जहाज रशियाच्या तॉप्से पोर्ट मधून फ्रान्स कडे निघाले होते. ब्लॅक सी मधून इस्तम्बूल मार्गे मेडिटेरेनियन सी मध्ये जाणार होते. पहाटे चार वाजता पोर्ट मधून कार्गो लोड करून निघाल्यावर सकाळी सहा वाजता इंजिन फुल अहेड आर पी एम वर सेट केले गेले. ब्लॅक सी मधील गार थंड हवा आणि नुकत्याच सूर्योदयामुळे पसरलेल्या सुवर्ण किरणोत्सर्गाने जहाजाच्या पूर्वेला एक सुंदर देखावा बघायला मिळत होता. कार्गो लोडींग सुरु असल्याने वॉच संपल्यावर चीफ इंजिनियरने इंजिन फुल अहेड मध्ये सेट झाल्यावर सगळ्यांना सुट्टी घ्यायला सांगितले होते. दुपारी बारा वाजता, चार वाजता आणि रात्री दहा वाजता असे एक एक तासाचे ड्युटी इंजिनियर आणि मोटरमन राउंड घेणार होते बाकी सगळ्यांना पूर्ण दिवस ऑफ.
दुपारी जेवण झाल्यावर स्मोक रूम मध्ये सगळ्या इंजिनियर्सनी तेजाब पिक्चर पाहिला इलेक्ट्रिकल ऑफिसर पेंगता पेंगता झोपला पण डिंग डाँग डिंग गाणे लागल्यावर खडबडून जागा झाला. साडे बारा वाजता पिक्चर बघायला सुरुवात केली होती आणि जवळपास तीन वाजताच्या सुमारास स्मोक रूमच्या अलार्म पॅनल वर इंजिन रूम मधील अलार्मचा बीप वाजायला लागला. त्यादिवशी फोर्थ इंजिनियरचा वॉच असल्याने तो उठला आणि जाऊ लागला, जाताना सेकंड इंजिनियरला म्हणाला लुब ऑइल प्युरिफायरचा अलार्म आला आहे. सेकंडने त्याला सांगितले आताच तासभर राउंड घेऊन मग एकदम दहा वाजताच राउंड घ्यायला पुन्हा जा.
सगळ्या इंजिनियर्स आणि संपूर्ण इंजिन टीम एकमेकांना सांभाळून आणि समजून घेऊन आनंदात काम करत होते.
चीफ इंजिनियरने सेकंड इंजिनियरला सांगून ठेवले होते, ज्याला त्याला ज्याचे त्याचे काम करू दे आणि काम नसेल किंवा एखाद दिवशी जास्त काम झाले तर सगळ्यांना पुरेशी विश्रांती मिळेल असे नियोजन करत जा. बॉयलर, प्युरिफायर्स, जनरेटर, मेन इंजिन अशी ज्याची त्याची कामे प्रत्येक जण करत होताच पण एकमेकांना मदत सुद्धा करायचे इंजिन रूम मध्ये सगळं वातावरण खेळीमेळीचे होते.
वयाने आणि अनुभवाने सिनियर असलेले मोटरमन आणि फिटर जुनियर इंजिनीयर्सना मनापासून मदत करायचे आणि कोणतेही काम करा असं सांगण्याची वेळ येऊ द्यायचे नाहीत.
संध्यकाळी सात वाजता डिनर झाल्यावर ब्रिजवर गेलो असता तिथून पाण्यात बुडणारा सूर्य लाल छटांसह तांबडाभडक झाला होता. क्षणा क्षणाला पाण्याखाली जाणारी सूर्याची आकृती लहान लहान होता होता संपूर्ण नाहीशी झाली. सूर्य दिसेनासा झाला तरीही आभाळातून प्रकाश परावर्तित होत होता. हळू हळू काळोखाचे साम्राज्य पसरायला लागले होते. तृतीयेची चंद्रकोर आकाशात उमटली होती पण गडद काळोखात तिचा प्रकाश जाणवत नव्हता. काळोखाला आणि पाण्याला चिरत जहाज वेगाने पुढे पुढे जात होते. ब्रिजवर संपूर्ण अंधार असतो नेव्हिगेशनल उपाकरणांची लाईट सुद्धा डिम केलेली होती. अर्धा तासभर गार वाऱ्याला अंगावर झेलत ब्रिजवर पोर्ट साईड कडून स्टारबोर्ड साईडला ये जा करून केबिन मध्ये परतलो.
रात्री दहा साडे दहा वाजता झोप लागली असेल आणि दीड च्या सुमारास केबिन मध्ये फोनची दोन वेळा रिंग वाजली आणि फोन उचलायच्या आत रिंग बंद झाली. तरीसुद्धा इंजिन रूम मध्ये कॉल केला पण फोन उचलला न गेल्याने कोणाचा तरी चुकून लागला असेल असे समजून पुन्हा झोप लागली.
सकाळी साडे चार वाजताच जहाजाच्या पब्लिक अड्रेस सिस्टीम वर अनाउन्समेंट झाली, चीफ ऑफिसर कॅडेट चे नांव पुकारून त्याला ब्रिजवर कॉल करायला सांगत होता. पहाटे चार वाजता कॅडेट चीफ ऑफिसर सोबत ब्रिजवर वॉच साठी रोज जात असतो पण आज साडे चार वाजले तरी तो ब्रिजवर गेला नव्हता. सव्वा चार पर्यंत त्याची वाट बघून केबिन मध्ये फोन केला पण त्याने फोन उचलला नाही म्हणून ड्युटी एबी त्याच्या केबिन मध्ये गेला, दरवाजा वाजवून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्याने दरवाजा उघडून आत पाहिले तर केबिन मध्ये कॅडेट नव्हता, एबी गॅली, मेस रूम आणि स्मोक रूम मध्ये सुद्धा कॅडेटला शोधून आला. शेवटी कॅडेट कोणाच्या केबिन मध्ये गप्पा मारायला गेला असावा आणि तिथेच झोपला असावा असा विचार करून चीफ ऑफिसरने अनाउन्समेंट केली. आणखीन पंधरा मिनिटांनी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करून सगळ्यांना मस्टर स्टेशनवर यायला सांगितले. अनाउन्समेंट मुळे सगळे अगोदरच जागे झाले होते तरीही मस्टर स्टेशनवर सगळे डोळे चोळत येऊ लागले. कॅप्टन ब्रिजवरून वॉकी टॉकी वर सूचना देऊ लागला. चीफ ऑफिसर ने सगळ्यांना कॅडेट बद्दल विचारले. कोणी त्याला शेवटचे पाहिले, शेवटचे तो कोणाशी काय बोलला वगैरे वगैरे.
चीफ कुक ने सांगितले की रात्री साडे आठ वाजता कॅडेट दुध पाहिजे म्हणून फ्रिज रूमच्या चाव्या घेऊन गेला होता. चीफ कुक शिवाय साडे आठ नंतर कॅडेट ला कोणी पाहिले नव्हते की कोणी बोलले नव्हते.
कॅडेट रात्री पासून कुठे आणि कधी गेला असावा याचा सगळे विचार करायला लागले. कोणीतरी बोलला की ही आजची पोरं जरा कोणी बोलले, किंवा प्रेमभंग झाला की लगेच जीवाचं बरे वाईट करून घेतात, आता ह्याने काळोखात पाण्यात उडी मारली की कुठं जाऊन लटकलाय, कुठे कुठे शोधायचे.
कॅप्टन ने वॉकी टॉकी वर विचारले कॅडेट ला शेवटचे कोणी पाहिले, चीफ ऑफिसर म्हणाला चीफ कुक कडे फ्रिज रूम ची चावी न्यायला गेला होता त्यानंतर कोणीच नाही. कॅप्टन ने विचारले चावी कशासाठी नेली त्याने, चीफ ऑफिसर म्हणाला दूध आणण्यासाठी. कॅप्टन ने विचारले त्याने दूध काढून झाल्यावर पुन्हा चावी नेऊन दिली का? चीफ ऑफिसर ने चीफ कुक कडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले. कुक ने नकारार्थी मान डोलवल्यावर चीफ ऑफिसर ने वॉकी टॉकीवर कॅप्टनला निगेटिव्ह म्हणून रिप्लाय दिला.
चीफ इंजिनियर म्हणाला चला पहिले फ्रिज रूम मध्ये जाऊन बघूया. गॅली मधून फ्रिज रूम कडे जाणारा दरवाजा उघडा बघून सगळ्यांना हायसे वाटले पण जर तो फ्रिज रूम मध्ये अडकला असेल तर कधीपासून थंडीमुळे तो जिवंत तरी राहिला असेल का या शंकेने सगळे पुन्हा चिंतीत झाले.
चीफ कुक ने फ्रिज रूमचा दरवाजा उघडला दरवाजा पलीकडे कॉमन लॉबीतून मीट रूम वेज रूमचे दरवाजे होते, वेज रूमच्या दरवाजा आतून वाजवल्याचा आवाज यायला लागला. सगळ्यांना पुन्हा एकदा हायसे वाटले वेज रूमचा दरवाजा उघडल्यावर आत थंडीने कुडकुडणारा कॅडेटला पाहून सगळ्यांना आनंद झाला.
त्याला लगेचच अंगावर ब्लॅंकेट टाकून गरम दूध प्यायला दिले. थंडी मुळे कॅडेटची बोबडी वळली होती. कॅप्टन खाली आला होता आणि कॅडेटकडे बघू लागला. कॅडेट सांगू लागला, काल रात्री दूध काढण्यासाठी मी चावी नेली पण दूध काढायला सकाळी वॉच वर जाण्यापूर्वी खाली फ्रिज रूम मध्ये गेलो. बॉक्स मधून दूध काढायला गेलो आणि दरवाजा धाडकन बंद झाला. खूप प्रयत्न केला उघडायला पण दरवाजा एकदम घट्ट बसला. चीफ इंजिनियरने त्याला विचारले, तू फ्रिज रूम मध्ये अलार्म चे बटण आहे ते का नाही दाबले? कॅडेट म्हणाला कुठे आहे बटण, मला माहिती नाही. चीफ इंजिनियरने त्याला बटण दाखवायला नेले तर, अलार्मचे बटण टोमॅटोच्या एकावर एक ठेवलेल्या क्रेटच्या मागे झाकले गेलेले आढळून आले.
वेज रूम चे टेम्परेचर चार ते पाच डिग्री असते तर मीट आणि फिश रूम चे मायनस पंधरा डिग्री. दोन्ही रूम चे दरवाजे हवेच्या दाबा मुळे आणि व्हॅक्युम मुळे दरवाजे कधी कधी एवढे घट्ट लागतात की उघडता येत नाही. त्याचमुळे या रूम मध्ये एक अलार्म चे बटण असते, जेणेकरून कोणी व्यक्ती अडकला तर ते बटण दाबल्यावर इंजिन रूम मध्ये अलार्म वाजतो. त्यामुळे कोणीतरी फ्रिज रूम मध्ये अडकला आहे हे इतरांना कळते. कॅडेट नवीन असल्याने आणि त्याला याबद्दल ईतर कोणीही माहिती दिली नसल्याने त्याच्यावर हा प्रसंग ओढवला. चार पाच डिग्री मध्ये जवळपास एक तासभर तग धरण्यासाठी त्याने वेज रूम मधील भाज्यांचे जाड पुठयांचे बॉक्स फाडून स्वतःभोवती लपेटून घेऊन प्रसंगावधान दाखवले होते.
कोणालाही न कळवता तो एकटाच फ्रिज रूम मध्ये गेल्यामुळे कॅप्टनने त्याला वॉर्निंग दिली तसेच त्याला अलार्म बद्दल माहिती न दिल्याबद्द्ल चीफ ऑफिसरला सुद्धा सुनावले. चीफ कुक आणि स्टीवर्डला दूध, ब्रेड आणि अंडी तसेच नूडल्स यांचा स्टॉक मेस रूम मधील लहान फ्रिज मध्ये रोजच्या रोज भरून ठेवायला सांगितले.
पुढील तीन चार दिवस सगळेच जण कॅडेट कडे दूध आणून देतोस का म्हणून चिडवत होते.
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B.E.(mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply