नारायण प्रचंड व्यस्त होता .
त्याला इकडे तिकडे बघायला वेळ मिळत नव्हता .
सभोवताली गर्दी .
सगळीकडे दुकाने , टपऱ्या आणि फेरीवाले .
प्रत्येकाच्या दुकानात ,टपऱ्यात , वेगवेगळा माल होता .
दुनियेतील कुठलीही वस्तू तिथे सहज उपलब्ध होती .
सगळ्या प्रकारची शस्त्र , दारुगोळा , रिव्हॉल्व्हर्स , जैविक अस्त्र , ऍसिडस .
एका दुकानात फेक न्यूज विक्रीला ठेवल्या होत्या . एका टपरीवर चहाबरोबर वेबसिरीज च्या सीडीज फुकट वाटायला ठेवल्या होत्या .
अनेक दुकानात गुन्हेगारांची चरित्रं आणि त्यांच्या गॉडफादर्सची गोपनीय माहिती विक्रीसाठी होती. फेरीवाल्यांच्या टोपल्यात दुनियेतील सगळ्या प्रकारच्या व्यसनांच्या गोळ्या, पुड्या, हुक्के आणि अत्याधुनिक ड्रग्स उपलब्ध होती.
कोपऱ्यातल्या एका टपरीत राजकीय नेत्यांना लागणारे ट्रेंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे कार्यकर्ते विक्रीसाठी उपलब्ध होते .
अगदी दर्शनी भागातल्या पॉश टपरीत विविध देशातील करन्सी , गरजेनुसार तयार करून मिळणारे पासपोर्ट उपलब्ध होते .
सगळ्या दुकानात गर्दी ओसंडून वाहत होती .
तिथेच जराशा एका बाजूला नारायण आपलं दुकान थाटून बसला होता .
अगदी वेगळं होतं त्याचं दुकान .
नावसुद्धा वेगळं होतं.
टेन्शन विक्री केंद्र
येथे टेन्शन विकत मिळेल .
त्या वेगळ्या नावामुळं त्याच्याकडे गर्दी वाढत होती .
गर्दी त्याच्याकडे , त्याच्या बोलण्याकडे कुतुहलानं पाहत होती , ऐकत होती …
” आमच्याकडे खात्रीने कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह करून मिळेल .
पाच मिनिटात चौदा जणांच्या टेस्ट .
जे प्रामाणिक असतील त्यांना संध्याकाळपर्यंत पॉझिटिव्ह चा रिपोर्ट मिळेल .
होमक्वरनटाईन झाल्यास स्पेशल डॉक्टर . फी 10000 रुपये .
रक्त लघवी थुंकी आणि गरज असो नसो , सगळ्या चाचण्या कराव्या लागतील . त्याचे 20000 रुपये .
सतरा दिवस टेन्शन मिळेल . त्यासाठी कुणी ना कुणी चेकिंगला येईल , फोन करेल , झोन वेगळा करण्यात येईल , सतत लक्ष ठेवण्यात येईल , पोलीस बाहेर थांबतील अशा धमक्या मोफत मिळतील .
लिमलेटची गोळी मिळाली तरी औषध समजून घ्यावी लागेल .
नोकरीला जाता येणार नाही .
घरातल्या घरात एकांतवास दिला जाईल .
मंत्र्यांनी सांगितले म्हणून कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह केल्या अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्याला बंगल्यावर नेऊन अंधश्रद्धा दूर केली जाईल .
– आणि सतरा दिवसानंतर तुमची टेस्ट निगेटिव्ह होती , चुकून तुम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला असं बजावण्यात येईल .
त्याविरुद्ध काही बोलल्यास टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह करू अशी प्रेमळ आशा दाखवली जाईल .
दरम्यान तुमचे हजारो रुपये कुठेतरी हरवले असे समजा आणि त्यानिमित्ताने विश्रांती मिळाली म्हणून शासनाचे आभार माना असे सुचवण्यात येईल .
इतक्या सगळ्या गोष्टीतून टेन्शन नक्की मिळेल , त्यासाठी तुम्ही फक्त आमची फी भरा .
असं आणि इतकं नारायण सांगत होता .
लोक ऐकत होते .
न्यूज चॅनलवर कोरोना बाधितांचे आकडे वाढल्याच्याच फक्त बातम्या येत होत्या .
आणि त्या पसरवण्यात नारायणाचा हात आहे हे लक्षात आल्यावर सगळ्या व्यवस्था नारायणाच्याच पाठीशी हात धुवून मागे लागल्या होत्या .
आणि नारायण बिच्चारा आपल्या वाट्याला आलेला मनःस्ताप घेऊन , दुकान सोडून सैरावैरा पळू लागला होता .
निगेटिव्ह असूनही कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्यानं अक्कलखाती गेलेले लाखो रुपये कुठे गेले हे तो सध्या शोधतोय .
आपली मानसिक शांतता कुठे हरवली आहे हे तो शोधतोय .
आणि पळता पळता मुर्दाड व्यवस्थेचा मारही खातोय .
तुम्हाला कुठे दिसला तर सांत्वन करा .
मास्क लावा .
सामाजिक अंतर ठेवा .
हात सतत धुवा .
आणि मनातल्या नारायणाला सांभाळा .
( क्रमशः )
( पूर्णतः काल्पनिक . यातील घटना प्रसंगाचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही . तसा तो आढळला तर तो योगायोग समजावा .)
— डॉ. श्रीकृष्ण जोशी
———–
ही सोमि सिरीज ( सोशल मिडिया सिरीज ) नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही.
Leave a Reply