श्रीविद्यॆ शिववामभागनिलयॆ श्रीराजराजार्चितॆ
श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ चिन्तामणीपीठिकॆ ।
श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ श्रीशांभवि श्रीशिवॆ
मध्याह्नॆ मलयध्वजाधिपसुतॆ मां पाहि मीनाम्बिकॆ ॥ १ ॥
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी मीनाक्षी पंचरत्नम् सोबतच मीनाक्षी स्तोत्रम् या नावाची ही एक नितांत सुंदर रचना साकारली आहे.
यात आई मीनाक्षीचे वैभव वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,
श्रीविद्यॆ- शाक्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीविद्या स्वरुपिणी. शिववामभागनिलयॆ- भगवान शंकरांच्या डाव्या भागात अर्थात येथे असणाऱ्या हृदयात निवास करणारी. श्रीराजराजार्चितॆ- सामान्य जीवावर सत्ता गाजवतो त्याला राजा म्हणतात. अनेक राजांवर सत्ता गाजवतो तो राजराज. अशा अनेक सम्राटांनी अर्चना केलेली.
श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ- भारतीय संस्कृतीत वैभवशाली उपासना मार्ग विद्यमान आहे त्यापैकी एक श्रेष्ठ मार्ग आहे नाथपंथ. हे सर्व नाथ आई जगदंबे ला आपली गुरु मानतात. तिचे हे गुरुस्वरूपच तिचे दिव्य वैभव आहे. चिन्तामणीपीठिकॆ – चिंतामणी रत्नाच्या आसनावर विराजमान असणारी.
श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ – श्री म्हणजे देवी लक्ष्मी, वाणी म्हणजे देवी सरस्वती आणि गिरीजा म्हणजे देवी पार्वती, या त्रिगुणात्मिका तीन देवता जिच्या चरण कमलाला वंदन करतात अशी.
श्रीशांभवी- भगवान शंकरांची सहधर्मचारिणी.
श्रीशिवॆ- अत्यंत पवित्र, शुद्ध.
मलयध्वजाधिपसुतॆ- दक्षिणे मध्ये असणाऱ्या पांड्य राजवंशातील मलयध्वज राजा ने आपली पत्नी कांचनमाला हिच्यासोबत भगवान शंकराची तपश्चर्या केल्यावर त्यांच्या आशीर्वादाने कन्या रुपात प्रकट झालेल्या,
मध्याह्नॆ मां पाहि मीनाम्बिकॆ- हे मीनाम्बिके या मध्याह्न काळात माझे रक्षण कर.मध्याह्न समयी अर्थात दुपारी सूर्य मस्तकावर असणे हा सर्वाधिक तापदायक काळ. अशा या तापातून माझे रक्षण कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply