कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपल्या प्रयत्नांना चांगल्या गुरूची साथ आणि आशीर्वाद फार महत्वाचा असतो. कोणताही आदर्श गुरु हा शिष्याला निरपेक्षपणे कायम वाट दाखवत असतो आणि संगीताच्या क्षेत्रात तर गुरुशिवाय वाट चालणे फार अवघड आहे. याचे कारण म्हणजे भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे गुरु-शिष्य परंपरेतूनच अव्याहतपणे चालत आले आहे. तांत्रिक दृष्ट्या एखादा राग माहित असतो पण त्यातील स्वर लगाव, स्वरांचे चलन, स्वर-भाव इ. बारकावे मात्र आपण गुरुमुखातूनच शिकत असतो. संगीतातली आपली एक बंदिशही म्हणते “गुरूबिन कौन बतावे बाट”
शास्त्रीय संगीताच्या बाबतीत मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते कारण मला खूपच महान गुरु लाभले आहेत. सुरुवातीला विशारद पर्यंत ग्वाल्हेर घराण्याचे पं. विनायकराव पटवर्धन यांचे शिष्य पं. वसंतराव गोसावी, त्यानंतर थोडे दिवस पं. गजाननबुवा जोशी यांच्या शिष्या पंडिता शुभदा पराडकर यांच्याकडे शिकण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर आग्रा घराण्याचे दिग्गज पं. बबनराव हळदणकर यांनीही अत्यंत प्रेमाने मला आग्रा घराण्याचे काही खास राग शिकविले. मधल्या काळात मात्र खास जयपूर गायकीची आवड आणि उत्सुकता असणाऱ्या मला जयपूर घराण्याचे दिग्गज पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचे शिष्य पं. दिनकर पणशीकर यांच्याकडे शिकण्याचीही संधी मिळाली. या सर्वच गुरुंनी प्रेमाने आणि आपलेपणाने मला भरभरून संगीताचे ज्ञान देऊ केले आणि त्यांचे हे ऋण कधीही न फिटणारे असेच आहे. पण आज मात्र या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी माझे गुरु पं. दिनकर पणशीकर यांच्याबद्दल लिहिते आहे.
पणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत समृद्ध करणारे एक व्यक्तीमत्व आहे. व्याकरण, ज्योतिष, भाषा, कीर्तन इ. चा मोठा कौटुंबिक वारसा लाभलेल्या गुरुजींचा लहानपणापासूनच संगीताकडे ओढा होता. गुरुजींचे आजोबा व वडील हे संस्कृत पंडित तर एक ज्येष्ठ बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि दुसरे दाजीशास्त्री हे पुराणकाल अभ्यासक असताना याच कुटुंबातील गुरुजींनी मात्र संगीताची वेगळी वाट शोधली. गुजरातमधील पाटण येथे १९३६ मध्ये जन्म झालेल्या गुरुजींचे संगीताचे पहिले शिक्षण कुंटे गुरुजी यांच्याकडे आणि नंतर मुंबईत पं. वसंतराव कुलकर्णी, पं. माणिकराव ठाकूरदास आणि पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडे झाले. त्यानंतरच्या मधल्या काळात पुस्तकांबद्दलच्या आत्यंतिक प्रेमामुळे सेन्ट्रल बुक कंपनी, अलाईड पब्लिशर अशा पुस्तकांसंबंधी संस्थांमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवतानाच त्यांच्या पत्नी कै. मृणालिनी यांच्या विशेष प्रोत्साहनामुळे गुरुजींनी पुन्हा एकदा मूळच्या संगीत साधनेकडे वळण्याचा निर्णय घेतला. १९७२ ते १९८४ या एका सांगीतिक तपामध्ये जयपूर घराण्याच्या पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे पूर्ण वेळ संगीताला वाहून घेत गुरुजींनी जयपूर घराण्याची तालीम तर घेतलीच पण गुरुसेवेचे अवघड व्रतही पेलले. आपल्या गुरुकडून त्यांनी केवळ रागांचे ज्ञान संपादन केले नाही तर त्याचबरोबर त्यांची प्रयोगशीलता सुद्धा उचलली. भ्रमरवृत्तीने अनेक राग, त्यांचे वैविध्य समजून घेऊन जयपूर गायकीतील अनेक अनवट राग त्यातील element of surprise जपत रसिकांसमोर त्यांनी अनेकदा पेश केले आहेत. बसंती केदार, काफी कानडा, रामदासी मल्हार, विराट आणि शिवमत भैरव ही त्यातील काही उदाहरणे.
सतत नाविन्याचा शोध आणि ध्यास यातूनच मग आडा चौताल या थोड्याश्या उपेक्षित अशा तालामधील सौंदर्य गुरुजीना जाणवले, भावले आणि मग ते एका वेगळ्याच ध्येयाने भारले गेले. ह्या आडा चौतालच्या ओढीबद्दल ते एक वेगळाच किस्सा सांगतात तो असा “ पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकातील खासाहेबांच्या (वसंतराव देशपांडे ) शागीर्दाच्या भूमिकेत काम करताना आडा चौतालातील एक बंदिश त्यांना गाता येत नसे. त्या शागीर्दाच्या भूमिकेत ते चालून गेले व खासाहेब वसंतराव देशपांडे त्यांना त्या वेळी सांभाळूनही घेत असत.” पण तेव्हापासूनच त्या तालाची अनाहूत ओढ त्यांच्या अबोध मनात असावी. आडा चौताल तालातील उपलब्ध असलेल्या बंदिशींचा शोध घेताना त्यांना अंदाजे ४० ते ५० बंदिशी विविध पुस्तकांतून मिळाल्या. त्यात मुख्यत्वे पं. भातखंडे, पं. बलवंतराय भट, पं. रामाश्रय झा अशा संगीतकारांच्या बंदिशी होत्या. केवळ याच बंदिशींवर अवलंबून न राहता या आडा चौतालात नवनिर्मिती करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि गेली जवळपास १२ वर्षे आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी या तालात वेगवेगळ्या रागात स्व-रचित १५० बंदिशींची भर घालून जवळपास २०० बंदिशींचा खजिना निर्माण केला आहे. यातील काही रागांची उदाहरणे द्यायची तर मुलतानी, हमीर, संपूर्ण मालकौंस, ओडव बागेश्री, अंबिका सारंग अशी सांगता येतील. फक्त बंदिशींची रचना करून गुरुजी थांबले नाहीत, तर त्या बंदिशी पुस्तक रूपाने, सीडी च्या रूपात संगीताच्या अभ्यासकांसाठी त्यांनी खुल्या केल्या. या त्यांच्या निरपेक्षपणे केलेल्या कामाची दखल महाराष्ट्र सरकारने घेऊन गुरुजीना त्यांच्या ह्या योगदानाबद्दल फेलोशीप देऊन त्यांचा योग्य तो गौरव केला. या सर्व प्रवासात मग गोवा येथील कला अकादमीचे संचालक पद, ITC चा मानसन्मान, Musician of the Year (२००८) हा पुरस्कार, कर्नाटकमधील षडाक्षरी बुवांच्या नावाने दिला जाणारा षडाक्षरी गवई पुरस्कार (२०१८) आणि अत्यंत मानाचा समजला गेलेला चतुरंग संगीत सन्मान २०१९ हा पुरस्कारही त्यांना मिळाला. आजवर अविरतपणे विद्यादान करताना त्यांनी अनेकांना व अनेक ठिकाणी मुक्तहस्ते संगीतातील राग, बंदिशी, मांडणी, स्वरलगाव समजावून सांगितले आहेत. एक धाडसी, प्रयोगशील अशा बुद्धिवादी गायकापासून एक वाग्गेयकार, रचनाकार हा प्रवास आणि हे सर्व मोकळ्या मनाने हातचे काहीही न राखता आपल्या शिष्यांना देऊ करणारे हे गुरु केवळ असामान्य वाटतात. ह्या अशा गुरुजींचे दोन्ही सुपुत्र, शंतनु आणि भूपाल ह्यांनी देखील तबला व सतार आणि गायन अशा संगीत क्षेत्रात त्यांचे स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
आज ८३ वर्षांच्या वयातही अतिशय उत्साहाने आपल्या शिष्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याची त्यांची इच्छा, निरलसपणे आणि ध्येयाने आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊन सतत पुढे जात राहण्याची त्यांची वृत्ती आम्हा शिष्यांसमोर नक्कीच एक आदर्श निर्माण करते. त्यांचे संगीत क्षेत्रांतील योगदान मोठे आहेच पण त्या पलीकडे जाऊन एक गुरु म्हणून असलेले त्यांचे योगदान त्याहीपेक्षा खूप मोलाचे आहे. अशा या गुरूंचे ऋण फेडणे केवळ अशक्य आहे परंतु माझ्या मनातील त्यांच्या बद्दलचा आदर मी त्यांच्यापर्यंत कसा पोहोचविणार म्हणून हे लेखनाचे माध्यम !!
— डॉ. मानसी गोरे.
पुणे.
Leave a Reply