मेघदूत या महाकवी कालिदासाच्या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला तो रामगिरीवर अर्थात सध्याचं रामटेक. मेघदूत हे दूतकाव्य तसेच विरह काव्यसुद्धा. या मेघदूत काव्याचा नायक यक्ष कुबेराच्या शापामुळे आपल्या प्रिय पत्नीपासून दूर एकांतवासात एका वर्षासाठी रामगिरीवर राहत असतो. पत्नीचा विरह त्याला सहन होत नाही. अशातच त्याला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात मेघ दिसतो. आपल्या पत्नीपर्यंत आपला खुशालीचा निरोप देऊ शकेल, पोहोचवू शकेल अशा विचाराने मेघाला दूत बनवायचं यक्ष ठरवतो.
मेघाचा प्रवास सुखकर कसा होईल, याची काळजी यक्षाला आहे. मार्गात येणारे डोंगर, नद्या, नगर, नागरिक इत्यादीचे यर्थाथ वर्णन यक्ष करतो. यक्षाची पत्नी उत्तरेकडे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीत राहते. त्या अलकानगरीचं स्वत:च्या घराचं वर्णन मेघाला ऐकवतो. विरह दु:खाने पोळलेल्या पत्नीचं वर्णन करताना यक्ष म्हणतो, अत्यंत लावण्यवती असलेली माझी पत्नी माझं कल्पनाचित्र रेखाटत असेल. पिंजऱ्यातल्या सारिकेशी बोलत असेल. मांडीवर वीणा ठेवून माझं नाव गुंफलेलं गीत गाण्याचा प्रयत्न करीत असेल. शापाचे किती दिवस उरलेत हे मोजण्यासाठी उंबरठ्यावर ठेवलेल्या फुलांनी गणना करीत असेल आणि माझ्याबरोबर घालवलेल्या मिलनाच्या क्षणाची आठवण येऊन स्वप्नात दंग होत असेल.
अशा माझ्या पत्नीला हे मेघा तू निरोप दे कि, हे शापाचे चार महिने संपले की आपण दोघं सुखाने काळ घालवू. हे मेघा, माझा निरोप दिल्यानंतर तू तुझ्या मार्गाने यथेच्छा विचारणा कर. तुझ्या प्रियेबरोबर, विद्युलतेबरोबर तुझा कधीही वियोग न होवो.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply