नवीन लेखन...

मोक्षभूमी अक्कलकोट !

स्वामी भक्तांनो……

आपला देश हा पहिल्यापासूनच धार्मिकतेकडे ओढ असणारा आहे. धर्म आणि संस्कृती हिच आपल्या देशाची ओळख आहे. आपल्या देशाच्या मागिल हजारो वर्षाच्या इतिहासात आपण कधीच कोणावर स्वत:हून आक्रमण केलेले नाही. अथवा हल्ला केला नाही. आपण फक्त बचावासाठीच हातामध्ये शस्त्र घेतलेले आहे.  कारण आपल्यावर संस्कारच तसे आहेत की, जगा आणि जगू द्या. आपल्या धर्मात काही सिध्दांत घालून दिलेले आहेत. अन् तेच सिध्दांत आपण आजपर्यंत पाळत आलेले आहोत. आपल्या सर्वांच्या अंत:पटलावर जीवन जगत असताना एकच अंतिम सत्य कोरले जाते, ते म्हणजे आपल्याला या जीवनात असे काही कर्म करायचे आहे की, जेणेकरुण आपल्याला लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवता येईल. आपल्याला मोक्षप्राप्ती साधता येईल. हीच प्रत्येकाची भावना असते. कारण आपल्याला प्रत्येकालाच मोक्ष किंवा मुक्ती हवी आहे. अन् हा मोक्ष किंवा ही मुक्ती सदैव सत्कर्म केल्यानेच प्राप्त होते. त्यामुळेच आपल्या मनावर चांगले संस्कार झालेले आहेत. आपण प्रत्येकजण मोक्ष प्राप्तीसाठी धडपडत असतो किंवा आपल्याला अमर व्हायचे असते.

आपल्या सर्वं संतानी सुध्दा मोक्ष वा मुक्ती यावरच विपूल साहित्य रचना केलेली आहे. हा मोक्ष मिळविण्यासाठी काय काय करायला पाहिजे, याची पुर्ण शिकवण संतानी आपल्या साहित्याद्वारे सर्वांसमोर ठेवली आहे. तसेच मोक्षप्राप्तीत कोणत्या बाबी अडथळा ठरतात किंवा कोणत्या बाबी टाळल्या पाहिजेत, याचेही सविस्तर विवेचन आपल्याला सर्व संत साहित्यात विपूल प्रमाणात दिसून येईल. यासर्व बाबी पाहता मोक्षाचे महत्व आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल. आजचा आपला अभंग ही याच विषयावर मार्गदर्शन करणारा आहे. श्री स्वामीसुत महाराजांनी आजच्या अभंगाद्वारे हा दुर्लभ मोक्ष सुलभ कशाने होतो किंवा हा मोक्ष कसा प्राप्त करायचा यावर सविस्तर विवेचन केले आहे. तेव्हा अधिक वेळ न दवडता आपण आजच्या अभंगाला सुरूवात करू या…..

अमरकोट भलें अक्कलकोटा नांव ।   जेथे स्वामीराव वसतसे ॥1॥

अद्भूत चमत्कार दाखविले दृष्टीं ।  तोचि जगजेठी-विश्वपाळ ॥2॥

जाऊनियां तेथे रूप तेचि पाहावें । सेवेसी लागावें, मनोभावें ॥3॥

नरनारी तुम्हीं हेचि काम करा।  मनोरथ पुरा होय येणें ॥4॥

स्वामीसुत म्हणे अमरकोट गांव ।  शोभतसे नांव स्वामीसत्तें ॥5॥

आजच्या आपल्या अभंगाद्वारे श्री स्वामीसुत महाराज अक्कलकोट भूमीचे महत्व प्रतिपादन करत आहेत. अक्कलकोट हेच मोक्षधाम आहे, हे समजावून सांगतानाच मोक्षाचे रहस्य उलगडून सांगत आहेत. स्वामीसुत सांगतात, या भूतलावर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने अक्कलकोट हे एकमेव मोक्षधाम बनले आहे. त्यामुळे या अक्कलकोटाला अमरकोट हे नाव शोभून दिसते. जो अक्कलकोटी येऊन, स्वामी चरणी विसावतो तो अमर होतो, तो मोक्षाचा धनी होतो. जगात इतरत्र मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अनंत प्रकारच्या साधना कराव्या लागतात. अनेक खडतर असे अनुष्ठान करावे लागतात. पण अक्कलकोट हे भूतलावरील एकमेव असे ठिकाण आहे, येथे केवळ स्वामी दर्शनाने मोक्ष प्राप्ती होते. येथे येणारा प्रत्येक जीव हा अमर होतो. म्हणून अक्कलकोट हे अमरकोट आहे. असे स्वामीसुतांना वाटते.

या अक्कलकोटात श्री स्वामी देवांनी अनंत अद्भुत चमत्कार लोकांना दाखवले आहेत. हे चमत्कार आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहणारे लोक धन्य धन्य आहेत. ज्यांना प्रत्यक्ष विश्वाचे पालन पोषण करणाऱ्या परब्रह्माच्या लीला पाहण्याचे सद्भाग्य लाभले. जो सर्वं जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयास कारणीभूत आहे, त्या जगजेठी स्वामींच्या समवेत राहण्याचे आणि त्यांचा सहवास लाभण्याचे भाग्य मिळणारे प्राणी देवांनाही वंदनीय आहेत. एवढे अक्कलकोटीच्या लोकांचे परमभाग्य आहे. हे भाग्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपण ही अक्कलकोटी जाऊन स्वामींचे पवित्र पावन आणि सर्वांगसुंदर रुप पाहून स्वत:ला धन्य करून घ्यावे. तेथे जाऊन स्वामींची मनोभावे सेवा करावी. आपल्यातील षडविकारांचा त्याग करून, स्वामी महाराजांना पुर्णपणे शरण जावे. स्वामींची चरण धुली आपल्या मस्तकी धारण करावी. स्वामी नामाचा जयघोष करावा. सर्व स्त्री-पुरुषांनी हेच एक व्रत अंगिकारावे, स्वामींच्या सेवेत आपले चित्त एकाग्र करावे. स्वामी उपासनेलाच आपली स्नान संध्या मानावे. याने आपले सर्व मनोरथ पुर्ण होतील. आपल्या सर्व ईच्छा आकांक्षा पुर्ण होतील. स्वामी महाराज हे कल्पवृक्षाप्रमाणे आपल्याला हवे ते अगदी सहज देतात. ज्या स्वामींनी ही चराचर सृष्टी निर्माण केली आहे, त्यांना अशक्य असे काहीच नाही. जे ईतर कोणालाही शक्य नाही, ते सुध्दा स्वामींना शक्य आहे. म्हणून ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ असे म्हटंले जाते. तेव्हा आपण मनातील सर्व शंका दुर करून स्वामींना शरण जावे, स्वामी आपली नौका नक्कीच पैलतीरी नेतील. असा विश्वास स्वामीसुत व्यक्त करतात.

ब्रह्मांडनायक स्वामी महाराज दीनांचे कैवारी आहेत, भक्तकाजकल्पद्रुम आहेत. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वंयपुर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच ‘श्री स्वामी समर्थ’ हे नाव शोभून दिसते. अशा सर्वेश्वर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत आणि पवित्र पावन झालेले अक्कलकोट हे भूवैकुंठ म्हणून नावारुपास आलेले आहे. जसे वैकुंठधाम हे मुक्तीचे माहेर घर आहे, तसेच अक्कलकोट हे सुध्दा स्वामींच्या पदस्पर्शाने मुक्तीचे माहेरघर बनले आहे. पुर्वीचे प्रज्ञापूर हे नाव असलेले गाव स्वामींच्या आगमनाने अक्कलकोट बनले. तेच अक्कलकोट स्वामींच्या वास्तव्याने आता अक्कलकोट ऐवजी अमरकोट म्हणून शोभून दिसत आहे. स्वामी कृपेने जो अक्कलकोटी येईल तो मुक्तीचा वाटेकरी होत आहे. तेव्हा अगदी सहजतेने मुक्ती देणारे हे गांव समर्थ कृनेने अमरपूर किंवा अमरकोटच बनले आहे.

अक्कलकोटी येणारा प्रत्येक जीव हा लक्ष 84 योनींचा फेरा चुकवून अमरधामाला प्राप्त होतो. एवढे श्रेष्ठत्व या गांवाला स्वामी सत्तेने प्राप्त झालेले आहे. तेव्हा आपण आपला उध्दार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट जवळ करावे, असा संदेश स्वामीसुत देतात.

सज्जनहो, पुर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 23 वर्षांच्या वास्तव्याने अक्कलकोटची भूमी पवित्र आणि पावन झाली आहे. तेथील चराचरात आणि मातीच्या कणांकणात स्वामींचे चैतन्य भरलेले आहे. तेथिल प्रत्येक घर आणि प्रत्येक मंदिर हे स्वामींच्या लीलेचे साक्षीदार आहेत. तेथील वटवृक्ष मंदिरातील महाकाय वटवृक्ष हा सुध्दा स्वामींच्या अस्तिवाची साक्ष देत उभा आहे. याच वडाच्या झाडाखाली परब्रह्म विराजमान होत असे, या वृक्षाचे भाग्य ते केवढे थोर म्हणावे, जेथे परब्रह्म विसावा घेत असे. आज हे वडाचे झाड स्वामींच्या अस्तिवांचे आणि अगाध शक्तींचे गुणगात गात दिमाखाने डौलत उभा आहे. तेव्हा आपण आपल्या जीवनाचे सार्थक करुन घेण्यासाठी अथवा मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अक्कलकोटी जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे. स्वामींच्या दारातील चरण धुली आपल्या मस्तकी धारण करावी. या वटवृक्षाखाली ध्यान करावे, याने आपला हा नरदेह सत्कार्या लागेल. आपला जन्म मरणाचा फेरा चुकेल. स्वामी कृपेने आपण ही अमरधामाचे वाटेकरी होऊ आणि जीवनमुक्त होऊन स्वामींच्या सहवासात स्वामी लोकांत स्थान प्राप्त करून घेऊ. तेव्हा चला तर मग अक्कलकोट निवासी पुर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम गाऊ या…! अन् अक्कलकोटी जाऊ या….!

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।

सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥

अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !

अक्कलकोट स्वामी महाराज की जय !

॥ श्री स्वामीसुत महाराज की जय ॥

— सुनिल कनले 

सुनिल कनले
About सुनिल कनले 16 Articles
श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..