पैसे मिळविण्यासाठी कोणताही झटपट मार्ग नाही. त्यामुळे आंधळेपणाने कुठेही पसे गुंतवू नका, ती उधळपट्टी ठरेल. छोटी रक्कम खरेच दानधर्मासाठी वापरायची असेल तर त्यातुन आदिवासी मुलांसाठी दोन-तीन सायकली घ्या. त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी ५-६ किमी पायी चालावे लागते. सायकली मिळाल्यानंतरचा त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद पहा. मग तुम्हाला खर्या दानधर्मातला आनंद अनुभवायला मिळेल. जीवनाचा आणि देण्याचा अर्थ समजावून घ्या.
परवा माझा बदली ड्रायव्हर संजय माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘साहेब मी एका कंपनीचे काम सुरू केले आहे. त्यांची एक चांगली स्कीम आहे, तर माझ्या साहेबांना कधी घेऊन येऊ?’’ मी त्याला वेळ दिल्यावर त्याप्रमाणे ते लोक आले.
सुरवातीचे बोलणे झाल्यावर त्या लोकांनी मला त्यांच्या ग्रुपमधील कंपन्या कुठला कुठला व्यवसाय करतात त्याची माहिती द्यायला सुरवात केली. त्यांच्या ‘ग्रुप’ने आतापर्यंत लाखो रूपये गुंतवणुकदारांना दिले आहेत असे सांगुन मला काही फोटोही दाखवले. मग त्यांनी मला त्यांच्या स्कीमची माहिती देण्यास सुरवात केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी जर काही रक्कम गुंतवली तर सहा वर्षानंतर मला दुप्पट व नऊ वर्षानंतर तिप्पट रक्कम परत मिळेल. त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्कीमची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे व इतर साधनांबरोबर तुलना केली व त्यांची स्कीम खूप चांगली आहे हे पटवुन देण्याचा प्रयत्न केला.
आता मी त्यांना त्यांच्या ग्रुपमधील कंपन्यांची माहिती विचारण्यास सुरवात केली. मी त्यांना ते हे फिक्सड डिपॉझिट कुठल्या कंपनीत घेणार आहेत व त्याचा फॉर्म (अटी वगैरे छापलेला) त्यांनी आणला आहे का ते विचारले. त्यावर त्यांनी ‘तुम्ही चेक द्या, कंपनी तुम्हाला पोस्ट डेटेड चेक देईल’ असे सांगितले. मग मी त्यांना त्या कंपनीचे मागील तीन वर्षाचे अकौंटस माझ्या अभ्यासासाठी मागितले. आजपर्यंत कुणी न मागितलेल्या गोष्टी मी मागत होतो हे त्यांच्या चेहेर्यावरुन दिसत होते. एवढी चांगली स्कीम आणि हा माणूस उगाच काहितरी मागत आहे असे भाव!
शेवटी मी त्यांना एक कळीचा प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही मला जवळजवळ १८ टक्के परतावा देणार आहात. त्याशिवाय तुमची कंपनी तुम्हाला चांगले कमिशन देत असणार. वर पुन्हा कंपनीला त्यांचे खर्च,भागधारकांना लाभांश यासारख्या गोष्टी आहेत. तुमची कंपनी दानधर्म नक्कीच करत नसणार. म्हणजे त्यांना कमीतकमी ४० ते ५० टक्के नफा कमावला पाहिजे. तुमची कंपनी अशा कुठल्या व्यवसायात आहे कि जिथे एवढे खात्रीचे मार्जिन्स आहेत? आणि तेही पुढची इतकी वर्षे ?’’ त्यांनी समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास एका दमात रिकामा केला व अक्षरशः पळ काढला.
पुष्कळ माणसे झटपट पैसा मिळावा आणि तोहि फारसे श्रम न करता म्हणून झटपट मार्गाच्या शोधात असतात. त्यामुळेच समोरचा माणुस जी आश्वसने देत आहे ती वास्तववादी आहेत की नाहीत वा पूर्ण होऊ शकतील की नाही हेही पहात नाहीत. इथे लोभी मन बुध्दीवर मात करते. लोभाव्यतिरिक्त प्रत्येक माणसाच्या मनात एक जुगारी दडलेला असतो आणि या कंपन्या त्या जुगार्याला आवाहन करतात. यातील काहि कंपन्या रू. ३००० वा ५००० अशा कमी रकमेपासुन सुरवात करतात. त्यामुळे माणुस ‘चान्स घेऊन बघू’ असा विचार करतो. गाजराची पुंगी ! पैसे मिळाले तर ठीक नाहि तर छोटी रक्कम तर आहे असा विचार करुन लोक पैसे गुंतवतात. शिवाय मनात ही पण आशा असते की आपण लकी आहोत म्हणुन आपले पैसे बुडणार नाहित. त्याशिवाय काहि लोक तत्वज्ञानाचा आव आणून म्हणतात कि बुडाले तर दानधर्म केला असे समजू. वारे दानधर्म!
लक्षात ठेवा, पैसे मिळविण्यासाठी कोणताही झटपट मार्ग नाही. त्यामुळे आंधळेपणाने कुठेही पसे गुंतवू नका, ती उधळपट्टी ठरेल. छोटी रक्कम खरेच दानधर्मासाठी वापरायची असेल तर त्यातुन आदिवासी मुलांसाठी दोन-तीन सायकली घ्या. त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी ५-६ किमी पायी चालावे लागते. सायकली मिळाल्यानंतरचा त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद पहा. मग तुम्हाला खर्या दानधर्मातला आनंद अनुभवायला मिळेल. जीवनाचा आणि देण्याचा अर्थ समजावून घ्या.
— कालिदास वांजपे
Leave a Reply