मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां –
पूर्णेन्दुवक्त्र प्रभां
शिञ्जन्नूपुरकिंकिणिमणिधरां पद्मप्रभाभासुराम् ।
सर्वाभीष्टफलप्रदां गिरिसुतां वाणीरमासेवितां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ २॥
आई जगदंबेच्या लोकविलक्षण सौंदर्याचे तथा तिच्या दिव्य तात्त्विक स्वरूपाचे वर्णन करतांना, आचार्य श्री प्रथम दोन चरणात आईने धारण केलेल्या अलंकारांचे आणि त्यांनी फुललेल्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां- मोत्यांचे हार लटकत असल्यामुळे अधीकच शोभून दिसणाऱ्या मुकुटाने सुशोभित असणारी.
आईच्या मस्तकावर असणाऱ्या रत्नजडित सुवर्ण मुकुटाला मोत्यांचे हार लटकत आहेत. त्याने मुकुटाचे सौंदर्य वृद्धिंगत झाले आहे. अशा मुकुटाने आई अधिकच सुंदर दिसत आहे.
पूर्णेन्दुवक्त्र प्रभां- पूर्ण विकसित पौर्णिमेचा चंद्रबिंबा प्रमाणे अत्यंत सुंदर मुखाची आभा सर्वत्र विलसत आहे अशी.
शिञ्जन्नूपुर- जिच्या चरणातील नूपुर अर्थात पैंजणांचा अत्यंत सुंदर ध्वनी सर्वत्र गुंजत आहे अशी.
किंकिणिमणिधरां- जिच्या कंबर पट्ट्यात, वस्त्रात तथा अन्य अलंकारात लावलेले छोटी-छोटी घुंगरू किन् किन् असा सुंदर आवाज करीत आहेत अशी.
पद्मप्रभाभासुराम् – कमळाच्या सौंदर्या प्रमाणे तेजस्वी असणारी. परम आकर्षक असणारी. भक्तगणांच्या चित्ताला मोहीत करणारी.
सर्वाभीष्टफलप्रदां- साधकांना सुयोग्य अशी सकल फले प्रदान करणारी. गिरिसुतां- गिरी म्हणजे पर्वत. सकल पर्वतांचा राजा हिमालय. त्याच्या घरी कन्या रूपात अवतार घेतलेली . वाणीरमासेवितां- वाणी अर्थात देवी सरस्वती आणि रमा अर्थात देवी लक्ष्मी यांच्याद्वारे, अर्थात समस्त ईश्वरी शक्तींच्या द्वारे सेवा केली जात आहे अशी.
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् –
कारुण्याचा जणू काही सागर असणाऱ्या देवी मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply