सोलापूरच्या “आशा ” चित्रपटगृहात १९७६ मध्ये “गीत गाता चल ” पाहिला, माझ्या वैद्य नामक मित्राबरोबर आणि त्याच्या कुटुंबीयांबरोबर ! त्याकाळातील सरळसोट जीवनाप्रमाणे राजश्रीची ही कहाणीही सोप्पी होती. कथा,गाणी,नवी जोडी (सचिन -सारिका) इतके आवडले (याचे एक कारण असे की हे नायक -नायिका आमच्या वयोगटाच्या आसपास होते) की सलग दुसऱ्या दिवशी मी एकटाच पुन्हा चित्रपटाला गेलो. (फरक इतकाच की आदल्या दिवशी ऍडव्हान्स बुकिंग असल्याने बाल्कनीत होतो आणि दुसऱ्या दिवशी अचानक गेल्याने, गर्दीमुळे चक्क पिटात बसून (पडद्यासमोरून दुसरी रांग – तिकीट दर फक्त ८५ पैसे) पाहिला.
दरम्यान सचिन अनेक रूपांमधून सतत नजरेसमोर आला – अभिनेता, दिग्दर्शक, गायक, महागुरू, नृत्य वगैरे ! फारसा वकूब नसलेला हा कलावंत मुख्यतः मराठीत तरुन गेला ( “शोले ” तला प्रसिद्ध प्रसंग त्याला आणखी जीवनदान देऊन गेला.) त्यामानाने त्याची सहकलावती “सारिका ” बऱ्यापैकी अदृश्य ! दक्षिणेकडे तिने काही चित्रपटांमध्ये काम केले असेल तर कल्पना नाही पण चित्रपट बाह्य कारणांमुळे ती अधून -मधून चर्चेत आली. खरंतर “गीत गाता” मध्ये सचिनच्या एकसुरी भूमिकेपेक्षा तिची वयात येणाऱ्या मुलीच्या भावभावनांची आंदोलनं आवडली होती. घारे डोळे आणि पडद्यावरील प्रसन्न चुलबुला वावर अधिक भावला होता.
मागील आठवड्यात “क्लब सिक्स्टी ” मध्ये ती संयत , पोळलेल्या डॉक्टरच्या भूमिकेत भेटली. तीच ग्रेस, वयानुसार आलेला पोक्तपणा, वावर तितकाच प्रसन्न ! डिम्पल सारखी ग्रेस तिच्यात आहे. तिच्यात अजूनही अभिनय उरलाय याचा सुखद प्रत्यय आला पण आज सचिनच्या तुलनेत ती कोठे आहे? मात्र तिचा पती – ” द ” कमल हसन ! तो आधीच्या उंचीला आणखी अभिनयाचे मनोरे जोडत गेला – क्वचित हिंदीतही !
सचिनने सुप्रियाशी लग्न केलं. सुप्रिया अभिनय आणि नृत्य विभागात सचिनच्या शंभरेक पावले पुढे ! चक्क आशाबाईंनी सचिनला त्याच्या तोंडावर (आणि प्रेक्षागृहातल्या सुप्रियासमोर) हे सुनावलं होतं आणि सचिनने ते स्वीकारलं होतं.
सचिन -सारिका एकाच धावरेषेला शिट्टी ऐकल्यावर सुरु करतात करियर पण —-
अशीच एक जोडी – अभिषेक आणि करीनाची ! ” Refugee ” मधून वाटचाल सुरु ! मात्र सलग अपयशी चित्रपट दिलेला अभिषेक ( गुरु , युवा आणि सरकार राज हे सन्माननीय अपवाद )तरीही टिकून राहिलाय- मुळात असलेल्या गुणवत्तेमुळे !
करीना त्यामानाने वेगात पुढे जाऊन व्यावसायिकदृष्ट्या अधिक स्थिरावली – गुणवत्ता वगैरे नसल्याने त्या आघाडीवर हस्तगत करण्यासारखे काही नव्हते). पण एका ठिकाणी थांबली.
तिचा पती- सैफ, स्वतःचे करिअर कधीही गांभीर्याने न घेणारा मनमौजी ! त्यामानाने सारिका नशीबवान, सचिनही नशीबवान कारण त्यांना दोन अंगुळे उंच असलेले अभिमानास्पद सहचर तरी मिळाले.
आता या चार जोड्यांमधील आठ कलावंतांपैकी एकच अभिनेत्री राहिली – अभिषेकपत्नी ऐश्वर्या ! तिच्या सौंदर्याने आणि स्वतःमध्ये राहण्याने तिच्याभोवती एक “गूढ ” वलय आहे. अभिनेत्री म्हणून तिने क्वचित चुणूक दाखविलीही पण करिनापेक्षा दोन पावलं जास्त इतकंच ! ती सारिका किंवा सुप्रिया इतकी सरस नक्कीच नाही.
क्षेत्र एकच, स्पर्धा एकच तरीही धावणाऱ्यांना पुढे मागे ठेवणारे हे नियतीचे समांतर वेढे ! या जोड्यांमध्ये काही वेगळी जुळवाजुळव होऊ शकली असती कां ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply