दूरचित्रवाणी वाहिन्यांवर हिंदी जाहिराती या मराठी भाषेत डब केलेल्या, असतात; या “डबिंग्स” ना उठावदारपणा तेव्हाच येतो, ज्यावेळी त्यातील आवाज सुद्धा वैविध्यपूर्ण आणि थेट मनाला साद घालणारा असतो, तोच आवाज जेव्हा बातम्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा माहितीतून, वास्तव डोळ्यासमोर उभं रहातं. अशा आवाजात श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची किमया दडलेली असते. हाच आवाज त्या व्यक्तीची ओळख बनून रहातो, व त्या व्यक्तीला प्रसिद्धीच्या शिखरापर्यंत पोहचवतो. निवेदनाच्या प्रांतातला एक आवाज जो गेल्या अनेक वर्षांपासून टिव्हीच्या माध्यमातून आपल्या कानावर पडतोय तो म्हणजे रत्नाकर तारदाळकरांचा.
महाराष्ट्रातल्या काही उत्कृष्ट निवेदकांपैकी रत्नाकर तारदाळकरांच नाव हे नेहमीच अग्रकक्रमांकावर राहिलं आहे. झी गौरव पुरस्कार, राज्य शासनाचे पुरस्कार, किंवा सासंस्कृतिक कार्यक्रमात सत्कार मूर्ती वा कलाकारांची “ए.व्ही”. दाखवण्यात येते, आणि मग वर्णनात्मक निवेदनाला सुरुवात होते व व्यक्तीचा जीवन प्रवास ही डोळ्यासमोर तरळतो, पण या निवेदना मागे असते अभ्यासु वृत्तीची पराकाष्टा; तारदाळकर या कलेला अगदी लिलया पेलतात तसंच यशस्वी ही करुन दाखवतात.
महाविद्यालयीन जीवनापासूनच नाटकांची आवड, त्यामुळे आपसुकच या क्षेत्राशी संबंध होताच. पण पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यामुळे दिशा मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी कुलाब्यातील एका खासगी कंपनीत पी.आर.ओ. म्हणून नोकरी केली, तसंच दूरदर्शन व आकाशवाणी मुंबई केंद्रात वृत्तनिवेदक या पदावर सुद्धा कार्यरत होते; १९९९ ला अल्फा मराठी सुरु झाली व तेव्हापासून त्या चॅनेलच्या व्हॉईस ओव्हर ची कामं रत्नाकर तारदाळकर अगदी यशस्वीपणे पार पाडत आहेत, ते आजतागायत; अर्थात प्रोमोजच्या मांडणीनुसार प्रेक्षकांपर्यंत त्याचा अर्थ कसा पोहचेल त्याप्रमाणे आवाजाचा चढ-उतार ठेवण्यात येतो. याव्यतिरिक्त दीड हजार पेक्षा अधिक जाहिरातींसाठी डबिंग आणि व्ही.ओ. आर्टीस्ट म्हणून रत्नाकर तारदाळकरांनी काम केलं आहे, यामध्ये डॉक्युमेंट्रीज, शॉर्ट फिल्म्स, तसंच चित्रपटांचाही समावेश होतो.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी आत्तापर्यंत अनेक डॉक्युमेंट्रीची निर्मिती व व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केलेल्या रत्नाकरांनी “डायरी” हा रोचक व माहितीपूर्ण वृत्तांचा कार्यक्रम सादर करुन निवेदनाबरोबरच लेखन व तांत्रिक बाजूही उत्तमरित्या हाताळली. तसंच वारली चित्रकार “जिवा सोम्या म्हसें” आणि “भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळकें” वर आधारित माहिती पटांची निर्मिती केल्यामुळे या कतृत्ववान व्याक्तींचे अप्रकाशित पैलू रसिकांपर्यंत पोहोचले, यासाठी भरपुर वाचन मनन केल्याचं ते सांगायला विसरत नाही.
रत्नाकरांच्या कलापैलूत आणखीन भर टाकणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे लेखन कौशल्याची. आत्तापर्यंत अनेक वृत्तपत्रांमधून वेगवेगळ्या विषयांवर ते लिहित राहिले व कोणत्याही विषयावर निवेदन करण्याआधी तो विषय नीट समजून घेऊन त्यात काही नवीन व “एक्सक्लुझिव्ह” गोष्टी सांगता येतील का? याकडे त्यांचा कटाक्ष राहिला आहे.
त्यांच्याशी बोलत असताना अनेक गुण आपल्यासमोर उलगडत जातात; आणि ते स्वत: यशस्वी निवेदक कलाकार आहेत हे पण कळतं.
माध्यम क्षेत्रात स्वत:च्या आवाजाचा दमदार ठसा उमटवणार्या रत्नाकर तारदाळकरांच्या कारकीर्दीचा आलेख सतत प्रभावी व उंचावत राहिल हे मात्र नक्की.
Leave a Reply