श्रावणाला नकळत्या वयात आधी भेटलो,जगलो आणि मग पाडगावकरांनी आम्हाला सांगितलं – ” श्रावणात घन निळा बरसला ! “
या गीतामध्ये श्रावणातील निसर्गाप्रमाणे, शब्दांमधील रंगांची ओली उधळण भेटली – घन ” निळा , मोरपिसारा- “हिरवा “, रेशमी पाण्यावरती – “निळ्या “, माहेर – ” पाचूचे हिरवे “, ऊन – ” हळदीचे ” (पिवळे) ! हे असे भरजरी “इंद्रधनू “- जी श्रावणाची देन असते, ते पाडगावकरांनी शब्दांनी टिपले.
श्रावण हा कालावधी निसर्गाचा सर्वाधिक आवडता असावा आणि म्हणूनच कँलेंडरलाही हा महिना जास्त आवडत असावा.
आम्हांला लहानपणी याची भुरळ तीन कारणांसाठी पडायची- एकतर श्रावणी सोमवारी शाळेला अर्धी सुट्टी असायची आणि मोठ्या हौसेने त्या लहान वयात पहिला-वहिला उपवास केलेला असल्याने, तो सोडण्याची घाई असायची. चतुर्थी,एकादशी वगैरे नंतर वाट्याला आले. शाळेजवळ “रानातल्या महादेवाचे ” देखणे, पुरातन मंदिर होते. दर श्रावणी सोमवारी आवर्जून त्याच्या दर्शनाला जात असू.
दुसरे कारण म्हणजे आज्जींकडून ऐकायला मिळणाऱ्या रोजच्या “वारांच्या ” गोष्टी. त्या तोंडपाठ असायला त्यांचे निरक्षरपण कधी आडवे आले नाही. प्रत्येक वाराच्या अनेक गोष्टी त्यांना पाठ होत्या. विशेषतः श्रावणातल्या रविवारी भल्या पहाटे ताटात आदित्याची रांगोळी काढून पूजा करणाऱ्या आईला आणि तिला सूर्याची गोष्ट सांगणाऱ्या आज्जींना बघायला आम्हीं अंथरुणातून उठून बसायचो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत त्या रांगोळीचे विसर्जन झालेच पाहिजे या दंडकाची तामिली करण्यासाठी आईची धडपड असायची. त्यादिवशी रात्री उपवास म्हणून सकाळी ती दुधातला “गाकर ” खायची, आणि तो मिळावा म्हणून आमच्यात चढाओढ असायची. प्रत्येक दिवसाला त्याचा स्वतःचा रंग असायचा आणि तोपर्यंत पाडगांवकर कानी पडले नव्हते.
तिसरे आणि अंतिम कारण म्हणजे भाद्रपदात थाटामाटाने घरी होणारे गणपतीचे आगमन ! गावातल्या किसन मोरे आणि तुकाराम मोरे यांचा गणपती कारखाना श्रावणातच कामाला लागायचा. रोज शाळेच्या वाटेवरील हे दोन्ही कारखाने आणि मजल दरमजल करीत होणारी प्रत्येक मूर्तीची कलाकुसर हा रंगांचा एक अभिनव संस्कार आमच्यावर नकळत व्हायचा.
दोघांमध्ये तुकाराम मोरे अधिक सरस मूर्तिकार होते यांवर आमचे एकमत होते. आमचा एक वर्गमित्र तुकाराम मोरेंचा कारखाना असलेल्या इमारतीत राहायचा, हा एकमेव कालावधी त्याचा हेवा वाटण्याचा असायचा. पुढे गल्लीत “बाल गणेश मंडळ” स्थापन केल्यावर तर मोरे बंधू आमचे हक्काचे आश्रयस्थान झाले. असो. त्याबद्दल सविस्तर पुढे कधीतरी ! पण भुसावळाचा त्याकाळातील गणेशोत्सव हा खराखुरा जगण्याचा ” उत्सव “असे आमच्यासाठी.
श्रावण म्हणजे माहेर ! घरी जाऊन सण साजरे केल्याशिवाय माहेरवाशीण कधी तृप्त होत नाही. खऱ्याखुऱ्या झाडांना बांधलेल्या झोपाळ्यांवर झुलल्याशिवाय तिच्यासाठी श्रावणाची सांगता होत नाही.
त्याकाळी श्रावण हा “इव्हेंट “झाला नव्हता.
पाडगावकरांनी हळुवार ओळख करून दिलेला आपला निसर्ग तितक्याच ताकतीने ऋषितुल्य श्रीनिवास खळ्यांनी सहजी आमच्या अंगणात आणून लावला. खळ्यांची असोशी, त्यांचे संगीतप्रयोग हे काही वेगळेच अंगण ! त्यांना ऐकल्यावर, सहजासहजी आजच्या संगीताकडे पावले वळणारच नाहीत. राहता राहिला लताचा आवाज – नेहेमीप्रमाणे दोघांनाही न्याय देणारा, किंबहुना आपल्या अभिजात कोवळिकीने गीताला अभेद्य उंचीवर नेऊन ठेवणारा !
हे गीत किमान एकदातरी ऐकल्याशिवाय आमचा श्रावण साजराच होत नाही.
ऋतूतील कोवळीक आधी शब्दांमध्ये,मग वाद्यांमध्ये आणि सरतेशेवटी स्वरांमध्ये अशी भेटली की मग मन कोणत्याही ऋतूत श्रावण होतं -आतबाहेर हिरवंगार आणि थंड/शांत !
परवा सचिन खेडेकर “माझा कट्टा “मध्ये म्हणाले- ” कलावंत म्हणून माझा कोणत्याही भूमिकेत वाटा फारतर १०-१५ टक्के असतो. आधी लेखकाने ती भूमिका प्रदीर्घ काळ मनात मुरविली असते, त्याचा हिस्सा मोठा ! मग दिग्दर्शक- जो सारे चित्र डोळ्यांपुढे आणतो, स्वतःमध्ये कथानक,पात्रे,संवाद मुरवतो आणि मगच आम्ही कलाकार रिहर्सल करून ते सारं आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवितो.”
डॉ लागू स्वतःच्या आत्मचरित्राचे नांव यासाठीच “लमाण “ठेवतात. – मी तो हमाल भारवाही !
सदर ” श्रावणात घन निळा बरसला ” या गीतात लतानेही (नेहेमीप्रमाणे) लमाण भूमिका पार पाडली आहे
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply