काय होतं कुणास ठाऊक देवासंग नातं
अनवाणी चालत कुत्रं वारीला गेलं होतं
पाऊसपाण्यात जरी भिजलं होतं अंग
विठ्ठलाच्या गजरात तरी झालं होतं दंगं…!
चंद्रभागेच्या पाण्यात अंग ओलं केलं
मनात घेऊन वेडा भाव पायरीशी गेलं
दारामागच्या देवाला भेटणार तरी कसं
माणसांपुढे बिचा-याचं झालं होतं हासं.!
माणसाचा देव माणसांसाठी असतो
ज्याच्या खिशात पैसा त्यालाच तो दिसतो
पायरीवर बसून शेपूट हालवू लागलं
देवाला भेटण्यासाठी रातभर जागलं..!
निराश होऊन सकाळी मागे फिरलं
रस्त्यावरचं भटकं म्हणून त्याला धरलं
गाडीत घालून त्याला कुठेतरी नेलं
पाप्यांच्या दुनियेत जिवानिशी गेलं…!!
…. राजेश जगताप, मुंबई
९८२१४३५१२९
Leave a Reply