मी डोके लढवून , पोलिसांच्या तावडीतून सुटलो , तेव्हा हे देखील आठवते आहे की मी मनातल्या मनात देवाचा ही धावा करत होतो , जरी देव वगैरे मी त्यावेळी मानत नव्हतो व इतर वेळी चर्चा वगैरे करताना देव कसा नाही हे सांगत होतो पण जेव्हा भीषण संकट येईल तेव्हा बरोबर मला देवाची आठवण येई . त्या वेळी मनातल्या मनात मी देवाला असेही कबुल केले होते की ‘ आता या वेळी मला यातून सहीसलामत बाहेर काढलेस , तर या पुढे पुन्हा कधी असा चुकीचा वागणार नाही . अर्थात हे फक्त संकटाच्या वेळी कबुल करायचे असते असाच माझा समज होता नंतर पालन वगैरे करण्याच्या भानगडीत मी पडत नसे हे देखील तितकेच खरे आहे . त्या दिवशी आम्ही रात्रभर घडल्या प्रकारची चर्चा करत जागे होतो नाशिक विभागातील एकूण १५ मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यात आमच्या कॉलेजचे ५ जण तर बाकी इतर कॉलेजेस चे होते २ जण तर अगदीच निरपराध होते ते बिचारे झोपेतून उठून दार उघडायला गेले आणि त्यांना वास न घेताच पोलिसांनी ताब्यात घेतले होते पण नंतर त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्यांना सोडून दिले गेले …
बाकीचे वैद्यकीय तपासणीत सापडले त्यांना कोठडीत डांबले होते पोलिसांनी . दुसऱ्या दिवशी सकाळीकडे हीच चर्चा सुरु झाली ” हा नात्या कसा वाचला ? ” याची देखील चर्चा करत होती आमच्या कॉलेजची मुले . आमच्या समूह गीताच्या समूहाचे प्रमुख गायक ( लीडर ) आणि इतर दोन गायक देखील पकडले पकडले गेले होते . समूहातील मुली त्यांच्या वसती गृहातून जेव्हा सकाळी नाश्ता करण्यासाठी आमच्याकडे आल्या तेव्हा त्यांना ही बातमी समजली उरलेली मुले त्यांना रंगवून रात्रीची घटना सांगत होती . सकाळच्या सत्रात फक्त दोनच स्पर्धा होत्या त्यात आमचे कॉलेज नव्हतेच . मग चर्चा सुरु झाली की आता आपल्या समूह गीताचे सुवर्ण पदक स्वीकारायला स्टेज वर कोण जाणार कारण समूहप्रमुखाने जाण्याची पद्धत होती , पण आमचा समूह प्रमुख तर कोठडीत बंद होता . नेमका रविवार असल्याने त्या मुलांना ताबडतोब कोर्टात नेऊन जामीन वैगरे करून आणणे एकंदरीत कठीणच काम होते . आमचे जी .एस सर्व मुलांशी स्टेजवर कोण जाईल या बद्दल सल्ला मसलत करत होते काही जणांनी स्वतः जाण्याची इच्छा व्यक्त केली , तर जी .एस ने जावे असे काहींचे म्हणणे पडले..
मी मात्र या बाबतीत अलिप्त होतो मला कोणीही स्टेजवर गेले तरी काहीही फरक पडणार नव्हता किवा त्या बाबतीत मी विचारच केला नव्हता , आणि मला जायला मिळावे हा विचार देखील मनाला शिवला नव्हता , उलट मनातून जरा अपराधीपणा देखील वाटत होता , कारण त्या मुलांमध्ये मी पुढाकार घेऊन दारू प्यायलो होतो आणि सहीसलामत बाहेर सुटलो होतो मनात एकदा त्या मुलांना भेटायला जाण्याची इच्छा होती . मी हळूच पोलीस स्टेशन कोठे आहे याची चौकशी करून तेथून सटकलो आणि सुमारे ५ की.मी पायी उन्हात त्यांना भेटायला गेली . मला फक्त दोनच मिनिटे भेट घेता आली त्यांची बिचारे खूप घाबरले होते . जर पोलसांनी भलती कलमे लावली असतील तर त्यांच्या आयुष्याचे नुकसान होईल या काळजीत होती . एकाने मला त्या प्रसंगी केस विंचरायला कंगवा मागितला ( त्यावेळी माझ्या डोक्यावर भरपूर केस होते , व मी कंगवा बाळगत होतो खिशात ) त्याची मात्र मला गम्मत वाटली कारण इतक्या गंभीर प्रसंगात सापडला असताना देखील याला आपले केस व्यवस्थित दिसावे याची काळजी होती …त्यांना भेटून परत येताना वाटेत आमचे जी . एस . आणि इतर दोन कॉलेजेस चे जी एस . भेटले ते त्या मुलाच्या सोडवणुकीची सोय करण्यासाठी गावात निघाले होते , तेथील एकदोन कॉंग्रेस च्या पुढाऱ्यांची मदत मिळते काय हे त्यांना पहायचे होते . त्यांनी मला पाहून ‘ तू कुठे गेला होतास ‘ विचारले तेव्हा मी आपल्या पोरांना भेटायला गेलो होतो असे मी सांगितले त्यांना बरे वाटले ते म्हणाले ‘ नशीब तुला त्यांना भेटावेसे वाटले ते ” बाकी तुमच्या समूहातील सर्व जण स्टेजवर कोण जाईल याची चिंता करत आहेत .
सायंकाळी हे नक्की झाले की पकडली गेलेली मुले आज काही सुटणार नाहीत .बक्षीस समारंभ ६ वा सुरु झाला , मी एकांतात जाऊन सिगरेट मध्ये गांजा भरून दम मारून मग अगदी शेवटी बसलो होतो , एकेका स्पर्धचे नाव सांगून सुवर्ण , रौप्य , आणि कास्य पदकाची बक्षीसे जाहीर केली जात होती आणि त्या वेळचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्री . राम ताकवले यांचे हस्ते पदके प्रदान केली जात होती . तितक्यात आमच्या कॉलेजची दोन तीन मुले मला शोधात माझ्याजवळ आली आणि त्यांनी सांगितले की तुला निवृत्ती अरिंगळे ने बोलावले आहे मला समजेना नेमके काय काम असावे ते . मी स्टेज जवळ गेलो तिथे बाजूला घोळका करून आमच्या कॉलेजची मुले -मुली उभ्या होत्या . निवृत्ती ने मला सांगितले की ‘ आपल्या कॉलेज चे नाव आले की समूह्गीताचे सुवर्ण पदक घ्यायला तू स्टेजवर जायचे आहेस . बापरे ! क्षणभर माझा विश्वासच बसेना , कोणत्या निकषावर यांनी मला पाठवायचे ठरवले ते समजेना . शेवटी आमच्या कॉलेजचे नाव पुकारल्या गेल्यावर मी स्टेज वर गेलो पदक स्वीकारले, मग जेव्हा शिल्ड ( ढाल ) देण्यासाठी पुकारा झाला तेव्हा समूह्गीतातील मुली , राहिलेली मुले आणि जी .एस देखील स्टेजवर आले …नंतर मला समजले मी मी भर उन्हात त्या मुलांना भेटायला गेलो होतो ते जी .एस ना आवडले होते , तसेच पदक स्वीकारायला कोण जाणार अशी चर्चा चालू होती तेव्हा मी स्वतः जावे अशी इच्छा अजिबात व्यक्त केली नव्हती या वरून त्यांनी मला शेवटी हा बहुमान देण्याचे ठरवले होते ..
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलांना कोर्टात नेऊन जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली मग आम्ही परत येण्यास निघालो पण जाताना सगळे खूप आनंदात , उत्साहात होते तर येताना वातावरण जरा गंभीर होते , नंतर कॉलेजने पकडलेल्या गेलेल्या मुलांच्या घरी पत्र पाठवून त्यांच्या पालकांना मुलांवर लक्ष ठेवण्यास बजावले असे कळले . ती केस सहजपणे सोडवली गेली . न्यायमूर्तीनी समज देऊन मुलांना सोडले असे समजले . ही देखील बातमी पेपर मध्ये वाचली की ” अंमळनेर येथे झालेल्या युवक महोत्सवाच्या तीन दिवसात , अंमळनेर मध्ये दारूची एकूण तीन लाख रुपयांची विक्री झाली होती ” यावरून हल्लीच्या युवक महोत्सवात किती दारू विक्री होत असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो . पुढच्या वर्षी आमचा समूह गीताचा प्रमुख पदवीधर होऊन दुसऱ्या कॉलेज मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला म्हणून समूहप्रमुख मी झालो आणि मग ” सटाणा ” येथे झालेल्या युवक महोत्सवात वेगळी धमाल आली त्या बद्दल पुढील भागात..
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply