पोलीस स्टेशन मधून जो थेट पळत सुटलो ते एकदम आधी रेल्वे स्टेशनवर गेलो , तेथे आधी एका नळावर घाणीने बरबटलेले पाय धुतले , आता टर्की खूप जास्त जाणवत होती , कसेही करून मला ब्राऊन शुगर हवी होती , मी तेथून नेहमीं जेथे ब्राऊन शुगर विकत घेत असे त्या हाजो आपा च्या अड्यावर गोसावी वाडीत गेलो ( हीचे मूळ नाव हाजरा होते , पण आम्ही सर्व गर्दुल्ले तिला हाजो आपा म्हणत असू , या बाईचा नवरा पेशाने पहेलवान होता ,एका खुनाच्या आरोपात जेल मध्ये शिक्षा भोगत होता तो, आणि आपा उदरनिर्वाहासाठी आधी गांजा आणि मग ब्राऊन शुगर विकण्याचे काम करीत होती ) मी हाजो आपा चे नेहमीचे आणि रोख व्यवहार करणारे गिऱ्हाईक होतो , त्यामूळे ती मला रात्री बेरात्री केव्हाही ब्राऊन शुगर देण्यास मनाई करत नसे , आज पहिलीच वेळ होती की मी तिच्याकडे उधार मागायला जाणार होतो ..
सायंकाळी साधारण ७ वाजले होते , मी तिच्या घराच्या खिडकीतून हक मारली तशी पटकन तिने हात बाहेर काढून कितना ? असे विचारले या वर मी म्हणालो ‘ आपा , आज पैसे नाही है , ५ पुडी दे दो , काल पैसे मिल जायेंगे , तिने हात परत आत घेतला , मग खिडकीचा पडदा सरकवून माझ्या कडे पाहत म्हणाली ‘ ऐसा उधार नाही मिलेगा ‘ मला खरे तर मनातून ती आपल्याला नक्की उधार देईल अशी खात्री होती , कारण ऐरवी देखील ती इतर गर्दुल्ल्या लोकांपेक्षा माझ्याशी अधिक सौम्य बोले ..
एकदा तर तिने मला काय शिकतोस ? कोणत्या कॉलेजला वगैरे चौकशी केली होती माझी… पणएकंदरीत तिने मला त्या दिवशी मात्र सरळ रोख पैसे सांगतील असे सांगून माझा भ्रम निरास केला होता , मी लगेच पवित्र बदलला एकदम मी तिला काल ब्लेड ने गळ्यावर केलेली जखम दाखवून म्हणालो ‘ ये देखो आपा , कल मैने ये क्या किया है , आज मुझे माल नाही मिलेगा तो मै मर जाउंगा , अभी पोलीस स्टेशनसे भागकर सिधा यहापर आया हू ‘ ही मात्रामात्र लगेच लागू पडली , गळ्याची जखम तशी कोणीही घाबरावे अशी मोठी होती त्यातल्या त्यात एखादी ‘ स्त्री ‘ तर नकीच घाबरली असती हाजो आपा परिस्थितीमुळे जरी अश्या व्यवसायात असली तरी सर्व प्रथम ती आधी ऐक ‘ स्त्री’ होती ‘ हाय अल्लाह , असे ओरडून ती एकदम खिडकीत मागे सरकली मग , अविश्वासाने माझ्याकडे पाहत म्हणाली ‘ आज दे दुंगी , लेकिन दोबारा यहा आना नही ,और य नशा छोड दो अभी तुम ” मी हो ला हो केले मग तिने पाच पुड्या हातात दिल्या , तसा मी वेगाने तेथून सटकलो .
मग लपत छपत रेल्वे क्वार्टर्स कडे आलो , घरात काय चाललेय हे मला पहायचे होते , पोलीस आपला शोध घेत आहेत का ही भीती होतीच , आमच्या घराच्या मागील बाजूस अंगण होते आणि त्याभोवती साधारण पणे ८ फुट उंच भिंतीचे कुंपण , मी त्या भिंतीवर चढून तिच्यावरून चालत घराच्या गच्चीवर पोचलो , तेथे आमच्या मधल्या आणि पुढच्या खोलीचे व्हेंटिलेटर होते छोटेसे , त्यातून जरी खालचे काही दिसत नसले तरी आव्हाज स्पष्ट ऐकू येत असत , कान देऊन मी आतले संभाषण ऐकत होतो , आत भाऊ आणि वडिलांचे बोलणे सुरु होते ‘ असा कसा निघून गेला तो तेथून , ते पोलीस काय करत होते ? असे वडील म्हणत होते , तर भाऊ म्हणत होता ‘ ते म्हणतात की तुमच्या घरातीलच कोणीतरी येऊन त्याला घेऊन गेलेय म्हणून ” सगळा प्रकार माझ्या लक्षात आला , मला तीनचार दिवस असाच तेथे पोलीस स्टेशन मध्ये कोठडीत न डांबता ऑफिस मध्ये बसवून ठेवायचे ठरले होते , व त्यानुसार भाऊ माझा रात्रीचा डबा , आणि अंथरूण घेऊन तेथे गेला तेव्हा त्याला तेथील पोलिसांनी तो आमच्या हातून पळाला असे न सांगता , घरातीलच कोणीतरी येऊन मला घेऊन गेले असे सांगून भावाची बोळवण केली होती , भाऊ घाबरलेला होता , कारण त्याला हे अपेक्षित नव्हते , त्याला आता मी पुढे काय पवित्रा घेईन याची भीती होती , पोलीस ही त्याची शेवटची आशा होती पण मी ती धुळीस मिळवली होती व आता मी बदला म्हणून त्याला मारीन की काय अशी भीती त्याच्या मनात होती . , मी तो संवाद एकूण जरा निर्धास्त झालो , म्हणजे आता पोलीस आपल्याला शोधणार नाहीत हे पक्के होते ( कदाचित केस न करता असे डांबून ठेवणे , पोलिसांसाठी देखील कटकटीचे काम असावे ) मी गच्चीवरच आधी ब्राऊन शुगर ओढली तीन पुड्या उद्यासाठी ठेवल्या आणि मग गच्चीवरून खाली अंगणात उतरलो , अंगणात खूप फुलझाडे होती , जाई , जुई , मोगरा , अबोली , गुलाब वगैरे , आईला बागेची खूप आवड असल्याने छान बाग होती आमची , मी तेथील कोपऱ्यातील जाई च्या वेलामागे लपून बसलो
बाहेर तेथेच ऐक पाण्याचा हौद होता व आई नेहमी पाणी घेण्यासाठी तेथे येई ती बाहेर आली की आधी आईला भेटायचे मग घरात जायचे असे मी ठरवले होते , बराच वेळ झाला तरी अंगणात आई आली नाही , मात्र बहिण जेव्हा अंगणात पाणी घेण्यासाठी आली तेव्हा मी तिला ‘ ताई ‘ अशी हाक मारली आणि ती जी एकदम ‘ सुहास पळ , हा आलाय इथे ‘असे मोठ्याने ओरडली त्या बरोबर घरात एकदम हलकल्लोळ मजला , एकदम मोठ्याने ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज आले , ताई पण आत घरात पळून गेली , मला नेमके काय झाले ते समजेना , म्हणून तसाच जाईच्या वेलामागे उभा राहिलो अंधारात जरा वेळाने चार पाच लोकांचे बोलण्याचे आवाज आले , आमच्या आजूबाजूला राहणारे तीनचार लोक टॉर्च घेऊन अंगणात आले आणि सगळीकडे प्रकाशाचा झोत टाकू लागले , शेवटी माझ्यावर प्रकाश पडला , मला पाहून ते म्हणाले , हा तर तुषार आहे . साप वगैरे काही नाही , आणि मी त्यांच्या सोबत आत गेलो तर आई खाली बेशुध्द झाल्यासारखी पडली होती , बहिण आणि तिची मुले रडत उभी होती , भाऊ बहुतेक माझ्या भीतीने घराबाहेर पळाला होता . मग नंतर सर्व प्रकार लक्षात आला की ‘ तुषार आला ‘ असे ताई ओरडल्यावर भाऊ बाहेर पळाला आणि भीतीने आईला एकदम मूर्च्छा आली ती खाली पडली ते पाहून सगळे रडू लागले आणि घरातील आरडा ओरडा एकूण बाहेरचे लोक आत आले तेव्हा बहिणीने जेव्हा अंगणाकडे बोट दाखवले तेव्हा त्यांना वाटले अंधारात काहीतरी साप वगैरे पहिला असणार बहिणीने आणि त्यामूळे ते साप मारायला अंगणात आले होते .मला पाहून ते निर्धास्त झाले आर्थात त्यांना हे कळालेच की घरचे लोक सापापेक्षा जास्त तुषारला घाबरतात ॥
( बाकी पुढील भागात)
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply