आपल्या आयुष्यात कोण डोकवावे हे आपल्या हाती नसते . काही जण काही क्षणा साठी सम्पर्कात येतात आणि आपल्या आयुष्याचा मोठा भाग व्यापून टाकतात ,तर काहीजण जन्मापासून सोबत असतात पण शेवट पर्यंत ‘अनोळखीच ‘ रहातात ! माझ्या आयुष्यात पण, आदर्श शेजाऱ्या प्रमाणे डोकावणारे आहेत , तसाच इतरांच्या आयुष्यात डोकावण्याचा ‘वसा ‘ मी पण ‘ऊतलो नाही ‘ ‘मातलो नाही ‘ आणि टाकला पण नाही ! असे करता करताच ‘माझी माणसं ‘ जमलीय . हि उदास असतील , दुःखी असतील ,काहीशी भरकटल्या सारखी वाटतील ,पण माझ्या मनत ती खोलवर रुजली आहेत . या ‘कंगाल ‘ वाटणाऱ्या माणसांनी माझ्या झोळीत काही ना काही टाकलय , मला ‘श्रीमंत ‘ केलाय ! ती आहेत तशी स्वीकारलीत तर ‘माझी माणसं ‘ ‘आपली माणसं ‘ होतील !
आज पासून त्यातील काहींची ओळख करून देणार आहे.
आज माझ्या काही मित्रांचे ‘नमुने ‘ एन्जॉय करा.
मी आणि शाम्या मुडकेच्या टपरीवर सकाळच गार उन गरम चहा सोबत खात होतो . वसंता ( आम्ही त्याला वश्या म्हणतो )अजून आला नव्हता . त्या मुळे त्याचाच विषय आम्ही चघळत होतो .
“सुरश्या वश्या सारखा ‘ध्यान ‘ तू आपल्या दोस्तांच्या ग्रुप मध्ये घ्यायला नको होत !”
“का?”
“एकदम बावळट अन भडकू आहे .”
” अरे पण तो …… ” मी काही बोलणार तो वश्याच ‘ध्यान ‘ समोरून आलंच . गडी घुश्यात होता . माझ्या समोर दोन्ही हात कमरेवर ठेऊन अटेन्शन मध्ये उभा राहिला .
“तुम्हाला न काही सेन्सच नाही ! मी म्हणतो, इतका कशाचा माज आलाय ! ?”
” वश्या , नीट सांग काय झालंय ?” मी पण सटकलो
“काय ? काय? मलाच विचार ! समोरून गेलोतर साधी ओळख दाखवली नाहीस ! ”
“कधी?”
‘कधी काय ? रविवारी ,मी बाईक वरुन समोरून आलो तर तू आपला ढेरी हालवत तसाच पुढे ! साधी स्मित रेषा थोबाडावर उमटली नाही ! वीस वर्षाची ओळख विसरलास ?”
हा वश्या ना कायम भयंकर कळकट जीन ,त्यावर मेलेल्या काळ्या कुत्र्या सारखं जाकीट ,जून पोचे पडलेले शिरस्त्राणा सारखं पूर्ण चेहरा झाकून टाकणार हेल्मेट घालतो ! बाईक पण काळीच ! कसा ओळखणार ? ‘सब पुलीसवाले एक जैसे दिखते है ‘ च्या धर्तीवर मला ‘सब हेल्मेटवाले एक जैसे दिखते है!’ अशी माझी अवस्था असते .
” आबे, जॅकेट ,जीन अन हेल्मेट वाले सगळी माणसे मला सारखीच दिसतात !”
“मला वाटलंच ! असलं काही तरी तू बरळणार ! पण गधड्या १०१२ माझा बाईक नम्बर ! तो तर बघितला अशिलना ना ? सतरा वेळेला मागची शीट गरम केलीस कि ! काही नाही तू न दिवसेंन दिवस अधिक ड्याम्बीस होत चालायस !”दाहीने मड करून ताडताड पाय आपटत निघून गेला !
खरे आहे ,मी अनेक वेळा त्याच्या बाईकवर बसलोय . पण आकडे माझ्या लक्षात राहत नाहीत . अहो माझा फोन नम्बर , बँकेचा खाते नम्बर , पी. एफ . नम्बर ( माझा एक सहकारी याला कैदी नम्बर म्हणतो! –नौकरी मे भी और नौकरी के बाद भी –चिटकलेलाच रहातो !) , इतकेच काय माझा बेसिक पगार सुद्धा माझ्या लक्षात रहात नाही ! देवा शपत खरे सांगतो आयुष्य भर ‘पडेल ते काम अन मिळेल ती पगार’ या तत्वा वर नौकरी केलीय .! आमच्या तात्या सोमण सगळ्याच्या जन्म तारखा लक्षात ठेवतो ! असो .
ooo
रात्री अकराला जग्या चा फोन आला . ‘मी उद्या येतोय नगरला पत्ता सांग ! ‘. जग्या रात्री बेरात्री कधीही फोन करतो . हजार वेळा सांगितलं . ‘सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळात फोन करत जा . ‘हो ‘ म्हणतो अन पुन्हा बेरात्री फोन करतो . जग्या असाच आहे . किमान तीस एक वेळा तरी घरी येउन गेला असेल . पण दर वेळेस फोनवर पत्ता विचारतो .
‘दर वेळेस पत्ता विचारतोस ,लक्षात रहात नसेल तर एकदाच लिहून ठेव ना ?’
‘काय गरज ? तू आहेस कि . विचारीन तुला ‘
‘अन समजा मी नसलो तर ?’
‘तर मग कशाला येतोय मी ?’
हे असले आमचे मित्र !
ooo
एक वेळ हा जग्या परवडला ,पण तात्या सोमणाचा वेगळाच हिसका असतो . त्याच्या साडूचा भाऊ नगर मध्ये रहातो . तात्या मला भेटायला म्हणून नगरला येतो , आणि उतरतो साडूच्या भावाकडे ! तेथून त्याचे फर्मान निघते ,
“सुरश्या , मी आलोय . भेटायला ये . मग जाऊ बाहेर जेवायला ”
” कुठे उतरलास ? काळ्या कडेच का ?”
“हाव , कालच आलोय !”
” अरे ,तात्या, त्या तुझ्या काळ्याच घर माझ्या घरापासून खूप लांब आहे रे . त्या पेक्षा तू माझ्या कडे …….. ”
“लांब ? साल आम्ही तुला भेटायला पाचशे किलोमीटर हुन येतो ,अन तुला पाच किलोमीटर लांब वाटतंय? गाडी विकलीस का ?”
सोमण्या म्हणजे कठीण प्रकार !
ooo
खरे सांगतो तात्या काय ,जग्या काय ,वश्या काय किंवा शाम्या काय , मित्रच आहेत हो . आणि का नसावेत मला त्यांनीहि माझ्या दोषा सकट स्वीकारलय ! माझ्या सारख्या त्यांनाही त्यांच्या मित्रानं कडून अपेक्षा असणारच ना ?
मित्र म्हणजे कोण ? हा घहन प्रश्न मला नेहमीच सतावतो . म्हणून एकदा मी श्याम्याला विचारले .
“शाम्या दोस्त कुणाला म्हणवरे ?”
” जो सकाळी उष्णोदकाचे आणि रात्री शीतोदकाचे बिल भरतो त्याला दोस्त म्हणावं ! ”
शाम्या इब्लिस आहे . आमचा सुधा कोणाचीहि तोंड ओळख झालीकी ‘तो न आपला फ्रेंड आहे ! ‘ म्हणतो . त्याच्या मित्रात रात्रीच्या गस्त घालणाऱ्या गुरख्या पासून ते कलेक्टर पर्यंत सर्व जण येतात !मित्रांची व्याख्या करण्या इतपत आपली प्रज्ञा नाही . पण एक जागी मित्रांचे प्रकार वाचण्यात आले . एक ज्याची आपली वेव्हलेन्थ जमते तो साधारण ‘मित्र ‘या क्याट्यागिरीत मोडतो .दुसरे ,ज्यांच्या समोर आपणस व्यक्त होताना संकोच वाटत नाही किंवा जे आपण व्यक्त झालो तर आपल्यला समजून घेतात ते . त्यांना आपण ‘सखा ‘ म्हणू ,पण असेही काही मित्र असतात जे न सांगताही आपली घालमेल समजून घेतात ! हेच ते ‘जिवलग ‘ मित्र ! वय ,जात , गरिबी श्रीमंती या सगळ्याच्या पल्याडचं नातं ! तसे नसते तर सुदामाला कृष्णा सारखा जिवलग मिळाला नसता ! न सांगता सुदामाला समजून घेणारा ! आणि मलाही हे जिवलग मित्र , न बोलताही समजून घेणारे !मिळाले नसते ! कोणी तरी मैत्रीला हिऱ्याची अप्रतिम उपमा दिलीय ! ‘हिरा हा कोळशाचाच भाऊ बंध . विज्ञान सांगते कि ‘हिरा जगातला सर्वात कठीण पदार्थ आहे , तरी तो ठिसूळ पण आहे ! हिरा भंगला तर सांधता येत नाही ! तुमच्या जिवलगांना जीवापाड सांभाळा ,त्यांच्या दोषांना कोळश्याच्या खाणीतील म्हणून हिणवू नका ! ते भंगणार नाहीत याची काळजी घ्या !
आजची पोस्ट माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांसाठी ,
आप हमारे ‘हिरा ‘ हो
— सु. र. कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच Bye !
Leave a Reply