रात्रीची आल्हाददायक झुळूक हळूच मला खुणावते आणि मी नकळत तुझ्याकडे वळते.
आणि तुझ्या शीतल छायेत आल्यावर माझ्या अंगावर चांदण्याची फुलं बिनधास्त उधळतोस तू..
तुझं ते निरभ्र आकाशात रुबाबात झिरपणं कोणालाही तुझ्या प्रेमात पाडू शकतं सहज.
आणि त्या मेघांनी जरी गर्दी केली, तरी तुझं सौंदर्य यत्किंचितही कमी होत नाही, किंबहुना ते तुझी शोभा जरा जास्तच वाढवतात.. तीट लावल्यासारखंच.
क्षणाक्षणाला बहरत जाणारं तुझं रूप डोळ्यात साठवताना माझी नजर अपुरी पडते . तू पाहताना एका स्वप्नासारखा भासतोस, पण तुला पाहतानाचा प्रत्येक क्षण सुंदर वास्तव आहे.
आणि म्हणूनच मी तुझ्या आणखी प्रेमात पडत जाते.
तू कायम आहेस. अनंत आहेस की नाहीस ते ठाऊक नाही. पण माझ्यासोबत कायम आहेस. अमावस्येला तुझं अस्तित्व नसलं तरी आठवणींच्या स्वरूपात आहेस. चंद्रकोरीमध्ये इवलंसं रूप दाखवलंस तरी पुरेसं आहे. आणि पौर्णिमेला तर पर्वणीच आहे.
तुझा मुग्ध प्रकाश मला रातराणीच्या सुगंधाशी खेळवतो, तुझं चांदणं मला न्हाऊ घालतं, कुशीत घेतं. तुझ्या प्रकाशाची जादुई वलयं मला अंगाई गात निजू घालतात. आणि मी तुझ्याच स्वप्नांमध्ये तुझी अशीच अप्रतिम रूपं बघण्यात दंग होते.
— कल्याणी
Leave a Reply