६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी सिनेमाने अगदी दिमाखात विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. यावेळेच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वैशिष्ट्य हे की मानाचे समजले जाणारे आणि प्रत्येक कलाकार, निर्माता तसेच दिग्दर्शकांना किमान एकदा तरी सर्वोत्कृष्ट असल्याचा बहुमान मिळावा असे अनेक पुरस्कार यावेळी मराठी कलाकार आणि चित्रपटाच्या नावे जमा झाले आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता (विभागून), अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आणि संगीत दिग्दर्शनाबरोबरच विशेष पुरस्कारावर मराठी चित्रपटांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत भारतीय चित्रपटसृष्टीला विशेषत: बॉलीवुडला दखल घ्यायला लावली आहे. यंदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी धग या चित्रपटाला शिवाजी लोटन-पाटील तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला तो म्हणजे अनुमती चित्रपटासाठी. उषा जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले आहे. तर याच सिनेमासाठी बालकलाकार सर्वोत्कृष्ट अदाकारी दाखवणार्या हंसराज जगताप याला ज्युरी अवॉर्ड मिळाला.
उल्लेखनीय बाब म्हणजे संगीताचे उत्कृष्ट पुरस्कारही मराठी सिनेमाने पटकावले असून गायिका आणि संगीत दिग्दर्शन अशा दोन्ही महत्वपूर्ण श्रेणींचा यामध्ये समावेश आहे. सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून आरती अंकलीकर-टिकेकर यांना तर शैलेंद्र बर्वे यांना संगीतासाठी संहितासाठी पुरस्कार घोषित झाला. विशेष म्हणजे नॉन फिचर फिल्म मध्ये यावेळी सर्वोत्कृष्ट नॉन फिचर म्हणून कातळ याच सिनेमाचे छायाचित्रकार म्हणून अभिन्यु डांगे तर याच चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून विक्रांत पवार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निवड झाली.
विशेष कौतुकाची बाब म्हणजे नॉन फिक्शन मध्ये विविध श्रेणीत पुरस्कार मिळण्याची मराठीसाठी ही बहुधा पहिलीच वेळ आहे. कारण याआधी बहुतेक वेळा इंग्रजी, हिंदी, मल्याळम भाषेतील चित्रपटांनी हा मान पटकावला आहे. पण हळुहळु मराठीतही असे कलाकार, तंत्रज्ञ निर्माण होत आहेत ज्यांना शॉर्ट फिल्म्स बनवण्याची ओढ आहे प्रचंड इच्छाशक्ती सुध्दा आहे. या दुहेरी पॅशन मुळेच या विभागातील रजत कमळ पुरस्काराची माळ मराठी उमद्या कलाकारांच्या गळ्यात पडली आहे.
मराठीत सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून रत्नाकर मतकरी दिग्दर्शित इन्व्हेसमेंट नी रजत कमळचा पुरस्कार मिळवला. म्हणजे या वर्षातला उत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून इन्व्हेसमेंटला गौरवण्यात आले.
यावर्षीचा उत्कृष्ट कला आणि सांस्कृतिक चित्रपट म्हणून मोदीखान्याच्या दोन गोष्टी या चित्रपटाची निवड झाली. एक गोष्ट जिची इथे दखल घ्यावीशी वाटते ती म्हणजे तरुण कलाकारांची कर्तबगारी इथून पुढे मराठी चित्रपटसृष्टीला नजरेआड करुन चालणार नाही. कारण वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्जनशील प्रयोग यावेळेला उषा जाधव आणि संगीतकार शैलेंद्र बर्वेनी पार पाडला आहे.
मराठी चित्रपटसृष्टी कात टाकते आहे असे आपण म्हणतो पण या पुढे जाऊन मराठी सिनेमा ग्लोबल होतो आहे. त्याच्या उत्तम मांडणीमुळे, लेखन कौशल्यामुळे आणि व्यावसायिक गणितांमुळेसुद्धा. इन्व्हेसमेंट, धग, संहिता सारखे चित्रपट जे अजूनही प्रदर्शित झाले नाही आहेत पण वेगवेगळ्या फिल्म फेस्टीवलमधून वाहवा आणि कौतुकाची थाप मिळवत आहेत. आज राष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतली गेल्यामुळे मराठी सिनेमाची ही गाडी पुढे आहे आणि पुढेच जात राहील. तब्बल ११ वेगवेगळ्या श्रेणीतले सर्वोत्कृष्ट पुरस्कार मराठी चित्रपटाला मिळाल्यामुळे गरज आहे ती इथून पुढे सर्वच निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी आत्मचिंतन करुन हुरहुन्नरीने आणि एकजुटीने मराठी सिनेसृष्टीत नाविन्याचे बदल घडवून आणण्याची. त्यासोबतच प्रेक्षकांनी गौरविलेल्या आणि उचलून धरलेल्या मराठी सिनेमाची एक सुवर्णमुद्रा म्हणून स्वीकारण्याची. तरच मराठी सिनेमा विस्तारेल आणि यापुढेही अनेक श्रेणींमधून सर्वोत्कृष्ट मोहोर उमटवेल, हे मात्र नक्की.
— सागर मालाडकर
Leave a Reply