कामावरील निष्ठा, चातुर्य आणि निर्भयता जवळ असली तर वेळप्रसंगी मृत्युसारख्या संकटावरदेखील मात करून मृत्यू टाळता येऊ शकतो. या संदर्भात मोगल बादशहा जहांगीर याच्यासंबंधीची एक हकिकत.
जहांगीर न्यायदानासाठी फारच प्रसिद्ध होता. आपल्या राजवाड्याबाहेर त्याने एक घंटाच बांधली होती व आपल्यावरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी कोणीही, केव्हाही ती घंटा वाजवित असे व जहांगीर तत्परतेने तेथे येऊन त्याच्यावरील अन्याय दूर करीत असे.
जहांगीरच्या अंतःपुरात त्याचे काही विश्वासू सेवक होते. एका रात्री असाच एक सेवक राजा जहांगीरच्या जवळ उभा राहून त्यांच्या पेल्यात मदिरा ओतत होता. तो पेला जहांगीरला देत असताना चुकून हिंदकळला व त्यातील मदिरेचा एक थेंब जहांगीरच्या भरजरी पोशाखावर पडला.
जहांगीरची मनःस्थिती त्या दिवशी बरोबर नव्हती. त्यामुळे पोशाखावर थेंब पडताच तो संतप्त झाला व त्याने त्या सेवकाला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. ती शिक्षा ऐकून त्या सेवकाला धक्का बसला खरा; मात्र दुसऱ्याच क्षणी तो सावरला व कसलाही विचार न करता त्याने सुरईतील सर्व मदिरा जहांगीरच्या अंगावर ओतली. त्यामुळे जहांगीर आणखीनच संतापला. तोपर्यत त्याचे सैनिक आले होते व मृत्युदंड देण्यासाठी सेवकाला पकडून ते घेऊन जाऊ लागले.
जहांगीरला मात्र सेवकाच्या त्या कृत्याचे आश्चर्य वाटले व त्याने त्या सेवकालाच विचारले की, माझ्या अंगावर मदिरा ओतण्याची तुझी हिंमत झाली तरी कशी?
त्यावर सेवक नम्रपणे म्हणाला, महाराज तुम्ही तुमच्या न्यायदानाबद्दल सर्वत्र प्रसिद्ध आहात. जर मदिरेचा एक थेंब अंगावर पडला म्हणून तुम्ही मला मृत्युदंड दिला असता, तर कदाचित तुमच्या न्यायलौकिकाला कलंक लागला असता. लोकांनी तुम्हाला नावे ठेवली असती म्हणून मी तुमच्या अंगावर संपूर्ण सरईच ओतली, की ज्यामुळे मला आता मृत्युदंड दिला तर लोकांचे समाधान होईल व ते तुमच्यावर टीका करणार नाहीत.
त्या सेवकाचे ते चातुर्य, निर्भयता व स्वामिनिष्ठता पाहून जहांगीर खूश झाला व त्याने त्याच्या मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली व नंतर त्यास इनामही दिले.
Leave a Reply