गोपाळ गोविंद फाटक हे त्यांचे मूळ नाव असणार्या नानासाहेब फाटक यांचा जन्म २४ जून १८९९ रोजी झाला. विद्यार्थीदशेतच १९१५-१६ च्या सुमारास नानासाहेबांनी ‘ महाराष्ट्र हितचिंतक भ्रातृमंडळ ‘ या हौशी नाट्यसंस्थेने केलेल्या काकासाहेब खाडिलकर यांच्या ‘ सत्वपरीक्षा ‘ या नाटकात विश्वामित्राचे काम केले. ही त्याच्या आयुष्यातील पहिली भूमिका , ही पहिलीच भूमिका खलनायकाची होती. १९१८ मध्ये स्कुल फायनलची परीक्षा पास झाल्यावर नानासाहेबांना खडकीच्या मिलिटरी डेपोमध्ये कारकून म्हणून प्रवेश मिळाला. तेथील वातावरण न मानवल्यामुळे त्यांनी त्या नोकरीला रामराम ठोकला. वि . गो. शेट्ये यांच्या ‘ रक्षाबंधन ‘ या नाटकानंतर नानासाहेब फाटक यांचे नाव सर्वोतमुखी झाले .या नाटकातील त्यांची गिरीधराची भूमिका खुपच गाजली होती. त्यानंतर त्यांना केशवराव भोसले यांच्या ‘ ललितकलेत ‘ बोलवले पण त्यावेळी तो योग काही आला नाही.
ते गणपतराव जोशी याना गुरुस्थानी मानत मग ते गणपतरावांकडे गेले. चार महिने होते. त्यांना गणपतराव ज्या भूमिका करायचे त्या भूमिका करायच्या होत्या परंतु गणपतराव यांच्या संस्थेत त्या मिळणे अशक्य होते म्ह्णून त्यांनी ती संस्था सोडली. जेव्हा केशवराव भोसले यांचे निधन झाले आणि दत्तोपंत भोसले यांनी ‘ललितकला’ सोडली आणि पेंढारकर-चाफेकर त्याचे मालक झाले. दत्तोबा भोसले ललितकलेत खलनायकाची भूमिका करायचे ते सोडून गेल्यावर चाफेकरांनी दत्तोबांच्या भूमिका करण्यासाठी नानासाहेबांना बोलवले. मनाजोगती संधी मिळते हे पाहून ते ‘ ललितकलेत ‘ गेले. प्रमुख नायक आणि खलनायक म्हणून अनेक भूमिका केल्या. “पुण्यप्रभाव ”, ‘श्री ’, “सोन्याचा कळस”, “बेबंदशाही” अशा नाटकांमधून विविधांगी व्यक्तीरेखा साकारत रसिक मनांवर फाटकांनी अधिराज्य केले. ‘ श्री ‘ या नाटकामध्ये त्यांनी कुसुमाकराची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली. ‘ सोन्याचा कळस ‘ या नाटकात त्यांनी केलेली बाबा शिवगणची भूमिकाही नाट्यप्रेमींना आवडली होती. ‘ राक्षसी महत्वकांक्षा ‘ यामध्ये त्यांनी केलेली विक्रांतची भूमिका अजरामर ठरली होती. ‘बेबंदशाही ‘ तला संभाजी मधुसूधन कोल्हटकर यांनी नानासाहेब फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला. त्यांनी सादर केलेला एकच प्याला मधला सुधाकर लोकप्रिय ठरला. शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकातील त्यांनी सादर केलेली हॅम्लेटची भूमिका नाट्यप्रेमी विसरुच शकत नाही. त्यांनी पुण्यप्रभावमध्ये साकारलेला वृंदावनही सर्वांच्या लक्षात राहिला.
आपल्या या अप्रतिम भूमिकांमुळेच त्यांच्याकाळात नानासाहेब नाट्यसृष्टीचे अनशिषिक्त नटसम्राट झाले होते.
मराठी रंगभूमीवरील त्यांचे “नटसम्राट” हे नाटक इतके गाजले की त्यांच्यामागे कायमच नटसम्राट ही उपाधीच लावली गेली. शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकातील त्यांनी सादर केलेली “ हॅम्लेट ”ची भूमिका ही खूप गाजली गणपतराव जोशी यांच्यानंतर या भूमिकेच्या बाबतीत नानासाहेबांइतके यश कुणालाही मिळाले नाही., आणि ‘ राक्षसी कळस ‘ मध्ये त्यांनी केलेली “ विक्रांत ” ची भूमिका नाट्यप्रेमी कधीच विसरुच शकत नाही. गणपतराव जोशी आणि बालगंधर्व ही त्यांची दैवते होती. एखादा हुशार , होतकरू नट दिसला तर ते जरूर मार्गदर्शन करीत. ‘ माते , तुला काय हवंय ? ‘ या नाटकाच्यावेळी डॉक्टर काशीनाथ घाणेकर याना त्यांनी केलेल्या सूचना उपयुक्त ठरल्या आहेत. याच नाटकात त्यांनी उभा केलेला युधिष्ठिर हा नानासाहेबांनी सादर केलेला खलनायक. जबरदस्त होता. त्यांनी वयाच्या सत्तरीपर्यंत ‘ एकच प्याला ‘ मधील सुधाकर केला , प्रेक्षकांना त्यांचा सुधाकर फार आवडत असे. पुढे २-४ चार चित्रपटात कामे केली. ‘ थोरातांची कमळा ‘ या चित्रपटातील त्यांनी केलेले शिवाजीचे काम खूप गाजले. पण ते चित्रपट क्षेत्रात जास्त रमले नाही.
नटाने जीवनातील विविध अनुभव घ्यावे , अनेक गोष्टी पहाव्या-कराव्या-भोगाव्या, असे नानासाहेबांचे मत होते. बेदरकारपणा हा नानासाहेबांचा स्वभावधर्मच होता. प्रत्यक्ष जीवनात ज्या बेदरकारपणे ते मोटरसायकल चालवीत त्याचप्रमाणे ते त्याच बेदरकारपणे रंगभूमीवर भूमिका करीत. १९५८ साली हैद्राबाद येथे झालेल्या मराठी नाट्य-संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले.
८ एप्रिल १९७४ या दिवशी नानासाहेब फाटक यांचे निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply