अंग हळदीत न्हाले
म्हणून हुरळू नकोस गं
आता हळदीचा रंग
रोज अनंत छटांत गं
अक्षता त्या रंगीत
येता वाट्यास गं
आता तसे शुभ्र कण
निवडून तू रांध गं
तुझ्यातले जे भले बुरे
दिसेल अगदी उठून गं
आधी लपेटी सारे
मायेच्या मखमली पदरी गं
बोल लावील कोणी तेव्हा
कोसळून उन्मळू नको गं
समजून उमजण्या वेळ लागे
तेव्हा हे कोडे सुटेल गं
जे जे होई सारे ठेवी
अंगणी थोडं थोपवून गं
नकोस देऊ हवा निखाऱ्या
ठिणग्या साऱ्या फुलतील गं
दिस मास घर आंगण
आनंदाने फुलवं गं
मनाची वाट पोटातून
सांगून जाते माय गं
शिकून सवरून शहाणी हो
सारखे तोलू मोलू नये गं
धीर धर, धारेवर नको
आठव मायबापाचा संसार गं
साऱ्यात मिसळून विसरू
नको तू स्वतःलाही जप गं
हीच शुभेच्छा देते सखी तुजला
समाधानी सुख हेच खरे साज गं!!
— वर्षा कदम.
Leave a Reply