जहाज गल्फ मध्ये ओमान च्या किनाऱ्याजवळ अँकर टाकून उभे होते. इंजिन रूम मध्ये तापमान बेचाळीस अंश पेक्षा जास्त होते सी वॉटर टेम्परेचर वाढल्यामुळे जनरेटर चा लुब ऑइल टेम्परेचर हाय अलार्म येत होता. जहाज गल्फच्या बाहेर पडे पर्यंत गर्मीत जास्त काम काढू नका आणि करू पण नका अशी सूट चीफ इंजिनियरने सगळ्यांनाच देऊन ठेवली होती. पण जनरेटर चा लुब ऑइल अलार्म आल्यामुळे सगळं निस्तरून होईपर्यंत तीन साडे तीन तास घाम गाळायला लागला होता. सगळ्यांचे बॉयलर सूट घामाने निथळायला लागले होते. अँकर असल्याने साडे चार वाजताच सुट्टी झाली होती जनरेटर चा प्रॉब्लेम पण सॉल्व केला गेला होता. संध्याकाळी सहा वाजता डिनर करून सगळेजण इकडच्या तिकडच्या गप्पा मारून आप आपल्या केबिन मध्ये निघून गेले होते.
जहाज गल्फ मध्ये येऊन जवळपास महिना होत आला होता. गर्मी मुळे मेंटेनन्स ची बरीचशी कामे पोस्टपोन केली होती. जहाज ओमान मध्ये थोडा आणखीन कार्गो लोड करून युरोप मध्ये रोटरडॅमला जाणार असल्याने सगळ्यांना हायसे वाटले होते. रोज रोज चाळीस पंचेचाळीस अंश तापमानात थोडेसे का होईना पण काम करून सगळे थकले होते. जहाजाला महिनाभर कमी अंतरावर असलेले पोर्ट आणि वारंवार कार्गो लोडींग आणि डिस्चार्ज ऑपेरेशन करावे लागल्याने सगळेच जण कंटाळले होते. कधी एकदा लांबची सफर मिळते आणि गल्फ मधून बाहेर पडतो असे सगळ्यांना झाले होते. जहाजावर एव्हिएशन फ्युएल लोड केले होते, जवळपास सव्वा लाख टन अत्यंत ज्वालाग्रही कार्गो असल्याने विशेष खबरदारी घेतली गेली होती.
सकाळीच फायर अलार्म सिस्टीम टेस्ट केली गेली होती. फायर अलार्म वाजवून फायर डोअर ऑटोमॅटिकली बंद होतात की नाही ते तपासून बघत असताना एक अपघात घडला.
अलार्म वाजवण्यापूर्वी अनाउन्समेन्ट पण केली की फायर डोअर पासून लांब रहा. पण चीफ कुक केबिन मधून खाली मेस रूम मध्ये येत असताना फायर डोअरच्या समोर आला आणि नेमके त्याच वेळी ऑटोमॅटिकली फायर डोअर रिलीज झाले. चीफ कुकच्या तोंडावर धाडकन दरवाजा आदळला, त्याचे नाक फुटून त्यातून रक्ताची धार पण लागली. कपाळावर भले मोठे टेंगूळ सुद्धा आले. दिवसभर आणि रात्री डिनर पर्यंत सगळे जण चीफ कुक बद्दल हळहळत होते. नाक फुटून सुद्धा त्याने नेहमीप्रमाणे सगळ्यांसाठी जेवण बनवले होते आणि रोजच्या सारखाच हसत हसत सगळेजण जेवायची वाट बघत होता. जोपर्यंत सगळे जेवत नाहीत किंवा उशिरा जेवायला येणाऱ्याचे जेवण काढले जात नव्हते तोपर्यंत हा चीफ कुक स्वतः जेवत नसे. कपाळावरचे टेंगूळ संध्याकाळ पर्यंत बरेच कमी झाले होते पण त्याचे डोकं दुखत असल्याचे तो सगळ्यांना सांगत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करायला आल्यावर मेस रूम मध्ये कुजबुज सुरु होती की रात्री बारा नंतर ड्युटी ए बी ला केस मोकळे सोडलेली एक बाई लाईफ बोट च्या खाली येरझाऱ्या मारताना दिसली. त्याने ब्रिजवर धावत धावत जाऊन ड्युटी ऑफिसरला याबद्दल सांगितले असता. पहिल्यांदा ड्युटी ऑफिसरने त्याला वेड्यात काढले, पण नंतर त्याच्या समाधानासाठी बाहेर येऊन पाहिले तर दोघांना पण तिथे काहीच दिसले नाही. ए बी ने पण भास झाला असावा म्हणून स्वतःच्याच टपली मारून घेतली. पुन्हा तासाभरात त्याला तोच अनुभव आला आणि त्याने यावेळी ब्रिजवर धावत न जाता वॉकी टॉकी वर ड्युटी ऑफिसरला कॉल केले. ए बी ने त्याची नजर येरझाऱ्या घालणाऱ्या बाई वरून काढली नाही. ड्युटी ऑफिसर बाहेर आला आणि ए बी च्या पाठीवर हात मारून विचारू लागला दाखव कुठे आहे कोण ते, त्यासरशी ए बी ने दचकून बाई वरील नजर हटवून मागे वळून बघितले. त्याने खाली लाईफ बोट कडे ईशारा करून पाहिले तर ती बाई केस मोकळे सोडून येरझाऱ्या घालता घालता खाली निघून चालली आहे, पण ड्युटी ऑफिसरला मात्र तिथे कोणीच दिसत नव्हते. तेवढ्यात त्याच डेकवर एका केबिनची लाईट सुरु झाली ऑफिसर ए बी ला घेऊन त्या केबिन कडे गेला. चीफ कुक डोकं दुखतंय म्हणून पेन किलर ची गोळी घेण्याकरिता उठला होता. दोघांनी त्याला बाहेर बोलावले आणि विचारले कोणी दिसते का किंवा इथे येऊन गेल्यासारखं वाटते का ते सांग. चीफ कुक बोलला एवढ्या रात्री इथे कोण कशाला मरायला येतेय.
ड्युटी ऑफिसर ने त्याला सगळी हकीकत सांगितल्यावर चीफ कुक ए बी ला बोलला डोकं माझे आपटले पण परिणाम तुझ्यावर झाला की काय. नंतर ए बी त्याची ड्युटी संपल्यावर सकाळी उजाडे पर्यंत ब्रिजवरच थांबला होता.
ब्रेकफास्ट संपवून खाली इंजिन रूम मध्ये गेल्यावर आमचा एक अतरंगी मोटरमन हसत होता, गेल्या गेल्या विचारायला लागला की रात्रीची स्टोरी ऐकली का?? त्या स्टोरी मध्ये ड्युटी ऑफिसर हिरो होता आणि मी हिरोईन. त्याला विचारले अरे लांब केस कुठून आणले आणि साडी कोणाची नेसली होतीस. तो सांगू लागला ती साडी नसून ग्रीस व ऑइल चे हात पुसण्यासाठी आलेल्या कॉटन वेस्ट मधील एक रंगीत आणि लांब कापड होते तेच साडी सारखे गुंडाळले. लांब केसांचा विग जहाजावर कोणीतरी फॅन्सी ड्रेस साठी आणून ठेवला होता तो काल नेमका ड्युटी ऑफिसरला सापडला आणि त्याने आज ए बी चा बकरा बनवू या असे सांगितले.
सकाळी ए बी केबिन मध्ये पण जात नव्हता तेव्हा मग त्याला ड्युटी ऑफिसरने विग घालून दाखवला आणि त्याला शांत केले. ए बी ला बकरा बनवायच्या नादात जर रात्री त्याला भीतीने अटॅक वगैरे आला असता किंवा त्याने गोंधळ घातला असता तर कॅप्टन ने आज आम्हाला घरी पाठवून आमचाच पोपट केला असता.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply