औरंगाबाद येथील श्री शरणप्पा नागठाणे यांचा “आम्ही साहित्यिक” या फेसबुक ग्रुपवरील हा लेख..
१५ डिसेंबर … आंतरराष्ट्रीय चहा दिवस !!
गुगल वर सर्च केल्यास १५०० वर्षांपूर्वी वगैरे चहाचा शोध चिनी लोकांनी लावला , मग इ.स.१८०० मध्ये इंग्रजांनी कलकत्त्याच्या चौका चौकात लोकांना फुकटात चहा वाटत भारतियांना चहाचे व्यसन लावलं वगैरे वाचायला मिळते…
गेली जवळपास २०० वर्षे चहा आपल्या दैनंदीन जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे, इतकं की चहा शिवाय दिवसाची सुरुवात होत नाही …
चहा शिवाय संध्याकाळ संपन्न होत नाही…
चहाशी निगडित प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात – आहेत – रहातील…
माझ्या ही कांही आठवणी आहेत, त्या ह्या निमित्ताने ताज्या झाल्या… मला ही बरं वाटलं जरा भूतकाळात फेरफटका मारायला….
खरं तर चहाची सवय लागली ती इयत्ता नववी दहावीत असताना…
खेड्यात घरी दुभतं जनावर असेल तर झक्कास चहा बनवता येतो…
एकदम घट्ट… बासुंदी सारखा…
उन्हाळ्यात बहुतेक जणांच्या घरी दूध नसे (त्या काळी आमच्या भागातील परिस्थिती तर अशीच होती) …मग पाहुणे आले तरी कोरा चहा ( ज्याला खेड्यात ” डिकाशन चहा ” म्हणतात) दिला जाई , त्यावर पाहुणे नाक मुरडून म्हणत ‘ काय तरी रीत राव काळा चहा पाजता ‘….
पण आज कार्पोरेट हाऊसच्या पॅन्ट्री मध्ये हाच ‘ काळा चहा ‘ मुख्य पेय म्हणून मिरवतोय् …
चितळे मास्तर हयात असते तर म्हणाले असते , – ” पुर्ष्या, टाईम्स हॅव चेंजड् ……”
खेड्यात कावळ्याच्या मुळीचा चहा ही बनवला जातो…
गुळाचा चहा आज शहरात डायबिटीसच्या लोकांना औषधी चहा वाटत असेल पण कधी काळी खेडेगावात गुळाचाच चहा बनत असे… साखरेचा चहा ही बेगमी असे….
काॅलेजात गेल्यानंतरच्या आठवणी तर खुपच रम्य आहेत …
पैठण गेट (औरंगाबाद) ला म्हैसूर कॅफे नावाचे चहाचं दुकान होते… तिथला मस्त वाफाळलेला चहा आज देखील आठवतो…
६ पैशाला चहा मिळत असे त्यावेळी…
‘ दुग्धसागर ‘ मध्ये मसाला दूधाबरोबरच सुंदर गोल्डन चहा देखील मिळत असे…
सरस्वती भुवन काॅलेज मध्ये असतांना पिरीअड बंक करून इथे चहा पित बसायला छान वाटत असे…
आमच्या एका मित्राला चहाचं इतके व्यसन होते की अभ्यासाच्या नावाखाली रात्री १ वाजता उठून चहा बनवत असे…
एकदा तो १ वाजताचा अलार्म लावून झोपला… आम्ही अलार्म बदलून १०.३० वाजताचा केला… झालं … जसा अलार्म वाजला … हा गडी उठला आणि लागला स्टोव्ह पेटवायला…
अभ्यास करायचा म्हणून चहा की चहा प्यायचा म्हणून अभ्यास ?
नांदेडला शिकायला असताना ही रात्री २ वाजता यशवंत काॅलेज पासून रेल्वे स्टेशन पर्यंत चहा प्यायला आमचं टोळकं पायपीट करीत जात असे … म्हणजे पून्हा अभ्यासासाठी चहा की चहा साठी अभ्यास !!
पुढे नोकरीत असताना देखील चहाच्या मस्त आठवणी आहेत , असं वाटतं की ही कालचीच तर गोष्ट आहे…
गुलमंडी वर असलेल्या ‘ समाधान टी हाऊसच्या ‘ गोल्डन चहाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे…
मेवाड कामाक्षीला मसाला दोसा खाल्ल्यानंतर चहा न घेणारा विरळाच ….
ग्रिव्हजची सेकंड शिफ्ट केल्यानंतर रात्री १.३० वाजता शहागंज इथे रघू माढेकर, आर वाय कुलकर्णी आणि खमितकर बरोबर परातीचा चहा पिण्याची मजाच काही और होती…
पुढे नुतन काॅलनीत कब्रस्तानाच्या जागेवर मुनलाईट नावाच्या हाॅटेल निघाले …. तिथे रात्री उशिरापर्यंत आम्ही गुलाम अलीच्या गझला ऐकत बसायचो … आम्हाला त्या वेळी (आणि आता ही) गझल किती समजते हा वादाचा विषय होऊ शकतो पण ओंकार गोडबोले, वट्टमवार वगैरे मंडळी मुळे आम्ही आपले बसत असू ... चहाचे राऊंड वर राऊंड होत असत….
चहा करावा तर आमचे मित्र खमितकर ह्यांनी …
अप्रतिम !!
मी त्यांना नेहमी म्हणत असे की एकदा तुम्ही बनविलेला चहा पुण्याच्या ‘ फडतरे अमृततुल्य ‘ ला पाजला पाहिजे मग त्यांना कळेल की अमृततुल्य कशाला म्हणतात ते ….
तसा मांजरसुबा (बीड) चा चहा ही खूप प्रसिद्ध होता… त्या चहा पायी एकदा माझी बस ही सुटली होती… धावाधाव करून पकडावी लागली होती….
गावोगावी चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत…
प्रायव्हेट चहा…
स्पेशल चहा…
गोल्डन चहा…
नांदेडला एस् टी वर्कशाॅप जवळ एक हाँटेल होतं , तिथे डायमंड चहा मिळत असे….
मारामारी नावाचा चहा प्यायला आहे का ? … होय , नाशिक भागात मारामारी नावाचा चहा मिळत असे….
मनमाडच्या चहा बद्दल ऐकलं होतं ? … एखाद्याला काळ्या पाण्याची शिक्षा करायची असेल तर त्याला मनमाड रेल्वे जंक्शनचा चहा पाजला पाहिजे असे आमचे मित्र म्हणत ….
वेगवेगळ्या भागातील चहाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत….
पुण्यात नटराज थिएटरला सिनेमा पहायला गेलो असताना बाजूला हाॅटेलमध्ये एल पी डिस्क वर ५० पैसे देऊन फर्माईशी गाणं ऐकत चहा पिण्याचा वेगळाच अनुभव होता….
उटीच्या टी इस्टेटमध्ये चहा घेऊन, तृप्त होऊन तीच चहा पावडर विकत घेतली आणि फसवले गेलो होतो हा ही अनुभव आहेच…
बनारसला कुल्हड मध्ये चहा घेतला तो ही एक अनुभव आहे…
श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्या नंतर चहाला आणखी चांगले दिवस आले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे…
चाय पे चर्चा ….
येवले अमृततुल्य …
आयुर्वेदिक चहा ….
वेगवेगळे टी स्टार्ट अप्स ….
हे इतकं सगळं घडलं आहे ….
बाकी काहीही असो , अपनी यादें ताजा हो गईं …
हे ही नसे थोडके !!
— शरणप्पा नागठाणे
औरंगाबाद
Leave a Reply