अतिपरीचयाने अवज्ञा झालेली एक मोहक वनस्पती. ऊनपावसाने सतत न्हाऊन सदैव ताजीतवानी असलेली . श्रावणात निसर्गाने धरती रंगवायला घेतली की माळरानांवरील पायवाटांच्या दोन्ही बाजूने तेरड्याच्या भल्या मोठ्या रांगोळ्या पसरायला सुरुवात होते. गुलाबी , निळसर , पांढरी , लाल रंगांची हजारो फुले पाणीदार फांद्यांवर लटकू लागतात. जवळ जाऊन पाहिले तरच त्या फुलांची आगळी वेगळी रचना लक्षात येते . खुडल्यावर मात्र ही नाजूक फुलं लवकर कोमेजतात.
या वनस्पतीचे नैसर्गिक ताटवे म्हणजे वरुण राजाच्या मिरवणुकीतील रंगीत तुकड्याच . त्याच्याबरोबर येणार आणि त्याच्या बरोबरच जाणार . तशी अल्पायुषीच . फुलांच्या पाठोपाठ मोहरीच्या दाण्यांइतक्या आकाराच्या बिया भरलेल्या पोपटी रंगाच्या छोटया छोटया शेंगा अवतरणार. तयार झाल्या की थोड्याशा स्पर्शाने किंवा वाऱ्याच्या माऱ्यानेही फुटून बियांची उधळण करणाऱ्या. पुढच्या वर्षी , जिथून पसरल्या त्याभोवती एकाच्या जागी शेकडो रोपांना जन्म देणाऱ्या प्रजातीचा प्रसार व्हावा म्हणून उगमापासून दूर जाऊन , रुजून तिथे अनेक रोपं उभी राहावी यासाठी अगम्य निसर्गाने केलेल्या आणखी एका योजनेची प्रचीती देणाऱ्या .
लहानपणी अलिबागला मराठी शाळेत असताना , लागूनच असलेल्या कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळाभोवती असलेल्या मोकळ्या मैदानातील , त्या पूर्ण जागेला आच्छादून टाकणारी तेव्हांची विविधरंगी तेरड्याची पर्जन्यबाग आठवली. पाणारलेल्या खोडांच्या त्या हजारो रोपांपैकी जवळचेच , त्यातल्या त्यात जाड खोड पाहून त्याच्या वाकवल्यावर सहज तुटणाऱ्या कांड्या करून त्याने पाटी पुसण्याचे दिवस आठवले . दुसऱ्यांसाठी आनंदाचे निधान व्हायला दीर्घायु्ष्याची गरज नसते हे सिद्ध करणारा तेरडा…….
-अजित देशमुख
(नि) अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007
ajitdeshmukh70@yahoo.in
Leave a Reply