नवीन लेखन...

मेहनती… डॅशिंग – संतोष जुवेकर

संतोष जुवेकर. एक मेहनती अभिनेता. छायाचित्रातील त्याच्या देहबोलीतून त्याची मेहनत आणि प्रामाणिकपणा दिसतो.

मराठी सिने इंडस्ट्रीत गेल्या चार-पाच वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळालेत. मराठी कलाकार अपडेट झालाय, त्याचा कॉस्च्यूम सेन्स वाढलाय, त्याचं फॅशन स्टेटमेंट बदललंय अशी वाक्यं आपण या काही वर्षांत नेहमी ऐकतो. या इंडस्ट्रीचा चेहरामोहरा अशा पद्धतीने बदलायला लावणारी काही मोजकी तरुण नावं कारणीभूत ठरली आहेत. या तरुणांच्या यादीत संतोष जुवेकरचा क्रमांक वरच्या यादीत लागेल. इंडस्ट्रीत आल्यापासूनच संतोषने आपलं एक वेगळं स्टाईल स्टेटमेंट सातत्याने जपलंय. कोणत्या इव्हेंटला काय कॅरी करावं हे संतोषला चांगलंच माहीत आहे आणि त्याच्या याच स्टाईलची चर्चा इंडस्ट्रीत नेहमीच असते. याच हटके लूकमुळे संतोष जुवेकर हे नाव कॉलेजियनमध्येदेखील चांगलंच फेमस आहे.

अनेकदा कामानिमित्त संतोषचा आणि माझा संबंध आला. कधी वृत्तपत्रांसाठीच्या इंटरव्हय़ूच्या निमित्ताने तर कधी फोटोशूटच्या निमित्ताने. इंडस्ट्रीत नवीन पदार्पण केलेल्या संतोषचा इंटरव्हय़ू साधारणपणे बारा वर्षांपूर्वी मी केला होता. शूटच्या वेळी धम्माल करणारा डॅशिंग संतोष प्रत्यक्ष आयुष्यातही तितकाच बिनधास्त आहे हे मला त्यामुळे समजलं. संतोषचा स्वभाव समजल्यामुळे त्याचा फायदा मला फोटोशूटसाठी झाला. संतोष अभिनयाच्या बाबतीत प्रामाणिक आहे. त्याचं काम तो मन लावून चोख पार पाडतो. मात्र हे करत असताना त्या कामाचा आनंदही तो तितकाच मनमुराद लुटतो.

नेहमी त्याच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी आणि कसदार शरीरयष्टीसाठी तरुणाईत प्रसिद्ध असलेल्या संतोषचं त्याच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक असलेल्या जिममध्ये शूट करायचं आम्ही ठरवलं. यासाठी त्याच्या ठाण्यातल्या राहत्या घरानजीकची त्याच्या सोसायटीच्या जिमची जागा आम्ही शूटसाठी निवडली. ठरल्याप्रमाणे आम्ही संतोषच्या घरी भेटलो. शूटची संकल्पना संतोषला सांगितली. गप्पा झाल्या आणि आम्ही व्यायामशाळेत आलो. संतोषचा प्रसन्न चेहरा, त्याचे हावभाव आणि त्याची नेहमीची अभ्यासू वृत्ती ही सारी मला कॅमेराबद्ध करायची होती. या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझमधून संतोषला मी प्रेझेंट केलं.

मेहनती, व्यायामाचं सातत्य राखलेल्या संतोषचे काही फोटो जिममध्ये तो व्यायाम करताना टिपले. व्यायामशाळेत वजन उचलून हे शूट करण्यासाठी संतोषला विशेष कष्ट घ्यावे लागले होते, परंतु त्याने ते कोणतीही तक्रार न करता केले. जिममध्ये असलेल्या नैसर्गिक प्रकाशाला झाकून संतोषच्या चेहऱयावर, विशिष्ट शरीरयष्टीवर स्टुडिओ लाईटच्या माध्यमातून प्रकाश टाकून हे फोटो टिपण्याचा प्रयत्न मी केला. यावेळी काही फोटो ब्लॅक ऍण्ड व्हाईट मी टिपले, तर त्यानंतर फोटोग्राफीतले लाइटिंगचे वेगवेगळे प्रकार वापरून मी फोटो टिपण्याचा प्रयत्न केला.

यातील एक फोटो स्प्लिट लाइटिंगने घेतला. स्प्लिट लाइटिंग म्हणजे फोटोग्राफरच्या नव्वद अंशावर हा लाइट ठेवला जातो. म्हणजे तो लाइट मॉडेलच्या चेहऱयाच्या एका बाजूला ठेवला जातो. असं केल्यानं मॉडेलच्या चेहऱयाचा एकच भाग प्रकाशमान होतो तर दुसरा सावलीत जातो. त्यामुळे मॉडेलच्या चेहऱयाचे दोन भाग होतात. याच लाइटिंगचा बेस धरून पुढे दुसऱया बाजूला दुय्यम (सेकंडरी) लाइटिंग करून त्याची दुसरी बाजू हलकीशी प्रकाशमान केली. ही लाइटिंग इतकी अप्रतिम झालेली की, त्यातून संतोषचा चेहरा अधिक खुलला होता. संतोषचा यावेळी टिपलेला फोटो पाहून पुढे इंडस्ट्रीत अनेकांनी तो आमीर खानसारखा दिसतोय अशी त्या फोटोला दाद दिली होती. इतका त्याचा चेहरा वेगळा दिसत होता.

व्यायाम करतानाचा संतोष टिपल्यानंतर नेहमी कामानिमित्त व्यस्त असलेल्या संतोषचं शांत, संयमी रूप टिपण्यासाठी त्याच बॅकग्राऊंडवर आम्ही एक फोटोशूट केलं. यावेळी संपूर्ण प्रकाश संतोषवर केंद्रित करून जिमचा भाग हलकासा दिसेल इतकाच त्यावर प्रकाश टाकला होता. या फोटोत रंगीत प्रकाशाची एक शेड घेऊन पुढे हे फोटो जांभळट निळ्या रंगछटेत मी टिपले. या फोटोत संतोषचे डोळे अधिक बोलके वाटत होते. कलाकाराला त्याच्या व्यस्त कामातून कुठेतरी निवांत शांतता हवी असते याचं जणू प्रतीकच वाटावं असे हे फोटो आले होते.

साधारणपणे अडीज ते तीन तास चाललेल्या या शूटदरम्यानचा संतोष मदतशीर होताच. शिवाय त्याला फोटोबाबतचं कुतूहलदेखील तितकंच होतं. प्रत्येक फोटोशूट केल्यानंतर सारखा संतोष फोटो बघायचा. त्यात अजून काय वेगळं त्याला देता येईल याबाबत तो चर्चा करायचा आणि त्याप्रमाणे पुढे मेहनतही घ्यायचा. हे शूट करताना त्याला खूप घाम गाळावा लागला होता. तो दमला होता, थकला होता, परंतु फोटोत तो कसा चांगला दिसेल यासाठीची त्याची धडपड सातत्याने सुरूच होती. हेच संतोषचं वेगळेपण त्याच्या सिनेमाच्या बाबतीतही सांगता येईल. संतोष त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टवर तितकीच मेहनत घेतो. मन लावून ते काम करतो आणि यासाठीची त्याची धडपड सतत सुरूच असते हे सेटवरदेखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या याच अभ्यासू वृत्तीमुळे संतोष त्याच्या प्रत्येक सिनेमातून एक ताकदीचा कलाकार म्हणून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो.

— धनेश पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..