वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे नाती बदलतात. मग ती माणसांशी जुळलेली नाती असोत, अथवा वस्तू-वास्तूंशी. प्रत्येक नात्याचा स्वतंत्र विकासक्रम असतो. नातं जन्मतं, उमलतं आणि घडत राहतं. माणूस आणि घर यांचे संबंध घनिष्ट असतात. माणूस घराला घडवतो, घर माणसाला. घर म्हणजे केवळ खांबा भिंतींवर तोललेल्या छताछपरांची इमारत नसते. माणसांना निवारा देणारं ते विश्रांतिस्थान असतं. त्याच्याशी भावनिक नातं जडतं. घराच्याआत स्वयंपाकघर, खेळघर, शेजघर, देवघर अशी छोटीछोटी घरं नांदत असतात.
बालवयात एकजीव झालेलं खेळघर आणि स्वयंपाकघर म्हणजे भातुकली. आईनं मला खेळातल्या पितळी भांड्यांचा संच आणला होता. नंतर कोणी तरी वाढदिवसाला निळा टी-सेट दिला. लातूरला कुसुममावशीनं मातीची चूल करून दिली. कुलाब्याला घराच्या व्हरांड्यात माझं छोटं स्वयंपाकघर होतं. बाबांकडे रविवारी सकाळी पाहुणे येत. आई त्यांच्यासाठी चहापाणी करत असताना, मलाही पाहुण्यांच्या स्वागताची काकालोकही खाल्ल्याचं नाटक करून म्हणत, ‘अरे व्वा, छान झालाय शिरा, शाब्बास!’ लुटुपुटीच्या स्वयंपाकाला लुटुपुटीची शाबासकी. मी, माझा भाऊ अरविंद आणि शेजारची मुलं म्हणजे आमचं कुटुंब. भातुकलीसाठी आई खाऊ द्यायची. शेंगदाणे, गूळ, पोहे, बिस्किटं, वड्या…घरी जे असेल ते ! पोह्याचा पाणी घालून भात आणि शेंगा-गुळाच्या पुरणपोळ्या करण्यात मी दंग असायची. कुलाब्याहून आम्ही माटुंग्याला आलो. पण भातुकलीचं वेड कायम राहिलं! दहावं सरून अकरावं लागलं तरी माझी भातुकली संपेना. आईला काळजी वाटे, ही कार्टी अभ्यास करून शिकेल की अशीच खेळत बसेल? पण आयुष्यात जसजशी गोष्टीच्या पुस्तकानं जागा व्यापली तसतस खेळातलं स्वयंपाकघर मागे पडलं. बाराव्या वर्षी लेखणी माझी सखी झाली. वाचायचं, लिहायचं, कविता करायच्या, सुंदर अक्षरांत लिहून ठेवायच्या, हा छंद जडला. माझे जगच बदललं.
मुलगी म्हणून, मोठी झाल्यावर खऱ्या स्वयंपाकघराशी संबंध आला असता, पण तोही आला नाही. आई शाळेत शिकवायची. शाळा सकाळची. त्यामुळे स्वयंपाकाला पार्वतीबाई होती. सकाळी साडेसातला ती यायची, तेव्हा मी साखरझोपेत असे. पार्वती उठवायला लागली तर मी म्हणायची, ‘आधी चहा कर, मग उठीन.’ स्वयंपाकघर म्हणजे आयता पुख्खा झोडण्याचं ठिकाण, अशीच समजूत होती. एकदा मोठ्याकाकी राहायला आल्या होत्या. त्यांना दोन-तीन नारळ खवून हवे होते. त्यांच्या मुली स्वयंपाकात पटाईत! त्यांनी मला सांगितलं, खोबरं खवून दे.’ मी प्रयत्न केला, पण खोबऱ्याचे तुकडे पडू लागले. हात दुखू लागले. मी त्यांना सांगितलं, मला नाही येत. तुम्हीच खवा.’ आणि धूम ठोकली.
एकदा घरात दुरुस्तीचं काम चालू होतं. स्वयंपाकघरात नवीन ओटा केला होता. काम करणारे दामले मला म्हणाले, ‘ओटा तुला जरा उंच वाटत असेल ना?’ मी म्हटलं, ‘असेना का उंच. माझा काही याच्याशी संबंध नाही.’ ते हसले. मला कोणी थेट प्रश्न विचारला, ‘तुला स्वयंपाक येतो?’ तर मीही तितकंच थेट उत्तर द्यायची, ‘माझ्या आईलाच स्वयंपाक करावा लागत नाही, तर मी कशाला करू? ‘ खरं तर आई सुगरण. सामिष आहारही उत्तम करायची. पार्वती पूर्वीच्या तिच्या स्वयंपाकाची चव जिभेवर होती. पण तिनं मला कधी घरकामात गुंतवलं नाही. मी मनापासून अभ्यास करते, कथाकविता लिहिते, याचा तिला आनंद होता. तिला एकदा कोणी तरी विचारलं, ‘वहिनी, मुलीला स्वयंपाकाचं वळण लावलंत का?’ आई म्हणाली, ‘काय वळण लावायचं ते लग्न झाल्यावर तिची सासू लावेल. पुढे सासरी काम पडणारच आहे. करायला लागली की येईल. नंतर कुठे मुक्तपणा मिळणार आहे !’ मी आईवर बेहद्द खूश. मे महिन्यात आमच्या घरामागे राहणाऱ्या अरुणाची आई दुपारी पापड लाटायची. पत्की मावशी बटाट्याचे वेफर्स करायच्या. ती वाळवणं पाहून मी आईला म्हणायची, ‘आपण करूयाना पापड, पण आईचे ते लेखनाचे ऐन बहराचे दिवस होते. पद्मिनी बिनीवाले म्हणजे सत्यकथेच्या लेखिका म्हणून तिचं नाव गाजत होतं. आई म्हणायची, ‘कोण ते घोळ घालणार! तूच जा अरुणाकडे पापड लाटायला.’
शेवटी कोणाच्या तरी लग्नात मी पापड लाटायला गेले तेव्हा माझा आत्मा थंड झाला. माझा स्वयंपाकघरात चंचुप्रवेश झाला तो वेगळ्याच कारणान. पार्वतीची त्याच चवीची त्या भाजी खाऊन कंटाळले होते. तिची माझी रोज भांडणं व्हायची. शेवटी वैतागून ती म्हणाली, ‘नाही आवडत तर कर तूच !’ मी आव्हान स्वीकारलं, ‘करीन करीन. तुला काय वाटलं, मला येत नाही? ‘ मग मात्र मी भाजी करू लागले. सारखं भाजीकडे पाहात, ढवळत मी लक्षपूर्वक भाजी करायची. मान उडवून पार्वती पुटपुटायची, ‘तासभर नुस्ती भाजीच चालू आहे. माझी छप्पन कामं झाली.’ पण माझी भाजी बाबांना आवडायची. चहाही माझ्याच हातचा आवडायचा. आपण फारसं लक्ष घातलं नाही, पण येतो आपल्याला स्वयंपाक, ही जाणीव सुखावून गेली. माझं लग्न ठरल्यावर आईनं मला दुधीकोफ्ता शिकवला. सासरी कोणी पाहुणे येणार असले की माझा दुधीकोफ्ता ठरलेला. पक्वान्नं न येवोत, मुलीला रोजचा स्वयंपाक येतो, म्हणून सासरी लाज राखली गेली. मात्र पोळ्या म्हटलं, की पोटात गोळा यायचा. संध्याकाळी ऑफिसमधून आले, की सासूबाई सांगायच्या, ‘पोळ्या करून ठेव. मी भाजी आणायला जातेय.’ आमचं एकत्र कुटुंब. भरपूर पोळ्या लागायच्या. मला वाटायचं, मी गोष्टीतली गरीब बिचारी सिंड्रेला आहे. शेवटी पोळ्यांना आणि भाजी चिरायला बाई शोधली. उगाच कशाला श्रम करायचे! सासरी स्वयंपाकघरातला माझा बावर वाढला, पण स्वयंपाकघराशी जिव्हाळ्याचं नातं जुळलेलं नव्हतं.
लग्न झाल्यावर दीड-दोन वर्षांतच माझा नवरा सतीश याची बेळगावला बदली झाली. मुलगा तान्हा होता. माझी नोकरी आणि पीएच.डी चालू होती. त्यामुळे मी मुंबईलाच होते. पण अधूनमधून दीडेक महिना मी जायची. तेव्हा प्रथमच संपूर्ण घराची जबाबदारी पडली. बेळगावमध्ये माझ्यावर मुंबईसारख्या सोयी नव्हत्या. गॅसची एकच शेगडी आणि वातीचा स्टोव्ह होता. बाजारात जाऊन गृहोपयोगी वस्तूंची निवड करायची, वाणसामान भरायचं, भाजी पारखायची, उद्याची योजना आज करायची, मुलाला सांभाळून स्वयंपाकपाणी करायचं, याचा सराव झाला. शेवटी अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरू असतो.
संसार करायला लागल्यावर स्वयंपाकघराशी असलेलं नातं बदलतंच. आता नवनवे प्रयोग करावेसे वाटू लागले. लग्नात कोणी तरी मला सुज्ञपणे कमलाबाई ओगल्यांचं ‘अन्नपूर्णा’ पुस्तक भेट दिलं होतं. तो माझा धर्मग्रंथ बनला. एकदा मी पुस्तकात शिऱ्यासाठी रवा, पाणी, साखर यांची मापं पहात होते. माझा छोटा मुलगा सलील जवळच उभा होता. तो आश्चर्यानं म्हणाला, ‘तू पुस्तकात बघून शिरा करतेस?’ मी की पोटात गोळा यायचा. संध्याकाळी ऑफिसमधून आले, की सासूबाई सांगायच्या, ‘पोळ्या करून ठेव. मी भाजी आणायला जातेय.’ आमचं एकत्र कुटुंब. भरपूर पोळ्या लागायच्या. मला वाटायचं, मी गोष्टीतली गरीब बिचारी सिंड्रेला आहे. शेवटी पोळ्यांना आणि भाजी चिरायला बाई शोधली. उगाच कशाला श्रम करायचे! सासरी स्वयंपाकघरातला माझा बावर वाढला, पण स्वयंपाकघराशी जिव्हाळ्याचं नातं जुळलेलं नव्हतं.
लग्न झाल्यावर दीड-दोन वर्षांतच माझा नवरा सतीश याची बेळगावला बदली झाली. मुलगा तान्हा होता. माझी नोकरी आणि पीएच.डी चालू होती. त्यामुळे मी मुंबईलाच होते. पण अधूनमधून दीडेक महिना मी जायची. तेव्हा प्रथमच संपूर्ण घराची जबाबदारी पडली. बेळगावमध्ये माझ्यावर मुंबईसारख्या सोयी नव्हत्या. गॅसची एकच शेगडी आणि वातीचा स्टोव्ह होता. बाजारात जाऊन गृहोपयोगी वस्तूंची निवड करायची, वाणसामान भरायचं, भाजी पारखायची, उद्याची योजना आज करायची, मुलाला सांभाळून स्वयंपाकपाणी करायचं, याचा सराव झाला. शेवटी अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरू असतो.
संसार करायला लागल्यावर स्वयंपाकघराशी असलेलं नातं बदलतंच. आता नवनवे प्रयोग करावेसे वाटू लागले. लग्नात कोणी तरी मला सुज्ञपणे कमलाबाई ओगल्यांचं ‘अन्नपूर्णा’ पुस्तक भेट दिलं होतं. तो माझा धर्मग्रंथ बनला. एकदा मी पुस्तकात शिऱ्यासाठी रवा, पाणी, साखर यांची मापं पहात होते. माझा छोटा मुलगा सलील जवळच उभा होता. तो आश्चर्यानं म्हणाला, ‘तू पुस्तकात बघून शिरा करतेस?’ मी म्हटलं, ‘तुझ्यासारखीच मीही अजून पहिलीतच आहे.’ हळूहळू माझ्याही नकळत स्वयंपाकाची गोडी लागली. पाहुणे येणार असतील तर खास बेत करायचा, घराची सजावट करायची, ठेवणीतल्या काचेच्या वस्तू वापरायच्या, यातला आनंद कळू लागला. माझी आई दिवाळीच्या पहिल्या पहाटे उठून चिवडा करायची. तिचं बघूनबघून मीही करू लागले. चिकन, मटण, फ्रायफिश, चिकनपुलाव, माशाची आमटी, तिसऱ्याची उसळ हे पदार्थ मला आवडायचे, म्हणून मी करायला शिकले. आपल्या हातचं खाऊन माणसं तृप्त झाली, की रांधपिणीला कसं समाधान वाटतं, ते कळू लागलं.
तरीही स्वयंपाकघराशी आपुलकीचं नातं जुळलं ते गेल्या दहा वर्षांत. माझी हृदयशस्त्रक्रिया झाली होती. खाण्यापिण्याचे खूप नेमनियम होते. मग माझे प्रयोग सुरू झाले. थालीपीठ आणि भाकरी ही भावंडं आहेत, समजलं. तेलाचा वापर न करता, भाकरीप्रमाणे थालीपिठालाही मी पाणी लावू लागले आणि ती भाजू लागले. खोबरं वर्ज्य ! मग भाजीवर भुरभुरायचं काय? राजगिऱ्याच्या लाह्या किंवा ब्रेडचा चुरा! दाण्याचं कूट नाही चालणार? ठीक आहे. बदामाचं कूट वापरू या. सगळ्यांच्याच पोटात बदाम जातील. तेलकट पराठ्याला पर्याय म्हणजे, तांबडा भोपळा, बीट, मेथी, पालक असं काही तरी घालून छोटी पोळी लाटायची आणि ती फुलक्यासारखी भाजायची. कमी तेलातला उपमा, पोहे, चिवडा जमू लागला. तेलकट, मसाले टाळायचे होते. त्याला पर्याय म्हणून धने, जिरं, मिरी, दालचिनी, तीळ, कढिलिंब; विनातेल चुरचुरीत भाजून मिक्सरवर पुडी करू लागले. त्यांच्यासाठी छोट्याछोट्या गोंडस बरण्या आणल्या. कोलॅस्ट्रॉल नियंत्रणासाठी आळशी लसूण यांचा वापर वाढवला. जेवणात वैविध्य आणण्यासाठी कोरड्या चटण्या, लोणची करू लागले. आता पुस्तकात न बघता मीच मनानं प्रयोग करते. त्यांना घरच्या मंडळींची दाद मिळाली, की लेख उत्तम जमल्यासारखा आनंद होतो. मला मदत व्हावी म्हणून सतीशनंही भाजी, आमटी शिकून घेतली. काही वर्षं पोळ्याला बाई नव्हती. तेव्हा तो भाजी चिरून द्यायचा. कधी माझी तब्येत बिघडल्यास पोळ्या करायची त्याची तयारी असे. कमी तेलातला चिवडा करायला तो शिकला. आता तो सराईतपणे स्वयंपाकघरात वावरतो. याला सहजीवन ऐसे नाव ! काही वर्षांनी प्रकृती सुधारली. बंधनं शिथिल झाली. पण या आजारपणामुळे स्वयंपाकघर माझी प्रयोगशाळा बनली. आता मलाच रोज वेगवेगळ्या प्रकारची आमटी लागते. कधी कडधान्याची, कधी पालक वा मेथीची, कधी मिश्र डाळींची, तर कधी साधी तुरीची. एकच भाजी मी वेगवेगळ्या पद्धतीनं करून बघते. आता माझ्या स्वयंपाकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त झालं आहे. फेसबुकवर अंगतपंगत नावाचा ग्रुप आहे. वेळं न खाणाऱ्या, सोप्या पाककृती तिथे मोदक, नारळीभात, सापडतात. रव्याखव्याचे लाडू, साखरभात ही पक्वान्नं जन्मात जमणार नाहीत, अशी माझी दृढ समजूत होती. पण तीही जमू लागली. अजून पाक करण्याचं भय मात्र आहेच. शिकण्यासारखं सदैव काही तरी असतंच.
स्वयंपाक रांधणं ही एक कला आहे. तिचा रियाज करावा लागतो, ही जाणीव दुर्गा भागवतांच्या चरित्राचा अभ्यास करताना झाली. स्वयंपाकाचा त्यांच्या ज्ञानसाधनेत कधी व्यत्यय आला नाही. त्यांच्यासारख्या विदुषीनं स्वयंपाकाचा किती साकल्यानं विचार केला आहे, हे त्यांचं ‘खमंग’ पुस्तक वाचताना जाणवतं. सर्जनशीलता, प्रयोगशीलता, सौंदर्यदृष्टी लेखनाप्रमाणे स्वयंपाकातही लागते, हे अनुभवातून उमगलं. बघताबघता स्वयंपाकघर माझा विरंगुळा बनला. आजही दिवसाचं वेळापत्रक लेखन, संशोधन यांनीच भरलेलं असलं, तरीही स्वयंपाकघराला माझ्या दिनक्रमात आणि मनातही खास स्थान आहे. स्वयंपाक हे आता माथ्यावर लादलेलं काम वाटत नाही. तो माझा छंद आहे. मी स्वयंपाकघरात जास्त रेंगाळले तर सतीशच विचारतो, ‘आज अभ्यास नाही वाटतं?’ बरेच तास लेखनवाचन केल्यानंतर विरंगुळा म्हणून मी एखादा पदार्थ करते. मन ताजंतवानं होतं. कधीकधी वाटतं, ही मीच का दुसरीच कोणी?
जर्मनीतील अनुगा इंटरनॅशनल फूड फेस्टिव्हलला भेट दिली, तेव्हा घरगुती स्वयंपाक घरापलीकडे विस्तारलेलं विशाल जग पाहून मन चकित झालं. खाद्यपदार्थ व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ निर्माण करणं, मसाल्यांचे अर्क काढणं, अत्याधुनिक उपकरणं बनवणं, त्यांचं वितरण करणं हा एक अफाट मोठा व्यवसाय आहे. अनेकांच्या उपजीविकेचं साधन आहे, हे जाणवलं. या व्यवसायासंबंधी चिंतन-चर्चा, परिसंवादही तिथे आयोजित केले होते. तीन मजल्यांवरील चौदा अतिभव्य दालनांत किराणा माल, मसाले, फळं, भाज्या, मांसान्न, बेकरी उत्पादनं, केशर, सुकामेवा, वाईन्स असे रूपरसगंधस्पर्शाला आवाहन करणारे, देशोदेशींचे बहुरंगी पदार्थ, त्यांची माहितीपत्रकं व चव घेण्यासाठीचे नमुने आकर्षक पद्धतीनं स्टॉल्सवर मांडले होते. स्टॉल्स म्हणजे चिमुकले रंगमंचच होते. मंचावर रत्नांसारखे दिवे लकाकत होते. त्यांच्या प्रकाशझोतात चीझ आयलंडस्, फिश आयलंडस्, रंगवलेली अंडी, काजू-अंजिरांनी ओसंडणारे बुदले, लसूण खोचून तयार केलेली पवनचक्की अशा अद्भूत वस्तू मांडलेल्या होत्या. भारतीय मसाल्याच्या स्टॉलवर हळद, तिखट धनेजिरेपूड वापरून रांगोळी काढली होती. एशियन स्टॉलवर भातुकलीतल्यासारखं छोटं स्वयंपाकघर होतं. त्यात नूडल्स रटरटत होत्या. तीनचाकी सायकलवरचं फिरतं स्वयंपाकघर विकणारा गंमत्या म्हातारा मला म्हणाला, ‘तू पेपरमध्ये माझ्या कीचनवर लिहिणार असशील तर मी तुला या सायकलवर दहा टक्के सवलत देईन.’ त्याच्या या ‘ऑफर’मुळे मुंबईच्या रस्त्यांवर मी मोबाईल कीचनमधून रस्त्यांवर फिरत वडापाव विकते आहे, असं मजेदार चित्र मला दिसलं. मी मनात म्हटलं, ‘आता एवढाच अनुभव घ्यायचा उरला आहे.’
-डॉ. अंजली कीर्तने
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply