कापडनिर्मिती करताना काही अडचणी येउ शकतात. त्यापैकी काही अडचणींवर सतर्क अशा कारागिराकडून मात करता येते. पण काहीवेळा ते शक्य नसते. तर काही दोष निर्माण होणे टाळता येते, पण काहीवेळा असे दोष कापडात राहतात. म्हणून उत्पादन झालेले सर्व कापड विक्रीला पाठवण्यापूर्वी दोनवेळा त्याची तपासणी केली जाते. त्यामध्ये मागावर कापड तयार झाल्यावर ते काढतात आणि त्याची तपासणी करतात. याकरिता काचेखाली ट्यूबलाइट लावून विशिष्ट टेबल तयार केलेले असते. तिथे सर्व बारीक दोष दूर केले जातात. लोंबत असलेले धागे कापले जातात. मोठा दोष असेल तिथे कापड कापून पुन्हा चांगले कापड जोडून शिलाई केली जाते.
मग असे प्राथमिक तपासणी झालेले कापड पुढील प्रक्रियांसाठी पाठवले जातात. शेवटची प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा एकदा कापडाची तपासणी केली जाते. यावेळी दोषविरहित चांगले कापड आणि आवश्यक लांबीचे कापड अशी पहिली वर्गवारी केली जाते. या कापडाला त्याचा शंभर टक्के भाव कोणताही मिळतो.
दोष नसलेले पण आवश्यक लांबी नसलेले तुकडे मूळ किंमतीपेक्षा थोड्या कमी किंमतीला (५ ते १० टक्के) विकले जातात. यानंतरची वर्गवारी होते ती ‘सबस्टॅण्डर्ड‘ या नावाने. प्रत्यक्षात या वर्गातले कापड अगदी मामूली दोष असलेले असे असते. सर्वसामान्य व्यक्तीला दोष सहज लक्षातही येत नाही. हे कापड मूळ किमतीच्या १५ टक्के कमी किमतीला विकले जाते.
तसेच यापुढची वर्गवारी ‘सेकण्डस्’ या नावाने ओळखली जाते. या वर्गात मोडणारे कापड मात्र ठळक दोषासहित असते. व्यवस्थित निरीक्षण केल्यास सर्वांना हा दोष लक्षात येउढ शकतो. असा दोष असेल तिथे कापड फाटूही शकते. त्यामुळे त्याची विक्री मूळ किमतीच्या किमान ३० टक्के तरी कमी केली जाते.
‘सबस्टॅण्डर्ड‘ आणि ‘सेकण्डस्‘ असे शिक्के त्या कापडाच्या प्रत्येक मीटरवर मारलेले असतात. ते बघून त्यानुसार त्याला दर देणे जागरुक ग्राहकाचे लक्षण आहे. अन्यथा व्यापाऱ्यांकडून याबाबतीत सर्रास फसवणूक होते
दिलिप हेर्लेकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply