शब्दब्रह्ममयी चराचरमयी ज्योतिर्मयी वाङ्मयी
नित्यानन्दमयी निरञ्जनमयी तत्त्वंमयी चिन्मयी ।
तत्त्वातीतमयी परात्परमयी मायामयी श्रीमयी
सर्वैश्वर्यमयी सदाशिवमयी मां पाहि मीनाम्बिके ॥ ८ ॥
आई मीनाक्षीच्या तात्त्विक स्वरूपाचे शास्त्रीय वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
शब्दब्रह्ममयी- वेद शास्त्र यामध्ये असणाऱ्या शब्दांना शब्दब्रह्म असे म्हणतात. या सगळ्याच्या द्वारे जिचे वर्णन केल्या जाते अशी.
चराचरमयी- चर म्हणजे सजीव तर अचर म्हणजे निर्जीव. या दोन्ही रूपात नटलेली.
ज्योतिर्मयी- ज्योती अर्थात तेज स्वरूपिणी.
वाङ्मयी- वाणी स्वरूप असलेली. मानवी विकासाचा महान बिंदू आहे वाणी. विचार तर पशूच्या मस्तकात देखील असतात. पण त्याचे सुयोग्य प्रगटीकरण केवळ बुद्धीमंताला करता येते. वाणी या स्वरूपात या विकासाचा श्रेष्ठबिंदू असणारी.
नित्यानन्दमयी- अखंड आपल्याच आनंदात असणारी. निरञ्जनमयी- अंजन म्हणजे काजळी. मळ. घाण. याचा लवलेश देखील नसलेली. परम शुद्ध.
तत्त्वंमयी – शास्त्रात परब्रह्मालाच तत्व असे म्हणतात. परब्रह्मस्वरूपिणी.
चिन्मयी – चैतन्य अर्थात तेज, ज्ञान हेच जिचे स्वरूप आहे अशी.
तत्त्वातीतमयी- शास्त्रात अन्न, प्राण आदी गोष्टींना देखील विवेचना पुरते ब्रह्म म्हणजे तत्व म्हटले जाते. अशा सर्व तत्त्वांच्या अतीत असणारी. परमतत्त्व स्वरूपिणी.
परात्परमयी – पर म्हणजे श्रेष्ठ. सगळ्या श्रेष्ठ गोष्टींमध्ये देखील परमश्रेष्ठ.
मायामयी – विश्वाला संचालित करणाऱ्या माया रूपात लीला करणारी.
श्रीमयी- श्री म्हणजे वैभव. शास्त्रामध्ये ऐश्वर्य, वीर्य,यश,श्री, ज्ञान आणि वैराग्य या सहागोष्टींना षडैश्वर्य असे म्हणतात. या सगळ्या रूपात लीला करणारी.
सर्वैश्वर्यमयी- सर्व प्रकारच्या वैभवांनी युक्त .
सदाशिवमयी – भगवान सदाशिव यांची सहधर्मचारिणी. अतीव पवित्र.
मां पाहि मीनाम्बिके – हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
जय श्री मीनाक्षी !
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply