लहरी पाऊस, सिंचन योजनांतील भ्रष्टाचार आणि जमिनीखालील पाण्याची खालावत जाणारी पातळी आज सर्वच शेतकरी आणि नागरिकांसमोर गंभीर समस्या निर्माण करीत आहेत. त्यात यंदा पावसाने ओढ दिली तर शेतकरी आणि बागायतदार यांचा खरीप हंगाम कोरडा जाणार आणि दुबार पेरणीचे संकट ओढवणार असे दिसते. गाव खेड्यातील पिण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना पावसावर अवलंबून राहावे लागते या मुळाशी जाऊन भविष्यात काहीतरी नवीन उपाययोजना आखावी लागणार हे निश्च्छित.
असो. सध्या बाजारात सगळ्याच जीवनोपयोगी वस्तू महाग झाल्या आहेत. त्यात महिला वर्गाला जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे जेवणात दररोज कुठली भाजी करायची? कुठली भाजी बाजारात विपुल प्रमाणात आणि स्वत आहे? शेती, फाजीपाला आणि फळे यांना अपुऱ्या पावसामुळे आणि सिंचनासाठी अपुऱ्या पडणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गावाकडून शहरांना भाजीपाला आणि फळांचा अपुरा पुरवठा होतो आणि भाज्या आणि फळे यांच्या भावात वाढ होते. काही ठिकाणी अडते धान्यांची अतिरिक्त साठवण करून भाव वाढले की विकायला बाजारात आणतात आणि त्यामुळेही धान्यांचे आणि फळांचे भाव वाढतात.
मुंबई आणि आसपासच्या शहरांची लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत गेल्याने नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविणे सरकारला आणि नागरिकांना खूप हालाचे आणि कष्टाचे होत आहे. यामुळेच एखादी गोष्ट विकत घेतांना त्यात भ्रष्टाचार होण्याचा संभवच जास्त. सर्वसामान्य माणूस (कॉमनमॅन) रोजचे जीवन कसेबसे ढकलत आहे. सर्वच वस्तूंच्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस चांगलाच गांजला आहे आणि कुठे स्वस्त मिळते का हे चाचपडत आहे आणि अश्या वेळी तो एका दुष्टचक्रात अडकतो. त्याच्या रोजच्या घाई आणि स्पर्धात्मक जीवनापुढे काही बघयला वेळ मिळत नाही आणि जे पुढे येईल ते घेऊन ते स्वस्तात मिळाले म्हणून समाधान मानून दिसव काढत आहे.
एका खाजगी वाहिनीने दिनांक १० जुलै, २०१५ रोजी रात्रीच्या बातम्यात पच्छिम रेल्वेच्या गोरेगाव आणि मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाकुर्ली रुळांलगत दुतर्फा भाजीपाला सांडपाण्याच्या पाण्यावर कसा फुलवला जातो आणि तो मुंबई आणि परिसरात कसा येतो हे तेथे काम करणाऱ्या माणसांच्या मुलाखतीतून दिसले. भाज्याही त्याच पाण्यात धुतल्या जातात आणि हे असे बिनधास्त कित्येक वर्ष चालू आहे. याचे परिमाण स्लोपॉईझनसारखे असतात आणि तेव्हा खूप उशीर झालेला असतो. या भाज्यातून आपल्या पोटात किती विषारी रसायने जात असतील ते भगवंतालाच ठाऊक..! त्याकडे ना रेल्वेप्रशासन, राज्यशासन, पालिका आणि अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष आहे.
एका गावातील भाजीपाला आणि फळे विक्रेते शिळ्या भाज्या आणि फळे पाण्यात काही रसायने मिसळून ताज्या आणि टवटवीत वाटावे म्हणून प्रयत्न करीत असताना दिसत होते. केळी आणि टामॅटो लौकर पिकावेत आणि त्यावर तजेला यावा म्हणून केमिकल्स मिश्रित पाण्यात भिजवून ठेवतांना दिसत होते.
मुंबईच्या पच्छिम आणि मध्यरेल्वे रुळांलगत भाजीपाल्याचे मळे फुलविले जातात. रासायनिक अश्या दूषित पाण्यावर पिकवला जाणार हा भाजीपाला दैनंदिन आहारात वापरला जातो. सदर भाजीपाल्याचे उत्पादन थांबवावे म्हणून एका सामाजिक संस्थेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. यासंबंधित पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाकडेही तक्रार केली होती. मात्र रेल्वेने त्यावर काही ठोस कारवाई केल्याचे दिसत नाही. मुळा, लालमाठ, हिरवामाठ, मेथी, पालक अश्या विविध प्रकारचा भाजीपाला आज कित्येक वर्ष रेल्वेरुळांलगत पिकवला जातो. सांडपाण्यावर पिकविण्यात येणाऱ्या या भाजीपाल्यामध्ये विषारी घटक असल्याचे एका पाहणीत स्पष्ट झाले आहे. रेल्वे रुळांलगतच्या पडीक जागेवर पिकवला जाणारा भाजीपाला आरोग्यास हानिकारक असल्याने त्यांच्या उत्पादनावर बंदी घालावी अशी बऱ्याच जणांना वाटते पण…!
मोबाईल फोन, कंप्युटरपासून खेळणी आणि खाद्यपदार्थांपर्यंत भारतीय बाजारपेठ अनेक देशांसाठी खुली आहे. चीनच्या वस्तूंची भारतीय बाजारात मोठी विक्री होते. पण सावधान, असा सर्वत्र बोलबाला आहे की सध्या चीनमधील प्लास्टिकच्या तांदूळाची भारतीय बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. हा तांदूळ एका विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकचा आहे. हा तांदूळ कसा बनतो याचा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध झालाय. चीनचा तांदूळ भारतीय तांदळाच्या भावापेक्षा स्वस्त मिळतो आणि छान दिसतो. या प्लास्टिक तांदळाची केरळमध्ये खरेदी-विक्री झाल्याचं समोर आलंय. हळूहळू तामिळनाडू, कर्नाटकातही हा तांदूळ विकला जावू लागलाय. हा प्लास्टिक तांदूळ आरोग्यसाठी अतिशय हानिकारक आहे. पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो. सामान्य माणसाला तो ओळखता येत नाहीय. त्यामुळं तांदूळ खरेदी करतांना सावधान! हा तांदूळ एका विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकचा आहे.
आत याला काय म्हणवे? आपण आपल्यापरीने सावध असणे गरजेचे आहे.
जगदीश पटवर्धन
Leave a Reply