ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते प्रेतासनान्तस्थिते
पाशोदङ्कुशचापबाणकलिते बालेन्दुचूडाञ्चिते ।
बाले बालकुरङ्गलोलनयने बालार्ककोट्युज्ज्वले
मुद्राराधितदैवते मुनिसुते मां पाहि मीनाम्बिके ॥ ४ ॥
आई जगदंबेच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते – ब्रह्म म्हणजे श्रीब्रह्मदेव, ईश म्हणजे श्रीशंकर तथा अच्युत म्हणजे श्रीविष्णू यांच्याद्वारे अखंड जिच्या चरित्राचे गायन केल्या जाते अशी.
प्रेतासनान्तस्थिते- भगवान महाकाल निश्चल स्वरूपात स्थिर रहात असल्याने त्यांना प्रेत म्हणतात. त्या महाकालाला आसन करून त्यावर बसणारी.
पाशोदङ्कुशचापबाणकलिते- पाश म्हणजे दोरी, उद्ङ्कुश म्हणजे वरच्या बाजूला टोक असलेला अंकुश, चाप म्हणजे धनुष्य आणि बाण अशी आयुष्य हातात धारण करणारी.
बालेन्दुचूडाञ्चिते- बाल इंदू म्हणजे चंद्राची कोर. चुडा अर्थात केसांचा वरचा भाग. च्या मस्तकावर चंद्रकोर धारण केल्याने अतिव सुंदर दिसणारी.
बाले- काय अंभाल स्वरूपात निरागस दिसणारी. बालकुरङ्गलोलनयने- कुरंग म्हणजे हरिण. बालक कुरंग म्हणजे हरणाचे पिल्लू. त्याच्या नेत्राप्रमाणे चंचल नेत्र असणारी. सामान्य हरणाचे नेत्र देखील चंचल असतात. लहान बालक कधी चंचल असल्याने त्याचे नेत्र तर जास्तच चंचल असतात, हा भाव. बालार्ककोट्युज्ज्वले- कोट्यावधी बालार्क अर्थात उगवत्या सूर्याप्रमाणे तेजपुंज असणारी.
मुद्राराधितदैवते- उपासनेमध्ये हाताच्या बोटांच्या ज्या विविध रचना केल्या जातात त्यांना मुद्रा असे म्हणतात. या मुद्रांमध्ये जगदंबेच्या उपासनेत देवी मुद्रा ,योनी मुद्रा इ.चा प्रयोग केला जातो. त्या मुद्रांच्या द्वारे जिची उपासना होते अशी.
मुनिसुते- विविध ऋषी-मुनींनी उपासना केल्यानंतर वरदान स्वरूपात आई जगदंबेने त्यांच्या आश्रमामध्ये अवतार धारण केल्याच्या अनेकानेक कथा देवीभागवत, मार्कंडेयपुराण इत्यादी ग्रंथात आलेल्या आहेत. या अवतारांच्या सापेक्ष रीतीने आई जगदंबेला मुनिसुता असे म्हटले आहे. तिला प्रार्थना आहे की,
मां पाहि मीनाम्बिके- ही आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply