नवेगाव बांध गोंदिया पासून ५५ किमी. अंतरावर, नागपूर गोंदिया हे अंतर १७० किमी. ही जागा भारतातील पक्षी व स्थलांतरीत पक्षांचे माहेरघर आहे. नवेगाव बांध म्हणजे ७५ फूट लांब मातीचा बंधारा ज्यामुळे मोठा जलाशय सात डोंगरांच्या कुशीत पसरलेला आहे,चोहोबाजुनी घनदाट झाडी. त्यामधून २ किमी लांबीचा मोटर रस्ता जलाशयाच्या कडेने एका टेकडीवर जातो.या रस्त्याच्या कडेने राहण्याकरता जंगल खात्याने छान बंगले बांधले आहेत, जलाशयाचा विस्तार ११ चौ.किमी. असून मध्यात खोली ७५ फूट आहे. या जलाशयाच्या इतिहासाशी कोलू पाटील यांचे खास नाते जोडलेले आहे. १३ व्या शतकापासून हा सर्व प्रदेश अनेक जलाशयाकरिता प्रसिद्ध होता. अनेक संस्कृत सुभाषिते यावर रचलेली आहेत. हजारोंनी स्थलांतरीत पक्षी येत असत. त्यांची निघृण हत्त्या होत असे. हे सर्व थांबविले पाहिजे याची जाणीव तडफदार व्यक्तीमत्वाचे फॉरेस्ट ऑफिसर मारुती चितमपल्ली व जगप्रसिद्ध पक्षीतज्ञ सलीम अली यांनी करून दिली हा जंगलठेवा सोन्याची खाण आहे. यातूनच नवेगावबांध पक्षी निरीक्षण स्थान स्थापन झाले. जगभरातले अनेक पक्षी मित्र येथे डेरे दाखल होऊ लागले. जखमी प्राणी उपचार झाल्यावर विविध प्राणी संग्रहालयांना भेट दिले गेले.
नवेगावबांध तलावावर मालकी हक्क पाटील कुटूंबीयांचा आहे. त्यांना सरकारनी १८ लाख रू,देऊ केले होते पण त्यानी ते नाकारले.तळ्यात कोलुसुर नावाचे निर्मनुष्य बेट असून त्यावर कोळू पाटीलांची समाधी आहे.फार पूर्वी आदिवासी या ठिकाणी आपल्या मौल्यवान गोष्टी सुरक्षित जागा म्हणून ठेवीत.बेटाला लागून दोन पिवळसर दगड आहेत. त्यांना मामा भाच्यांचे दगड म्हणतात.तलावात १६० ते १७० प्रकारचे मासे असून मच्छीमारीचा जोरात धंदा चालतो.त्यावर सरकारचे नियंत्रण आहे कारण अनेक पक्षांचे ते खाद्य आहे.एकदा ५० किलो वजनाचा भला मोठा मासा मिळाला होता.५०/६० तऱ्हेच्या पाणवनस्पती तळ्याकाठी मिळतात जे पक्षांचे खाद्य आहे. काठावर संजयकुटी नावाचा एक मजली राहण्याचा बंगला आहे,जेथे रात्रीचे आपले जेवण न्यावे लागते.रात्रीचा मुक्काम व पहाटे पक्षी निरीक्षण असा कार्यक्रम असतो.आम्ही गेलो असताना सूर्य अस्तास जाण्याची वेळ झालेली.तांबडया गोळ्याचे स्थिर प्रतिबिंब, केशरी लाल रंगानी उधळलेले आकाश,डोंगराआड हळूवारपणे लपत जाणारा सूर्याचा गोळा,घरट्याकडे जाणारे पक्षी,त्यांचा चाललेला किलबिलाट,संथपणे पाण्यातून जाणाऱ्या होडया,हवेतील वाढत जाणारा गारठा,वातावरणातील निरव शांतता,डोळ्याचे पारणे फिटले होते.दुसरया दिवशी सकाळचे ६ वाजलेले.पक्षांचा गोड किलबिलाट,तळ्याचे शांत पाणी, जवळच उत्तम बांधलेला सिमेंटचा रस्ता, दुतर्फा उंचच उंच झाडे,तळ्याला लागून उभे राहण्यास छान सज्जा.केसरी सोनेरी गोळा समोरील बाजूस हळूहळू वर येत होता व मधेच डोंगर रांगात गडप होत होता.सोनेरी किरणांनी तळ्याचे पाणी नाहून निघत होते.दोन नावाडी छोटा मचवा वल्हवीत अगदी सूर्य बिंबावरून पुढे जात होते.पाणी एखाद्या छोटया बाळासारखे गाढ झोपी गेलेले.अगदी औषधाला सुद्धा एखादी लाट दिसत नव्हती.हा आनन्दोत्सव अर्धा तास मुग्ध होऊन पाहात होतो.एके वर्षी काळ्याभोर रंगाच्या चांदी बदकांचा प्रचंड मोठा थवा अंदाजे ५० ते ६० हजार बदके,५ किमी लांब, २० मीटर रुंद काळा लांबचलांब पट्टा पाण्यावर तरंगत होता.त्यांच्या पंखांचा आवाज ढगांच्या गडगडाटा सारखा वाटत होता,काय अविस्मरणीय दृश्य असेल!
नवेगावबांध पासून १८ किमी अंतरावर इटीया डोह धरणाचा भव्य प्रकल्प असून ७५ स्क्वे.किमी परिसर असलेला अवाढव्य जलाशय सात डोंगरांच्या मध्ये पसरलेला आहे.धरणावरून चालण्यास उत्तम सोय.जलाशयाच्या काठापर्यंत जाण्यास पायऱ्या.धरणाचा एक दरवाजा उघडलेला, ज्यामधून जलस्त्रोत शेतीकरता जात होता.या एका धरणामुळे ही भूमी सुजलाम सुफलाम झाली आहे.हा डोह आदिवासींचे दैवत होते.शे दोनशे वर्षाच्या अनेक अदभूत कथा या परीसराभोवतीच्या आहेत.यावरील चितमपल्लींनी लिहिलेले चकवा चांदण हे पुस्तक वाचनीय आहे.इरिगेशन खात्याचा लाल चुटुक रंगातील बंगला व त्या समोरील बाग आपले लक्ष वेधून घेते.
४० ते ५० गावांना पाणी पुरवठा व शेकडो एकर शेतीला पाणी पुरवले जाते.आजुबाजुनी घनदाट जंगल, प्राणी, पक्षी सर्व परिसरच मोहित करणारा आहे.जवळपास स्थलांतरित झालेल्या तिबेटी लोकांची वस्ती आहे.
डोहाजवळ एका पाणथळीच्या शेतावरील बांधावर उभे राहून आम्ही पक्षी निरीक्षण करण्यास सुरवात केली.दूर दलदलीत विदेशातून आलेले दोन सारस क्रेन नर मादी,चांगले ५ ते ७ फूट उंच जोडीने फिरत होते.परदेशातून आलेले हे पक्षी गेली ७ ते ८ वर्षे येथेच स्थाईक झालेले आहेत.त्यांचे फिरणे एखाद्या आदर्श जोडप्या सारखे होते.या पक्षांची मादी आयुष्यभरात फक्त दोनच अंडी घालते.त्यातून एक नर व दुसरी मादी तयार होतात. त्यात चूक होत नाही.ही जोडी जमिनीवर फिरत असताना दूरवरील आकाशातील स्थाना वरून दुसरी एक सारस पक्षाची जोडी खालील पक्षांना येताना दिसली.एकमेकांना कॉल देत ओळख पटली.हळूहळू ते जमिनीवर उतरण्याच्या प्रक्रियेत सिद्ध झाले. एखादे विमान विमानतळावर उतरावे तसे ते दोघे अलगदपणे जमिनीवर उतरले.भेट होताच काहीतरी इशारा मिळाला. दोन्ही जोड्या आकाशात उडाल्या व नविन जागेवर उतरत जोडीने फिरण्यास सुरवात केली.या सारस पक्षांना अतिशय मानाने ठेवले जातें.त्यांची शिकार होऊ नये म्हणून शेतकरी जीवापाड मेहेनत घेतात.त्यांना जपतात .अळ्या औषधी फवार्यानी विषारी बनू नयेत म्हणून त्या भागात फवारे मारत नाहीत.रांत्र दिवस त्यांच्यावर पहारा ठेवतात.ही सर्व शिकवणूक माधवराव पाटीलांची आहे.
या पक्षांचा लग्नसोहळा म्हणजे निसर्गातील एक अजब चमत्कार आहे.एका मादी समोर अनेक उपवर नर आपल्यातील चांगले गुण व आपल्याला येणाऱ्या कला दाखवीत अखंड प्रयत्न करीत राहतात.मादी सहज पणे नराची पसंती करत नाही.हा सर्व सोहोळा दोन्ही बाजूच्या सग्यासोयर्याच्या समोर चालू असतो.मात्र एकदा मादीने नर पक्का केला की ते दोघे सर्वांसमोर एकमेकात माना अडकवितात आणि जन्मभर एकत्र संसार करणार याची हमी देतात. हे वचन जन्मभर कसोशीने पाळले जाते.हजारो मैल दुरच्या प्रदेशातून येऊन हे सारस पक्षी नवेगाव हेच आपले घर मानतात व तेथेच स्थाईक होतात.सगळी कथाच चक्रावून टाकणारी आहे.
सुगरण पक्षाची घरटी बरयाच जागी दिसत होती.त्यात खालून आत शिरण्याची सोय असते.छोटे दार, खिडकी ,मऊ गादी सारखी जागा.घरटे बांधण्याच्या जागा वाऱ्याच्या दिशेनुसार बदलतात.त्यामुळे ती पडत नाहीत. त्यांच्या जागांवरून पावसाचा व वादळाचा अंदाज करता येतो.घरटे बांधण्याचे काम नराचे.मादी कोणते घरटे चांगले आहे, याचा फिरून अंदाज घेते.नर घरट्यावर एखादे सुशोभित पान नाहीतर फुलाचा गुच्छ बांधतो.मादीने पसंती दिली तरच मिलन होते.मादीचा मान सर्वात ज्यास्त असतो.अत्राम नावाच्या गाईडने ह्या सर्व पक्षांचे जीवन डोळ्यासमोर उभे केले होते. एका छोट्या तळ्यात पांढरी, केशरी, गुलाबी कमळे फुललेली. त्या मधून काळ्या पाणकोंबड्या पोहत होत्या.
— डॉ. अविनाश केशव वैद्य
Leave a Reply