सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी आधुनिक तपास पद्धती वापरल्या जातात. यातीलच एक म्हणजे नार्को ॲनालिसिस. आपण अनेकदा ऐकतो की अमक्याची नार्को टेस्ट केली वगैरे. हे काय आहे ते जाणून घेऊ.
नारको याचा ग्रीक भाषेतील अर्थ ॲनेस्थेशिया असा आहे. यात बारबिच्युरेट्स प्रकारातील सायकोट्रोपीक औषधे हवे ती माहिती काढून घेण्यासाठी आरोपीला दिली जातात. त्याच्या अंतर्मनातील काही बाबी तो सांगू लागतो, त्यासाठी अगोदर त्याला ही शांत करणारी औषधे म्हणजे सेडेटिव्हज दिली जातात. अर्थातच नारको चाचणी करण्यास न्यायालयाची परवानगी लागते.
नार्को ॲनालिसिस हा शब्द पहिल्यांदा टेक्सास मधील एक डॉक्टर रॉबर्ट हाऊस यांनी रुढ केला. त्याने 1922 मध्ये दोन कैद्यांना स्कोपोलमाइन हे औषध दिले होते.
जेव्हा एखादा आरोपी गुन्ह्याची माहिती सहजपणे देत नाही तेव्हा त्याला ही औषधे दिली जातात. नार्कोसारख्या चाचण्यांमध्ये नेहमीच मानवी अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला जातो, त्याचबरोबर त्याची विश्वासार्हताही मानली जात नाही. नार्को चाचणी करताना तीन ग्रॅम सोडियम पेंटोथाल किंवा सोडियम अमायटल हे तीन हजार मिलिलीटर शुद्ध पाण्यात मिसळले जाते व ते रुग्णाला दिले जाते. यात एखादा आरोपी काल्पनिक माहिती सांगण्याचाही धोका असतो. कारण त्यावेळी तो निद्रा सदृश्य अवस्थेत असतो. एखाद्या आरोपीचे वय, लिंग, आरोग्य, शारीरिक अवस्था यावर त्याला किती प्रमाणात ही औषधे द्यायची हे ठरवले जाते. एक प्रकारे औषधे देऊन त्या व्यक्तीला हिप्नोटाइज केले जाते. या अवस्थेत ती व्यक्ती अगदी साध्या प्रश्नांना काही सूचना केल्यास उत्तरे देऊ शकते, ती व्यक्ती स्वतःहून बोलू लागते असे होत नाही. जर यात औषधाची मात्रा चुकली तर तो आरोपी कोमात जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो. या औषधांमुळे चेतासंस्था काही काळ काम करेनाशी होते व रक्तदाब कमी होतो. हृदयाचे ठोके कमी होतात. डॉक्टरांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाते. त्याचे व्हिडिओ व ऑडिओ चित्रण केले जाते. शासकीय रुग्णालयातच ही चाचणी करावी लागते. या चाचणीला ट्रुथ सिरम टेस्ट असेही म्हणतात, त्यात आरोपीला अर्धवट बेशुद्ध करून माहिती काढली जाते.
1930 मध्ये डॉक्टर विल्यम ब्लेकवेन यांनी अशी चाचणी प्रथम केली. या चाचणीत सोडियम अमायटलचा वापर फारसा विश्वासार्ह मानला जात नाही. या चाचणीत इथेनॉल स्कोपोलॅमाईन, 3- क्विनाक्लिडल बेंझीलेट, टेमायझेपाम सोडियम थिओपेंटल ही बारबिच्युरेट्स प्रकारातील जी औषधे वापरली जातात, ती शिरेतून दिली जाता, त्यांना ट्रूथ ड्रग्ज असे म्हणतात. भारतात सीबीआय सारख्या संस्था तपासात अशा पद्धतींचा वापर करतात. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की राज्यघटनेच्या कलम 20 (3) मध्ये या चाचणीमुळे उल्लंघन होते.
संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’ या सदरामधील लेख
Leave a Reply