मला WhatsApp वापरायला लागून वर्ष झाले तरी …
मी ‘लाइक’ केला नाही, मी ‘ईमोजी’ निवडली नाही,
मी एकही साधा मेसेज ‘फॉर्वर्ड’ केला नाही ||1||
मी उपदेश केला नाही, मी सुवचन धाडले नाही,
मी आजवर विनोदी चुटका रवाना केला नाही ||2||
मी ‘दैनिक शुभेच्छा’ चालवले नाही, मी भविष्य कथिले नाही,
मी ‘नेट’वरची रंगीत फुले पाठविण्यात रंगलो नाही ||3||
मी सेल्फी काढला नाही, तो डीपीत टाकला नाही,
मी वर्षभरात माझा स्टेटस बदलला नाही ||4||
मी साहित्यिक धुंडाळला नाही, मी बातमी प्रसारली नाही,
मी राजकरण्यांच्या करणीत कधीच डोकावलो नाही ||5||
मी केक वितरला नाही, मी बुकेही बांधला नाही,
मी वाढदिवशी कोणावरही ‘Wish’ प्रयोग केला नाही ||6||
मी ‘HBD’ केला नाही, मी ‘वा.दि.हा.शु.’ ही केला नाही,
मी ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ करायला मात्र चुकलो नाही ||7||
मी काहीच केले नाही, मी तरीही निर्दोष नाही,
मी आलेले मेसेज डिलीट करण्याच्या शापातुन मुक्त नाही ||8||
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
श्री. संदीप खरे यांच्या काव्य रचनेशी साधर्म्य राखून लिहिले आहे.
— रविंद्रनाथ गांगल
Leave a Reply