त्याची मातृभाषा नेपाळी. तो नेपाळहून महाराष्ट्रात येतो. आई देवाघरी गेलेली. वडील गुरखा म्हणून रात्रभर जागत. गावात पहारा देत. लोकांना जागवत. एक भाऊ पाठीशी. तो जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण घेतो. गावातील व्यापारी , शिक्षक त्यांना मदत करतात. माणुसकी जपतात. मराठी भाषा उत्तम बोलतो. पुढे तो इंजिनीयर होतो. पुण्यामध्ये स्वत:चे वर्कशॉप चालवतो. जगण्यासाठी धडपड करतो. आता ते दोघेही भाऊ परदेशात काम करतात.
बालपणी आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. गावाकडून माझा डबा यायचा. मनसोक्त जेवायचे. तलावात पोहायला जायचे असा दिनक्रम. आंतरराष्ट्रीय, अनभिज्ञ, विषयावर तो बोलायचा. उत्सुकतेने आम्ही ऐकायचो. आम्ही घडत होतो. तो आम्हास घडवत होता.
कलाटणी देणारा हा मित्र होता. भीमबहादूर लालबहादूर बम असे त्याचे नाव. त्याची मातृभाषा मराठी नसतानाही या विषयात त्याला सर्वात जास्त गुण दहावीच्या परीक्षेत मिळाले.
तीसेक वर्षांपूर्वीच्या त्याच्या सहवासातील अनेक आठवणी ताज्या आहेत. पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास असायचा. कष्ट घेऊन, परिस्थितीशी झगडणे, यश संपादन करणे हे गुण त्याच्याकडून शिकायला मला मिळाले. शिकण्यासारखे त्याच्याजवळ भरपूर होते. त्यांचे वडील आजमितीस हयात नाहीत. माणसं आठवणी ठेवून जातात कुठे? हा निरुत्तर करणारा प्रश्न. आता त्यांची भेट नाही; पण माणूस सहवासात घडतो, तो सहवास आम्हाला लाभला.
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
Leave a Reply