नवीन लेखन...

हॉस्पिटल मधून पलायन (नशायात्रा – भाग २३)

(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)


आई भावाला रागवत होती ते पाहून मला बरे वाटत होते , मनातल्या मनात मी ‘ मला मर म्हणतोस काय ? बघ आता मजा ‘ असे म्हणत होतो . त्या काळी माझ्या उडाणटप्पू पणा करण्याच्या आणि बेताल वर्तनाच्या जो आड येईल तो मला माझा शत्रू वाटत असे आणि माझ्या शत्रूंमध्ये सर्वात पहिला नंबर मोठ्या भावाचा होता कारण तो नेहमी माझ्या भानगडी शोधून काढत असे आणि माझ्या स्वैर जगण्याच्या आड येत असे . आता याची वाचा गेली की काय या शंकेने आई सारखी मला ‘ अरे प्रयत्न तरी कर बोलण्याचा , बोल काहीतरी ,” असे म्हणत होती व मी मात्र नुसताच ऊ ..ऊ ..चे नाटक करत होतो . वडील स्तब्ध झाले होते . काय करावे कोणाला काही सुचेना मला दवाखान्यात चल म्हणाले पण मी नकार दिला आणि तसाच न जेवता झोपलो ( भूक लागली होती , पण नाटक नीट वठवण्यासाठी उपाशी राहणे आवश्यक होतेच ) त्या दिवशी मी तर नशेत असल्याने लगेच झोपलो पण रात्रभर आई , वडील आणि भाऊ झोपू शकले नसतील. मला झोपेत असताना आईचा हात आणि वडिलांचा हात डोक्यावरून फिरतांना जाणवत होता …

दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वा . च आईने मला उठवले , एव्हाना ही बातमी शेजारी कळली होती व ते देखील चौकशीला आले होते . सर्वानी मला दवाखान्यात चल म्हणून आग्रह केला शेवटी मी कसाबसा होकार दिला , ‘ विशाल ‘ पुस्तकालायाच्या शेजारी नाशिकरोड ला . डॉ . पटनी यांचे क्लिनिक होते तेथे जाण्याचे ठरले काल रात्री इतके नाटक केल्यावर आता सकाळी मला पुन्हा गर्द ची गरज होती व जर आई वडिलांकडून पैसे मिळवायचे तर मग त्यांचे थोडे ऐकणे भाग होते म्हणून मी दवाखान्यात जाण्यास तयार झालो होतो , आम्ही रिक्षा आई मी आणि वडील असे तिघे रिक्षा करून डॉ . पटनी यांचे कडे गेलो . नुकतेच डॉ . आले होते , ते तसे आमचे फँमिली डॉक्टर पण होते , आईने त्यांना सर्व कर्मकहाणी सांगितली ‘बेगॉन ‘ प्यायला हे एकून ते थोडे गंभीर झाले होते मात्र त्यामुळे वाचा गेली हे मात्र त्यांच्या पचनी पडले असावे असे त्यांच्या चेहऱ्यावरून वाटले नाही , त्यांनी मला तपासणीसाठी आतल्या खोलीत नेले आणि आई वडिलांना बाहेर थांबायला सांगितले . आत गेल्यावर मग ‘ जीभ दाखव , उलट्या झाल्या का तुला , पोटात दुखतेय का ‘ असे प्रश्न विचारले मी उत्तरादाखल नुसतेच ऊ..ऊ . सुरु ठेवले , शेवटी मला म्हणाले ‘ अरे वैद्यकीय क्षेत्रात मी गेल्या १० वर्षापासून काम करतोय पण हे असे बेगॉन प्यायल्या मुळे वाचा गेल्याचे उदाहरण प्रथमच पाहतो आहे , तू नक्की खोटे बोलत आहेस ” ( आमची अधूनमधून डॉ . पटनी यांच्या क्लिनिक शेजारी असलेल्या होटेल ‘ शीतल ‘ मध्ये बैठक होती , आणि त्यांना मी बिघडलेला मुलगा आहे हे माहित होते )

मी नुसतेच ऊ..ऊ केल्यावर मग दोस्ती खात्यात म्हणाले ‘ यार , मला सांग खरे काय ते ? मी कोणाला सांगणार नाही याचे वचन देतो तुला ” मग मी त्यांना भावाचा राग आलाय हे सांगितले व अधून मधून मी ब्राऊन शुगर घेतो हे देखील कबुल केले ( अर्थात मी रोजच सगळी व्यसनी करत होतो , पण व्यसनी माणूस हे कधीच कबुल करत नाही तो अधून मधून घेतो असेच सांगतो इतरांना ) . मग डॉ . मला म्हणाले की आता मी उपचार म्हणून तुला सलाईन लावतो मग तू बोलणे सुरु कर , आणि या पुढे असे वागू नकोस . मला गर्द प्यायची घाई झाल्याने मी देखील नाटक सोडण्याचे मान्य केले , डॉ . मग बाहेर येऊन आईला म्हणाले ‘ बहुतेक याला बेगॉन पिऊन खूप उलट्या झाल्या असाव्यात , आणि त्यामुळे खूप अशक्त पण आलाय व बोलता येत नाहीय , दोन सलाईनच्या बाटल्या चढवल्या की होईल ठीक , नाहीतर नंतर मग पाहू काय करायचे ते . ताबडतोब मला पटनी यांच्या समोरच असलेल्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची प्रक्रिया सुरु झाली त्यांचे हॉस्पिटल शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरच्या दुकानांमागेच होते ..

मला तेथून हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले , ताबडतोब सलाईन लावण्यात आले आई वडील मग मला तेथील नर्सच्या हवाली करून घरी जायला निघाले मी तासाभरात परत येते तुझ्यासाठी डबा घेऊन असे सांगून आई गेली . मी नुसताच आढ्याकडे पाहत पडलो होतो , जसे जसे ग्लुकोज शरीरात जात होते तसे तसे माझे गर्दचे विड्रॉवल्स वाढत होते , आणि माझी चुळबुळ सुरु झाली . सलाईन संपायला किती वेळ लागेल असे नर्स ला विचारले तर तिने २ तास असे उत्तर दिले , झाले संपले मी चांगलाच अडकलो होतो आता , काय करावे ते सुचेना , तितक्यात दुसऱ्या खोलीतून नर्स ला कोणीतरी बोलावले आणि ती गेली , आता माझे डोके वेगाने काम करू लागले , आई परत यायच्या आत येथून निघाले पाहिजे नाहीतर मग आई जाऊ देणार नाही हे माहित होते , मी पटकन सलाईनची सुई बाहेर काढली आणि रुमच्या बाहेरच्या बाल्कनीत आलो , पहिल्या मजल्यावर माझी खोली होती , जमिनीपासून साधारण १५ ते सतरा फुट उंचावर होतो मी , धीर करून बाल्कनीतून खाली उडी घेतली , थोडा पाय मुरगळला , व चप्पल देखील तुटली , पण मी ताबडतोब तेथून धूम ठोकली …

घरी पोचलो तर आई नुकतीच माझा डबा घेऊन परत दवाखान्यात जाण्यासाठी बाहेर पडली होती , घरी वडील एकटेच होते , त्यांना मी घरी पाहून धक्काच बसला , मी लगेच बोलायला सुरवात केली , म्हणालो ‘ डॉ . नी सलाईन लावल्यावर मला बोलता येऊ लागले , जरा मला १०० रु . द्या एका मित्राचे काल घेतले होते ते त्याला परत करायचे आहेत ‘ , मला बोलता येतेय म्हंटल्यावर त्यांना हायसे वाटले मात्र १०० रु , ची मागणी केली तेव्हा ते नकार देऊ लागले , पण मी मागेच लागलो तेव्हा कालचा प्रसंग त्यांच्या मनात ताजा असल्याने याच्या तोंडी लागले तर परत काही भलतेच होईल या भीतीने असावे बहुधा पण त्यांनी मला पैसे दिले आणि मी परत गर्द च्या शोधात बाहेर पडलो …

— तुषार पांडुरंग नातू

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..