मनाचा आढावा घेणारे आपले मानसशास्त्रज्ञ नेहमीच आपल्याला स्वतः चा शोध घ्यायला शिकवतात. कदाचित आपण कधी तितके स्वतः चे परीक्षण आजवर केले ही नसू पण त्यांनी अनेक प्रयोगा द्वारे त्याची जाणीव करून दिली आहे. आज त्यांनी केलेला असाच एक प्रयोग तुमच्या समोर मांडत आहे.
हा एक सुंदर मेसेज मला पाठवला होता, त्यात खूप काही शिकण्या सारखं आहे म्हणून आज शेअर करीत आहे.
मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी! काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला, एका नव्याकोऱ्या, अलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता, आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते, पण एक प्रयोग म्हणुन ह्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले. त्यांच्या सांगण्यावरुन हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी, अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहुन बाजुला काढुन ठेवण्यात आली. आता एक वेगळीच गंमत सुरु झाली, हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहुन हरखुन गेला खरा, पण आल्याबरोबर काही क्षणात त्याचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले. शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर चर्चा केली, ही टाईल बसवायची राहीली का? का ती बाजुला गळुन पडली? ह्यावर तावातावाने वादविवाद झडू लागले. हॉटेल मालकाच्या ह्या एका निष्काळजीपणा मुळे हॉटेलच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे, असेही शेकडो जणांनी बोलुन दाखवले. एवढेच नाही, त्या हॉटेलमध्ये आल्यावर पाहुण्यांना कसे वाटले, ह्याविषयी पाहुण्यांना फिडबॅक भरुन द्यायचा होता, त्यामध्ये बहुतांश जणांनी अगदी थोडक्यात हॉटेलची डिझाईन, तिथले इंटेरीअर, तिथले लॅंडस्केपींग आणि तिथल्या महागड्या कलाकुसरीच्या वस्तु ह्याविषयी अगदी थोडक्यात लिहले, आणि मिसिंग टाईल बद्द्ल अगदी भरभरुन लिहले.
त्या हॉटेलमध्ये जागोजागी, एकाहुन एक देखणी, आकर्षक शिल्पे ठेवण्यात आली होती, पाहतच राहाव्यात अशा सुंदर सुंदर पेंटींग्ज होत्या, आकर्षक रंगसंगती असलेल्या अनेक भिंती होत्या, मानसशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरुन एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर मात्र दोन काळे डाग जाणुनबुजुन ठेवण्यात आले होते. खरेतर ते डाग इतके छोटे होते की एकुण भिंतीच्या दहा टक्के सुद्धा त्यांचा आकार नव्हता, पण मिसींग टाईल प्रमाणे ह्या डागांकडेही लोकांचे चटकन लक्ष जाऊ लागले. लोक एकमेकांना उत्साहाने ते डाग दाखवू लागले, सगळे काही इतके छान बनवले, पण हे दोन डाग मात्र तसेच राहीले ह्याबद्द्ल आश्चर्य व्यक्त करु लागले. काही काही अतिउत्साही लोक तर फक्त बांधकामातल्या फक्त चुकाच शोधु लागले, एकमेकांना टाळ्या देऊन हॉटेलमधल्या उणीवा सेलिब्रेट करु लागले. शेवटी हॉटेलच्या उदघटनाच्या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगाविषयी खुलासा केला, “आल्याबरोबर लॉबीमध्ये दिसणारी मिसींग टाईल जाणुन बुजुन काढुन ठेवण्यात आली होती”, “मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर दोन डाग मुद्दाम उमटवण्यात आले होते”, आणि माणसांचे ह्या दोन्ही गोष्टींवरचे प्रतिसाद जाणुन घ्यायचे होते, आणि रिझल्ट धक्कादायक म्हणावा असाच होता, हॉटेलमध्ये स्तुती कराव्यात अशा शेकडो, हजारो गोष्टी मांडुन ठेवण्यात आलेल्या असतानाही, बहुतांश लोकांनी फिडबॅक फॉर्ममध्ये मिसींग टाईल आणि डागांचाच उल्लेख केला होता, कमतरता शोधणं, पाहताक्षणी चुका काढणं, दोष काढुन नावं ठेवणं, ही माणसाची वृत्ती जन्मतः असते का? नाही.
पण जसजसे आपण मोठे होतो, आपल्याला कमतरता आणि उणीवा शोधण्याची सवय लागते, मग कधी आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात असलेल्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवतो, त्यावर चर्चा करतो, तर कधी आपण स्वतःच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स मोजत बसण्यात आपली बहुमुल्य उर्जा आणि बहुमुल्य वेळ खर्च करतो.
तुमच्या दृष्टीक्षेपात अशी कोणी व्यक्ति आहे का जी सर्व गुण संपन्न आहे किंवा जिच्या आयुष्यात कसलीच कमी नाही? प्रत्येकाच्या जीवनात “थोडा है, थोडे की जरूरत है” असेच आहे. पण ज्याला आयुष्यात काही मिळवायचे आहे, तो आजुबाजुला लपलेल्या संधी शोधतो. ज्याला आयुष्यात काही करायचेच नाही, तो मात्र फक्त काम न करण्याचेच बहाणे शोधतो. आज अशी कितीतरी महान विभूति आपल्या समोर आहेत त्यांनी अनेक कष्ट सहन करून, अपयश पचुन पुन्हा पुन्हा उठून उभे राहण्याचा प्रयत्न केला. मेहनत केली आणि आपली एक ओळख बनवली. प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्ति ज्यांनी उंच शिखर गाठले ते आपल्या आत्मविश्वासाने, चिकटीने, काबाड कष्टाने. आपण अश्या आदर्श व्यक्तींना नजरे समोर ठेऊन जीवनाच्या ह्या वाटेवर पुढे जावे. उणिवांकडे पाहत बसण्यापेक्षां आपल्या अवती भवती काय पॉझीटिवीटी आहे, याच्याकडे लक्ष केंद्रित केले तर जीवनच बदलून जाईल नाही का?
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply