जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९५
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५१
षोडशोपचार पूजेमधील पुढचा उपचार आहे,
नमस्कार!
साष्टांग नमस्कार!!
स अष्ट अंग नमस्कार !!!
दोन हात, दोन पाय, शिर, छाती, मन आणि आत्मा यांना अष्टांग अशी संज्ञा आहे.
नतमस्तक म्हणजे मस्तक नत करून नमस्कार करावा. मनापासून असावा. देखल्या देवा दंडवत नको. कोणीतरी बघतोय म्हणून नमस्कार नसावा. आणि कोणी बघतच नाहीये मग नमस्कार तरी कशाला हवा ? असे नसावे.
अहंकार काढून टाकण्यासाठी नमस्कार.
जसं देवाचा प्रसाद घेण्यासाठी हावरट व्हावं असं म्हणतात, तसं कपड्यांच्या कडक इस्त्रीचा विचार नमस्कार करताना नसावा. जे शरीर ज्याने दिलं आहे, त्याला शरण जाण्यासाठी, विचार कसला करायचा ?
जगातील प्रत्येक धर्मात या नमस्काराचे महत्त्व वर्णन केलेले आहे.
कोणाचा नमस्कार गुडघे टेकून, कोणाचा डोके जमिनीवर टेकवून, तर कोणाचा मांडी घालून तर कोणाचा उभ्यानेच.
कोणाचा नमस्कार सगुण साकार मूर्तीला समोर ठेवून, तर कुणी निराकार निर्गुणाला मनात स्मरून, कुणी ईश्वराच्या विशिष्ट आकाराच्या चिह्नाला नमस्कार करतो. तर कुणी पंथाच्या संस्थापकांच्या मूर्तीलाच देवस्वरूप मानून फक्त त्यांनाच नमस्कार करतो.
कोणी दोन्ही डोळे उघडे ठेवून, तर कुणी दोन्ही डोळे बंद करून, तर कुणी डोळे अर्धोन्मिलित ठेवून.
कुणी दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना चिकटवून, कुणी तळहात एकमेकांच्यावर ठेवून, कुणी एका हातानी, तर कुणी दोन्ही हात आकाशाकडे करून, नमस्कार करतातच.
काही नव आधुनिक युवकयुवती तर हाताची तर्जनी दोन्ही ओठांवर ठेवून डोळे बंद करून, बोटाचे टोक कपाळावर चिकटवून, परत बोटाचा ओठाला स्पर्श करतात. आणि नमस्कार हा अस्सा फेकतात, जणुकाही देवाला टाकलेला फ्लाईंग किस !!! ही नमस्काराची आधुनिक स्टाईल, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात सांगितलेली आहे, मला अजूनही कळलेली नाही. कोणताच धर्म, कोणत्याही पंथाला बांधून घेण्यात मोठेपणा मानणारी, निधर्मी म्हणवून घेण्यात स्वतःला धन्य समजणाऱ्या महाभाग मंडळीचे चित्त, विचार स्थिर नसतात, असे व्यवहारात दिसते. कायम अस्वस्थ आणि चंचल. ही जमात फक्त भारतदेशातच दिसते. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जरा जास्तीच. ! अन्य कोणत्याही देशात अशी मंडळी, अगदी नमस्कार करायला पण दिसणार नाहीत. असो !
बाहेरील नमस्काराचे कर्मकांड वेगवेगळे असेल, पण अंतरीच्या भावना प्रत्येकाच्या त्याच असतात.
“हे परम ईश्वरा,
माझ्या भावना तुला कळतच आहेत, माझ्या मनात निर्माण होणारे सर्व विचार तूच देत आहेस. तू देत असलेल्या प्रेरणेतूनच मी माझे कर्तव्य पार पाडणार आहे. जे काही करायचे आहे ते मलाच करावे लागणार आहे, फक्त तुझा आशीर्वाद माझ्यावर सतत राहू दे ! ही ताकद तू मला सतत दे, सूक्ष्मातून तू माझ्याबरोबर सतत रहा. म्हणजे या जगात मी एकटा आहे, ही भावना माझ्या मनात कधीही येणार नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
15.07.2017
आजची आरोग्यटीप
Leave a Reply