श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३२ रोजी झाला. वय वर्षे ८९ या वयोगटातील सामान्य लोक एकतर म्हातारपणातील अनेक व्याधींशी लढत असलेले, भजन किर्तनात रमलेले किंवा फारफार तर एखाद्या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या कार्यक्रमात बसलेले आपल्याला दिसतील. काही लोक कला आणि वाड्मयक्षेत्रामध्ये, किंवा शिक्षणक्षेत्रामध्ये मार्गदर्शन करण्यात तर काही मोजके राजकारणातील लोक या वयात मोठमोठी पदे उपभोगतांना दिसतील. मात्र हे सरकारी सेवेतून निवृत्त होण्याचं वय नक्कीच नाही.
रेल्वे स्थापत्यशास्त्रातील आपली कारकिर्द पन्नास वर्षाहून अधीक काळ गाजवून डॉक्टर ईलत्तुवलपीळ श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदा वरून निवृत्ती पत्करली तेव्हा त्यांचं वय होतं अवघं ७९ वर्ष ६ महिने आणि २० दिवस. ‘मेट्रो मॅन’ म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्रीधरन यांच्या निवृत्तीची दखल जगभरातल्या प्रसारमाध्यमांना घ्यावी लागली इतके या आधुनिक विश्वकर्म्याचं कर्तृत्त्व मोठं आहे.
भारतात मेट्रो रेल्वेची मुहुर्तमेढ रोवणारी कलकत्त्याची मेट्रो ट्रेन, दुर्गम परंतू निसर्गरम्य कोकणाला नवा श्वास देणारी कोकण रेल्वे, शंभर वर्षांच्या दिल्ली राजधानीला खऱ्या अर्थाने ग्लोबल लुक देणारी विराट मेट्रो रेल्वे आणि केरळातील पलक्कड जिल्ह्यातील करुकपुथूर खेडे या चार धामांना आपल्या कर्तृत्त्वाच्या धाग्याने एकत्र जोडणारा एक जगन्नाथ म्हणजे डॉक्टर ई श्रीधरन! निवृत्तीनंतर आपल्या करुकपुथूर या गावी जाऊन आपल्या पिढीजात घरात स्थायिक व्हायचा त्यांचा निर्णय म्हणजे आपल्या कुळाशी आणि मुळाशी ईमान राखणा-या दक्षिण भारतीय मानसिकतेला अगदी साजेसा आहे. शेवटी या गावाशी असलेला त्यांचा ऋणानुबंध पिढ्यानपिढ्यापासुनचा!
लहानपणी गावातल्या बसेल-ईव्हांजेलिकल-मिशन-उच्च-माध्यमिक शाळेतून शिकतांना टी एन शेषन या आपल्या वर्गमित्राशी स्पर्धा करत आणि नेहमी अव्वल येत घालवलेल्या दिवसांच्या आठवणी, त्यानंतर पलक्कडच्या व्हिक्टोरिया कॉलेजातून घेतलेलं महाविद्यालयीन शिक्षण आणि मग काकीनाडा येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी स्नातक ही पदवी घेतांना सतत जपलेला ‘अव्वल दर्जा’ या गोष्टी श्रीधरन यांनी आजवरच्या कारकिर्दीतही कायम ठेवल्या आहेत. घरातील धार्मिक संस्कार, परंपरा आणि श्रद्धास्थानांचा सन्मान करत त्यांनी तंत्रज्ञानाची कास धरली आणि देशाला दिशा देणा-या मोठमोठ्या प्रकल्पांचे ते अध्वर्यु झाले. आज देशभरातल्या ईंजिनियर्स आणि प्रॉजेक्ट मॅनॅजर्सची शाळा घेणा-या श्रीधरन यांचं सुरवातीच्या काळातील स्वप्न होतं उत्तम प्राध्यापक होण्याचं. त्यादृष्टीने त्यांनी कोझिकोडे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये नागरी-अभियांत्रिकीतील व्याख्याता म्हणून कामही सुरू केलं. पण नियतीच्या मनात त्यांच्यासाठी वेगळे ‘प्रोजेक्ट’ होते.
अभियांत्रीकी शिक्षणाचा भाग म्हणुन मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये उमेदवारी करत असतांनाच १९५४ च्या डिसेंबरमध्ये ते दक्षिण रेल्वेमध्ये सहाय्यक प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून रुजू झाले. आधी दक्षिण आणि मग दक्षिणपूर्व रेल्वेत नवे मार्ग निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. दिलेल्या वेळेत किंवा त्या आधी काम पुर्ण करून देण्याची सवय त्यांना याच अनुभवातून लागली.
श्रीधरन यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट मात्र १९६३ मध्ये आला. भारताच्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा तामिळनाडूतील पंबनम् पूल वादळाने वाहून गेला होता. पूलाचे वाहून गेलेले १२५ टप्पे, पुन्हा उभे करण्याच्या कामगिरीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियोजनाप्रमाणे या कार्याला सहा महिने लागणार होते, मात्र श्रीधरन यांच्या वरिष्ट अधिका-याने तीन महिन्यात काम पुर्ण करतो, अशी ग्वाही परस्पर देऊन ठेवली. हे आव्हान स्विकारत श्रीधरन यांनी पुलाचं काम केवळ ४६ दिवसात पुर्ण करून दाखवलं. याबद्दल रेल्वे मंत्रालयाने त्यांना पारितोषिकही दिलं होतं. त्यानंतर पारितोषिकांची मालिकाच सुरू झाली ती आजतागायत आय आय टि दिल्लीच्या डॉक्टरेट पासुन ते पद्मविभुषणपर्यंत सुरूच आहे.
श्रीधरन उपमुख्य अभियंता असतांना देशातील पहिली मेट्रो रेल्वे १९७० ते १९७५ या काळात कोलकाता येथे उभारण्यात आली. त्या कामाचे तेच प्रभारी होते. त्यांनीच ह्या कामाचा तपास, नियोजन आणि अभिकल्पन केले होते. रेल्वेच्या प्रशासकिय सेवेत असतांना त्यांनी पुर्ण केलेला हा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होय. कारण १९९० मध्ये ते निवृत्त झाले. मात्र औपचारिक सेवानिवृत्तीनंरच श्रीधरन यांच्या ख-या करिअरची सुरूवात झाली!
प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कोकण रेल्वेवर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. कोकण रेल्वेचा प्रकल्प पाच वर्षात पुर्ण करायचा असं त्यांनी ठरवलं. ७६० किलोमीटर लांबीचा, १५० पूल असणारा आणि तब्बल ९३ बोगदे असणारा कोकण रेल्वे प्रकल्प पुर्ण करणे खुप जिकरीचे काम होते. त्यातल्या त्यात ज्या वेळी या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू होते त्याच वेळी नेमका ‘हर्षद मेहता’चा कोट्यवधी रुपयांचा रोखे घोटाळा उजेडात आला आणि बाजारात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटून आर्थिक पुरवठादारांनी हात आखडते घेतले. हा प्रकल्प बांधा-वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्त्वावर घेण्यात आलेला पहिलाच प्रकल्प होता. पैशाचा ओघ थंडावल्यामुळे पाच वर्षाऐवजी सात वर्षात ही योजना पूर्ण झाली. आज कोकण रेल्वेने या भागातील सार्वजनिक वाहतूकीचे चित्रच बदलवून टाकले आहे.
कोकण रेल्वेच्या भिमपराक्रमानंतर देशभरातल्या मोठमोठ्या रेल्वे प्रकल्पांसाठी श्रीधरन यांच्या नावाचा विचार होवू लागला. यात बाजी मारली ती दिल्ली सरकारने. ५ नोव्हेंबर १९९७ पासून ते दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले. दिल्ली मेट्रोचे पुढील सर्व टप्पे मी वेळेत पूर्ण करून दाखवीनच, असा निर्धार करून श्रीधरन यांनी कामाला हात घातला आणि मेट्रोरेलचा कायापालट व्हायला सुरूवात झाली. सहा लाईन्स, एकशे नव्वद किलोमिटर्सचा मार्ग, एकशे बेचाळीस स्टेशन्स – त्यातील ३५ अंडरग्राऊंड स्टेशन्स, आणि दररोज अडिच हजार फे-यांद्वारा प्रवास करणारे लक्षावधी नागरीक! दिल्ली मेट्रोचं हे स्वप्न पुर्ण व्हायला काम हाती घेतल्यानंतर अवघ्या चौथ्या वर्षी सुरूवात करून श्रीधरन यांनी त्यांचा ‘क्लास’ दाखवून दिला. २००२ मध्ये पहिली ‘रेड लाईन’ खुली झाल्यानंतर ठरावीक अंतरांनी २०११ पर्यंत सहा लाईन्स खुल्या करण्यात आल्या आहेत. तीसरा आणि अंतीम टप्पा आता पुर्णत्त्वाकडे जाईल.
यादरम्यान संकटे आलीच नाहीत असं नाही. मात्र ‘चलता है’ ही सरकारी बाबुगीरी सोडून त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे श्रीधरन यांनी सगळ्यांचीच मने जिंकली. सरकारचे सुद्धा. मध्यंतरी दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला तेव्हा ‘डॉ. श्रीधरन यांची आम्हाला गरज आहे’ असं सांगत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी तो तात्काळ ‘नामंजूर’ केला होता.
राजकारण व भ्रष्टाचार यामध्ये रुतलेल्या भारतासारख्या देशात एक व्यक्ती भव्य व अद्ययावत प्रकल्प वेळेत आणि जादा खर्च होऊ न देता कसे काय पूर्ण करते हा प्रश्न जगाला पडला. श्रीधरन यांची दखल मग जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी घेतली नसती तरच नवल.
देशाच्या सगळ्याच भागात अनेक वर्ष काम केल्याने श्रीधरन यांची विषिष्ट कार्यशैली तयार झाली आहे. थंडगार ‘एसी केबिन’मध्ये न बसता साईटवर प्रत्यक्ष जाऊन काम करण्याची यांची खासीयत आहे. वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील दर शनिवारी कोणत्याही साईटवर भेट देऊन ते प्रत्यक्ष कामाची पहाणी करत असत. एंशिच्या घरात असणारा हा माणुस तरूणांबरोबर तरूण म्हणुन काम करतांना निर्मितीशील वातावरण निर्माण करतो. म्हणून दुप्पट-तिप्पट पगाराच्या ऑफर्स नाकारून तरुण अभियंते या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी श्रीधरनभोवती गर्दी करतात. रेल्वे प्रकल्प बांधणे हे त्यांचे कर्तृत्त्व आभाळाएवढे असले तरी नव्या कार्यक्षम इजिनिअर्सची एक पिढी घडवणे हे त्यांचे कार्य त्यांना या आभाळातला सुर्य बनवते.
काम करण्याच्या आनंदात म्हातारं व्हायला वेळच मिळाला नाही असं ते म्हणतात. भारतातील अभियांत्रीकी क्षेत्राचे सदगुरू मोक्षगुंडम विश्वेवरैय्या यांची आठवण करून देणारंच हे व्यक्तीमत्त्व नाही का? काही काळापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला व केरळच्या विधानसभेच्या निवडणूकीत भाग घेतला होता.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३.
संदर्भ. इंटरनेट/ गौरांग प्रभु.
पुणे.
Leave a Reply