेले आंब्याचे झाड उपटले आणि त्याच्या कोईवरले टरफल काढून टाकले . आतले गरे दगडावर तिरपे घासून त्याची पुंगी मला करून दिली . ती मी वाजवण्यात गुंग होतो . त्यावेळीस मी दहा बारा वर्षाचा असेंन आणि तो अठरा एकोणीसचा . काय झाले कोणास ठाऊक ,एकदम तो उठला .
“चल सुरश्या !”
” कुठं ?”
“तू चल तर खरं !”
आम्ही महादेवाच्या देवळात आलो . तेथे देवळाच्या गुरवांची अंजली होती . ती माझ्याच वर्गातली .
“सुरश्या , हि तुझी वैनी !कशी आहे ? “दुरूनच तिच्याकडे बोट दाखवत त्याने मला विचारले .
“वैनी ?”
” हा , मी हिच्याशीच लग्न करणार आहे ! ”
“खरं सांगू ?”
“सांग !”
” गोरी आहे ! पण तू हिच्याशी लग्न करू नकोस !”
” का ? ”
“ती नकटी आहे ! अन तीच गणित कच्च आहे ! ती नापास होते गणितात !”
” हू ,त्याला काय होत ! ”
“पण तू ना , त्या पेक्षा कॅलेंडर वरल्या बाईशी लग्न कर ! मला तशी वहिनी पाहिजे !”
तो फक्त हसला .
०००००
” अण्णा ,आम्ही दोघे अंजलीशी लग्न करणार आहोत !” मी निरागस पणे अण्णांना सांगितले . बंडूदादा मला म्हणाला होता ‘सुरश्या ,तूच विचार अण्णांना मला त्यांची भीती वाटते !’
“आम्ही ?”
” आम्ही म्हणजे बंडूदादा हो !”
” अन हि अंजली कोण ?”
” अहो ती माझ्या वर्गात आहे ! घाटावरच्या महादेवाच्या मंदिराच्या गुरवांची पोरगी !”
“आणि तिच्याशी लग्न कोण बंडोबा करणार ?”
” हो ,मी लग्नाला हजर राहणार आहे !तुम्ही पण यायचे असेल तर येऊ शकता !”मी तडफदार उत्तर दिले
त्याकाळी प्रेमविवाह म्हणजे ‘महापातक ‘ आणि ‘आंतरजातीय विवाह म्हणजे तर ‘ब्रह्महत्याच ‘!
” बंडोबा , चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि निघालात लग्न करायला ! बायकोला काय खाऊ घालणार ? कोठे ठेवणार ?आणि बिरादरीला काय सांगणार ? जातीतल्या पोरी काय मेल्यात , परजातीची करायला ?”आमचे अण्णांना रागावले कि खूप शांत पणे आणि आदरार्थी साम्भोधून बोलतात !
” अण्णा मला माहित आहे तुम्हाला नाही आवडणार !पण माझे अंजलीवर प्रेम आहे !” त्यादिवशी बंडूदादा अण्णाच्या डोळ्यात डोळे घालून बोलला !, पहिल्यांदा आणि शेवटचे ! अण्णांना काय वाटले कोणास ठाऊक .
” बंडोबा , दोघांची पोट भराय इतकं कमवायला लागा !मी बिरादरी विरुद्ध उभाराहून तुमचं लग्न लावून देईन !”
बंडूदादाच्या डोळ्यात त्यादिवशी मी पाणी पहिले !
बंडूदादाला धीर निघाला नाही . तो तडक अंजलीच्या घरी गेला आणि ‘मी अंजलीशी लग्न करणार ‘म्हणून सांगून टाकले ! सुंदर पोरीचा गरीब बाप ,आंतरजातीय मामला . पुढे काय वाढून ठेवलंय याचा त्याला अंदाज आला ! चार दिवसात अंजली आणि तिचा बाप गाव सोडून निघून गेले !
०००००
अंजली गेली आणि अवखळ बंडूदादा शांत झाला . तो फारसा बोलायचा नाही . उदास दिसायचा . यथावकाश त्याला बँकेत नौकरी लागली ! अण्णांना खूप आनंद झाला . त्यांनी पेढे वाटले .
“आता सून आणायला आम्ही मोकळे बर का ,बंडोबा !”अण्णा गमतीनं म्हणाले .
मी आणि बंडूदादा नदीच्या घाटावर बसलो होतो . समोर दुथड्या वहात्या नदी कडे बंडूदादा एक टक पहात होता .
“सुरश्या आता नौकरी लागलीय ! अंजली कुठे असेल कोणास ठाऊक ? तिचा शोध घ्यावा लागेल . !”
” बंडूदादा, एक सुचवु का ? नदी पलीकडे टाकवाडीत अंजलीचा मामा राहतो ! त्याच्या कडे तिच्या पत्ता असेल ! आपण उद्या जाऊन येऊ .”
“उद्या ! नको !”
तो काय करतोय हे कळायच्या आत झरझर घाट उतरून त्याने धो धो वाहत्या नदीत उडी मारली !
“बंडूदादा sss ” मी ओरडलो . पण उशीर झाला होता !
घाटावर गाव गोळा झाले होते . बंडूदादा कधीच परतला नाही !
मी अण्णांना फक्त त्या दिवशी रडताना पहिले होते !
— सुरेश कुलकर्णी
—आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . Bye पुन्हा भेटूच