तात्यांची आज रिटायर्ड अॅनीव्हरसरी.
आज एक वर्ष झालं तात्यांना रिटायर्ड होवून.
निरोप समारंभ झोकात झाला होता.
लोक भरभरून बोलले होते.
आॅफिसमध्ये तात्या म्हणजे किल्लेदार.
कडक शिस्त , वेळेचे पाबंद आणि स्वच्छ तात्यांनी अनेक वर्षे हा गड राखला होता.
पण तात्या म्हणजे काटेरी हलवा होता.
इतके टोकदार काटेरी बोलायचे की स्वभावातला गोडवा समोरच्यापर्यंत पोचायचाच नाही.
…..चला उद्यापासून निवांत या. ईथला जल्लाद आता कायमचा सुट्टीवर गेलाय….
शेवटच्या दिवशी जिना उतरताना ‘हे’ ऐकलं आणि तात्या पहिल्यांदा शब्दांनी घायाळ झाले.
पण तेव्हा इलाजच नव्हता …
गड राखायचा तर कठोर व्हावंच लागणार…
चालायचंच.
ऊद्यापासून तात्यांची दुसरी ईनिंग सुरू होणार होती.
इथे मात्र तात्यांना सेन्चुरी मारायची होती.
घरी दोघंच दोघं.
तात्या आणि माई.
केशव दूर बंगळूरात.
गुऽऽऽड माॅर्निंग तात्या.
पहिली सकाळ… तात्यांनी आपल्या एरियाचा पूर्ण सर्व्हे केला.
तात्या कुलकर्णी …. आॅलवेज अवलेबल आणि स्वतःचा सेल नंबर ..अशी कार्डच छापून घेतली.
दुसरी सकाळ तात्यांच्या गाडीचा गिअर बदलून गेली.
बरोबर साडेसहा वाजता त्यांनी शेजारच्या सुशच्या घराची बेल दाबली.
ती नको नको म्हणत असताना , तिच्या छोट्या आदीला स्कूलबसपर्यंत पोचवला.
मस्त गोष्ट सांगत.
सुशला सकाळचं टाईमवाॅर जिंकणं आज बरचसं ईझी झालेलं.
बरोबर पावणेसात वाजता नाक्यावरच्या पेपरच्या स्टाॅलवर.
बनवारी , बिचारा पहाटे साडेचार वाजल्यापासून तिथं ऊभा असायचा.
तात्यांनी त्याला रिलीव्ह केला.
तो मोकळा होवून , चहा घेवून फ्रेश मूडमध्ये पंधराव्या मिनटाला परत आला.
सव्वासातला तात्यांनी घारापुर्यांच्या घराची बेल दाबली.
वहिनी तयारच होत्या.
घारापुरे गेली दोन वर्षे पॅरॅलाईज्ड होते.
तासाभरात वहिनी भाजी , दूध वगैरे ऊरकून परत आल्या.
तोवर तात्या घारापुरेंबरोबर गप्पांचा एकेरी फड जमवून बसलेले.
साडेआठ वाजता दूध घेवून तात्या घरी परत.
माॅर्निंग वाॅकला भेटणार्या प्रत्येक माणसाला तात्या आपलं आॅलवेज अवलेबल कार्ड देत आणि दिलसे गुडमार्निंग म्हणत.
माईंच्या चहाचं गोड गुणगान गावून झालं की पटापटा आवरून घेत.
साडेनऊ ते अकरा सोसायटीच्या कामात स्वतःला गुंतवून घेत.
दुपारी जेवणानंतर थोडीशी वा.कु.
मग संध्याकाळपर्यंत आॅलवेज अवलेबलवर फोन येत.
कुणाबरोबर बँकेत जा , एटीएमची वारी, असली सेवाकार्ये घडत.
एक तत्व मात्र तात्यांनी जपलं होतं.
शक्य असेल तेवढं हात न आखडता जरूर करायचं.
न झेपणारं असेल तर सरळ नाही म्हणायचं.
खरी गरज ओळखायला शिकायचं.
अर्थात प्रत्येक शब्द गुलाबजामून सारखा पाकात घोळलेलाच बोलायचा.
वर्षभर तात्यांचं हे असं चाललेलं.
एक वर्षात तात्या , ‘माॅर्निंग तात्या’ म्हणून एरियात वर्ल्ड फेमस.
नेमका आजच रिटायर्ड अॅनीव्हरसरीच्या दिवशी तात्यांचा सत्कार.
“आपलं माणूस” पुरस्कार दिला जाणार होता त्यांना.
टाळ्यांच्या गजरात तात्यांनी सत्कार स्विकारला.
तात्या बोलू लागले……
….. फार सेल्फीश आहे हो मी !.
लोकांनी जल्लादऐवजी प्रेमळ म्हणावं , म्हणून माॅर्निंग तात्या जन्माला आला.
मला ऊशीरा शहाणपण आलं.
तुम्ही मात्र रिटायरमेंटची वाट बघू नका.
जोडता नाही आलं तरी चालेल , शब्दांनी कुणाला तोडू नका.
छोटसं का होईना , दुसर्यासाठी एखादं काम दिवसभरात कधीही करा.
तुमच्या सोईनं.
मग बघा , तुमच्या आयुष्यातली गुड माॅर्निंग कधी संपायचीच नाही.
गुड आफ्टरनूनचा चटका नाही की गुडनाईटचा अंधार नाही.
ओन्ली झकास सोनसकाळ.
धन्यवाद. ..
डोळ्यांत झुंजूमुंजू करत तात्या खाली बसले.
लोकांनी ‘माॅर्निंग तात्या’ला टाळ्यांची जोरदार सलामी दिली……!
तात्यांचे हे भाषण मी लांबून ऐकत होतो….तसे मी काकांना अनेक वर्षे ओळखतो…..पण खरोखरीच आज तात्यांना पाहून खुप आनंद झाला….
आज रिटायरमेंट नंतर कसे होईल या विचारांनी डिप्रेस झालेले अनेक लोक दिसतात… घरी बसल्या बसल्या…घरच्या मंडळींना वैताग देत असतात….!
या सर्व मंडळींना हा तात्या निर्माण करणे जरूरीचे आहे !
WhatsApp वरुन आलेला हा लेख शेअर केलाय. लेखक माहित नाही
Leave a Reply