जनतेचा सहभागाने व्यापार अस्त्राचा वापर करुन चीनवर दबाव आणा
देशातील अनेक व्यापारी संघटनांनी चीनवर चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे, मात्र ते पुरेसे नाही ही चळवळ देशव्यापी झाली पाहिजे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर प्रश्नावर चीनने पाकिस्तानची बाजू उचलली आहे. हा विषय पाकिस्तानने संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात नेण्यास चीन ने मदत केली. भारताने विभागीय शांतता व स्थैर्याच्या दृष्टीने भूमिका पार पाडावी, असा सल्ला चीनने दिला. मात्र त्यावर, ‘दोन देशांमधील मतभेदांचे रुपांतर वादामध्ये होऊ न देणे खूप महत्त्वाचे आहे,’ अशा शब्दांमध्ये भारताने चीनला सुनावले आहे.लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या भारताच्या निर्णयाचा चीननं विरोध केला आहे. चीनने म्हटले आहे की, भारत-चीनच्या पश्चिम सीमेवरील काही भूभाग आपला असल्याचा भारताचा दावा आम्हाला मान्य नाही.
चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठा समर्थक आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानची मदत घेऊन चीनला भारताला दहशतवादा मध्ये अडकवून आर्थिक प्रगती पासून थांबायचे आहे.म्हणूनच पाकिस्तानला समर्थन दिल्यामुळे चीनला धडा शिकवणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपल्या हातामध्ये असलेली असलेला एक हुकमी एक्का म्हणजे चीनचा भारताशी होणारा प्रचंड व्यापार. आपण चीनवर व्यापार अस्त्राचा वापर करुन दबाव आणू शकतो. गेल्या पाच वर्षापासून आपण चीनशी व्यापारी समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे .परंतु चीन लबाडी करुन भारताला आयाती पेक्षा पाच पटीने जास्त वस्तू निर्यात करतो.आंतरराष्ट्रीय व्यापारी कायद्यामुळे आपल्याला चीनच्या आयातीवरती बंदी घालता येत नाही.म्हणून सामान्य नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून चीनमधून होणारी विनाकारण आयात थांबवली व देशाला मदत केली पाहिजे.
भारतीय बाजारपेठावर चीनी आक्रमण
गेल्या काही दशकांपासून चिनी घुसखोरी ही फक्त सीमेपुरतीच मर्यादीत नाही तर त्यांनी भारतीय बाजारपेठाही काबीज करायला सुरूवात केली.सणातील व निवडणुकांनंतर फटाक्यांची मागणी लक्षात घेऊन चिनी फटाके मोठय़ा प्रमाणावर भारतीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल होत आहेत.भारतीय फटाक्यांच्या तुलनेत चिनी फटाके सुरक्षिततेच्या/ पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक धोकादायक आहेत.
भारत हा सणांचा देश आहे.मागच्या वर्षी रक्षाबंधनाकरता ७५% राख्या चीनी बनावटीच्या होत्या. गणेशमूर्तीच्या बाजारपेठेत चीनने घुसखोरी पूर्वीच केलेली आहे.मोठय़ा प्रमाणात साजर्या केल्या जाणार्या उत्सवांना हेरून, आकाशकंदिल, दिवे, विविध भेटवस्तूंनी भारतीय बाजारपेठ चीनने व्यापत आहे. मागच्या दिवाळीत चिनी विक्रेत्यांनी भारतीय बाजारपेठेत १८०० कोटी रुपयांचा नफा कमावला.
फराळाचे पदार्थ वगळता दिवाळीच्या सर्व वस्तूंमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. चिनी आकाश कंदिलांनी बाजारपेठेवर कब्जा केला आहे. चिनी तोरणांनी घर/बाजार सजतो. प्लॅस्टिकच्या दिव्यांच्या माळांना मोठी मागणी आहे. देशप्रेमी नागरिकांनो देशी वस्तूच विकत घ्या.
बेकायदेशीर आयातीमुळे उद्योग धोक्यात
चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असल्याने भारतात चिनी बनावटीच्या फटाक्यांना अधिक मागणी असते. केंद्र सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घातली होती. मात्र समुद्रमार्गे बेकायदेशीररीत्या आयात होणाऱ्या या फटाक्यांमुळे फटाका उद्योग धोक्यात आ्ला आहे.
आपले फटाके गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चिनी फटाक्यांपेक्षा निश्चित चांगले आहेत. तर चिनी फटाक्यांमध्ये क्लोरेट आणि पर-क्लोरेटचा या विषारी केमिकलचा वापर करण्यात येतो.एकूणच चिनी फटाके बनवताना हलक्या प्रतीचा व हानिकारक कच्चा माल वापरला जात असल्याने ते आपल्या फटाक्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. चिनी फटाके जास्तकाळ टिकत नाहीत.त्या तुलनेत भारतीय फटाके वर्षभर टिकतात. मात्र फ़टाका उद्यागाने आधुनिक बनण्याची गरज आहे,जेणेकरून भारतीय फटाके जागतिक उत्पादनांशी स्पर्धा करू शकतील.आपण चीनी फटाके आपण टाळावेत कारण आपल्या फटाका उद्योगाचे हजारो कोटींचे नुकसान होते.
“परदेशातून आयात केलेल्या फटाक्यांची किरकोळ बाजारात विक्री करणे बेकायदेशीर आहे. कायद्याचे उल्लंघन करून बाजारात फटाके विकताना कोणी आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई होते. मात्र या वर्षी याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.
तस्करी रोखण्यात अपयश
परदेशातून येणा-या कंटेनरची चौकशी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कस्टम विभागाचे रडगाणे असते. बंदरावर येणा-या ५-१०%कंटेनरची तपासणी केली जाते. मागे शिवाकाशीमध्ये चिनी फटाके जप्त करण्यात आले होते. हे फटाके तुतिकोरीनमधून मुंबईत नेले जात होते. दोन वर्षापुर्वी नेपाळमधून देशात आलेले ६०० कंटेनर पकडण्यात आले होते. बहुतेक माल नेपाळमार्गे किंवा समुद्रमार्गे भारतात येतो .
सध्या देशातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट चीनने पुर्णपणे कॅप्चर केले आहे. मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत चीनच्या वस्तुंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या वस्तू आपल्या देशात तयार झालेल्या तशाच वस्तूच्या तुलनेत स्वस्त मिळतात, अनेकदा यात नावीन्य देखील असल्याचे दिसते. भारतातील ग्राहकाची मानसिकता आपल्यापेक्षा चीननेच चांगली ओळखलेली आहे.२०१९ च्या निवड्णुकीत अनेक ठिकाणी चिनी बनावटीच्या प्रचारसाहित्याला पसंती दिली होती.
देशी वस्तूच विकत घ्या
चीनच्या `मेड इन चायना’ वस्तूंनी भारतात जम बसवला आहे. त्यांनी आतापर्यंत देशी बाजारपेठेतील २०-२५ टक्के वाटा पटकावला आहे. किंमती कमी असल्याने भारतीय विक्रेते व ग्राहकांची चिनी वस्तूंना पसंती लाभत आहे. भारतीय बाजारपेठेत मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून देवांच्या तसबीरी ते पूजेच्या साहित्यापर्यंत चीनची घुसखोरी आहे. आपली बाजारपेठ चिनी वस्तूंनी ओसंडून वाहते आहे. टाचण्यांपासून, लहान मुलांच्या निरनिराळ्या प्रकारच्या खेळण्यांपर्यंत, वॉटर प्युरिफायर, गॅस गीझर, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, इलेक्ट्रिकच्या आकर्षक माळा, इलेक्ट्रिकच्या इस्त्रीसारख्या अनेक वस्तू अशा प्रकारच्या चिनी बनावटीच्या वस्तू कमी किमतीत बाजारात सहज मिळतात.चीन खास भारताकरता वस्तू बनवून आपल्या लहान, मध्यम उद्योगांना पध्दतशीरपणे बरबाद करत आहे हे आपण लक्षात का घेत नाही?
खेळण्यांचे मार्केट ८० टक्के चिनी बनावटीच्या खेळण्यांनी भरले आहे. `सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’ प्रमाणे चिनी बनावटीच्या ५७ टक्के खेळण्यांमध्ये प्रमाणाबाहेर विषारी रसायने आढळली होती. लहान मुलींच्या ज्वेलरीत शिसे वापरले जाते. त्यामुळे शरीराला धोका असतो. भारतात अशा खेळण्यांवर नियंत्रण ठेवणारी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाही. पालकांनी एकत्र येऊन या खेळण्यांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणला पाहिजे.
लघुउद्योग उत्पादनाला चालना देण्याची गरज
चिनी वस्तू या लघु उद्योगांतून बनविल्या जातात.चिनी स्त्रिया या वस्तू घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अत्यंत कमी आहे.आपल्या उद्योजकांची मानसिकताच बदलली आहे.चिनी वस्तू जर स्वस्तात मिळतात तर आपण त्या वस्तू कशाला बनवायच्या? या विचाराने आपण चिनी वस्तूंचे कंटेनरच्या कंटेनर खरेदी करतो वा स्मगल करतो, त्यावर आपले लेबल लावतो आणि बाजारात विकतो. त्यात भरपूर पैसे कमावतो. पण यामुळे आपण चिनी अर्थव्यवस्थेला हातभार लावतो आहोत. आपल्याकडे बेकारी वाढलेली आहे. सामाजिक सुरक्षितता धोक्यात येत आहे. चीनशी जर आपल्याला मुकाबला करावयाचा असेल तर आपणही त्यांच्याप्रमाण लघुउद्योग निर्माण करावयाला पाहिजे. त्यासाठी स्वस्तात जागा, भांडवल, कच्चा माल उपलब्ध करून दिले पाहिजे. कर कमी केले पाहिजेत. यामुळे आपणसुद्धा दर्जेदार वस्तू बनवू शकू. आता हा सर्व प्रकार रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन, भारतीय लघुउद्योग उत्पादनाला चालना देण्याची गरज आहे.
‘मेक इन इंडिया‘ – बाय स्वदेशी
भारताचे याआधीचे `बाय चायनीज’ धोरण त्या देशाच्या पथ्यावरच पडत आहे. चिनी कंपन्यांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ बनली आहे. स्वदेशीची भाषा नष्टच झाली आहे.‘मेक इन इंडिया’ला चालना मिळावी.
लोकहो, स्वदेशी मालच खरेदी करा. चिनी नको.जे आपल्या देशात चांगले पिकते / बनते, ते खरेदी करू या. सरकारने चीनकडून आयात होणार्या राख्या, दिवाळीत येणारे आकाश कंदिल, पणत्या, लाइटच्या शोभीवंत माळा, रंगपंचमीमध्ये येणार्या पिचकार्या पूर्णपणे थांबवल्या पाहिजे.
२०१७ साली डोकलामच्या मुद्यावरून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘चायनिज’ वस्तूंविरोधात देशपातळीवर मोहीम राबविण्यात आली. त्या मोहिमेला जनमानसातून समर्थन मिळाल्यामुळे चीनी निर्यात ३०-४० % कमी झाली .
ज्यावेळेस चीनला लक्षात आले कि भारतीय जनता त्यांच्या विरोधात गेल्यामुळे त्यांचा व्यापार कमी होत आहे, त्या वेळेला त्यांनी डोकलाम मधून माघार घेण्याचे ठरवले. म्हणजेच डोकलाम मधून माघारीचे एक महत्वाचे कारण होते चीनी मालावर बहिष्कार. हे अस्त्र आपण पुन्हा एकदा वापरले पाहिजे.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply