हारनूपुरकिरीटकुण्डलविभूषितावयवशोभिनी
कारणेश्वरमौलिकोटिपरिकल्प्यमानपदपीठिकाम् ।
कालकालफणिपाशबाणधनुरङ्कुशामरुणमेखलां
फालभूतिलकलोचनां मनसि भावयामि परदेवताम् ॥ १॥
नवरत्न शब्दाचा संबंध आहे नवग्रहांशी. सूर्यापासून तेजाचे ग्रहण करतात म्हणून त्यांना ग्रह म्हणतात. मग सूर्याला ग्रह का म्हणायचे? तर तो आई जगदंबे पासून तेज ग्रहण करतो.
या ग्रहांच्या तेजाने चमकतात नवरत्न.
सोप्या शब्दात जगातील समस्त चमकदार, आकर्षक अर्थात सुखदायक गोष्टींच्या मागे आहे आई जगदंबा. तिच्या दिव्य वैभवाचे हे स्तोत्र नवरत्नमालिका.
हारनूपुरकिरीटकुण्डलविभूषितावयवशोभिनीं- हार म्हणजे मोत्यांच्या माळा,नूपुर म्हणजे पैंजण,किरीट म्हणजे बाजुबंद,कुण्डल इ. अलंकारांनी विभूषित केलेल्या अवयवांनी सुशोभित दिसणाऱ्या,
कारणेश्वर- सर्व विश्वाचे कारण असणाऱ्या भगवान शंकरांच्या,
मौलिकोटि- कोट्यावधी मस्तकांना
परिकल्प्यमान
पदपीठिकाम् – जणु काही आपली पद पीठिका अर्थात पाय ठेवण्याची जागा समजणाऱ्या, प्रत्येक ब्रह्मांडाचे एक ब्रह्मदेव तसे एक शंकर. अशा अनंत कोटी ब्रह्मांडांच्या अनंत कोटी शंकरांच्या मस्तकावर पाय ठेवणारी. अर्थात यांच्यावर सत्ता चालवणाऱ्या,
कालकालफणि- कालाचाही काल असणाऱ्या फणि म्हणजे महासर्प नागराज शेषाला,
पाश म्हणजे दोरी,बाण,धनुष्य,
अंकुश इ. गोष्टी हातात धारण करणाऱ्या,
अमरुणमेखलां- लालबुंद कंबर पट्टा धारण केलेल्या,
फालभूतिलकलोचनां- मस्तकावर वेणीसाठी दोन भागात फाकवलेल्या केसांच्या मध्यभागी तिलक स्वरूपाचा तिसरा नेत्र असणाऱ्या,
मनसि भावयामि परदेवताम् – परमतमा आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply