मंडळी सप्रे म नमस्कार !
आज मंगळवार — २६ डिसेंबर २०२३.आजपासून ५ दिवसांनी हे वर्ष संपेल.आपल्या संस्कृतीविषयी जरूर प्रेम असावं पण ते दुसर्या संस्कृतीचा तिरस्कार करण्याएवढं कट्टर नसावं !हे लिहिण्याचा उद्देश एवढाच की , आमचं नवीन वर्ष गुढी पाडव्याला सुरु होतं ! आम्ही नाही आज कुणाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार किंवा कुणाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा घेणार वा स्वीकारणार पण नाही!
अश्या कट्टर मताचेही आमचे कित्येक मित्र—मैत्रिणी आहेत ! मग माझा त्यांना असं विचारावसं वाटतं की , पॅन कार्ड , आधार कार्ड , पासपोर्ट , जन्मतारखेचा दाखला….. सगळीकडे जन्मदिवस इंग्रजी कॅलेंडरनुसारच असतो ना ? की तिथे आपण लिहितो वैशाख शुद्ध चतुर्दशी शके अमुक तमुक ? मग जर ते ( नाइलाजास्तोवर का होईना! ) आपण स्वीकारलंय , तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला वा स्वीकारायला काय हरकत आहे ? बरं , आपल्या नववर्षालाही शुभेच्छा देतोच की आपण ! असो…..
विषय असा की , आणखीन ५ दिवसांनी हे वर्ष संपेल.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सरत्या वर्षात चषकांचे चषक , प्याले भरतील …..सरतील…..
पण पूँछमधे दहशतवाद्यांकडून मारले गेलेल्या आपल्या लष्कराच्या ५ जवानांची आठवण होईल का आपणां भारतीयांना ? आपल्या मुखी घास सुखी पडावा म्हणून रात्रंदिवस एक करणार्या या आणि अशा कित्येक लष्करी जवानांना , पोलिसांना , सुरक्षारक्षकांना , सफाई कामगारांना , सेवाभावी डाॅक्टर्स—नर्सेस—वाॅर्डबाॅईज आणि अश्या कित्येक लोकांची आठवण आपल्याला येईल ?
मी हे नकारार्थी लिहित नाहीये , पण आपल्या सुखासाठी स्वत:चं आयुष्य सेवाभावाने व्यतीत करणार्या कितीतरी लोकांचं ऋण आपण आठवायला नको का ? ज्या घरांनी अशी माणसं गमावली , त्या घरांतील इतर माणसं नवीन वर्षाचं स्वागत आनंदाने करू शकणार नाहीत! एवढी जाणीव तरी आपल्याला असायला हवी , बरोबर ना ?
या वर्षाअखेर वरून आठवलं , मी पार्ला काॅलेजला असताना आमचा एक दोस्त सच्चिदानंद सखाराम पारकर नवीन वर्षाची डायरी मला द्यायचा.दस सीन्स असणार्या व सुविचार असणार्या त्या १९८१—१९८२ या डायर्या अजून आठवतात.मुळात असं आहे , की एखाद्याकडे भरपूर असलं तरी देण्याची वृत्ती असावी लागते ना ! ती ह्या आमच्या दोस्ताकडे कायमंच होती व आजही आहे , मोठ्या मनाचा दिलदार माणूस ! आम्ही काॅलेजला असताना १९८० साली दिक्षित रोडला शिवसागर हाॅटेलमधे पावभाजी हा प्रकार पहिल्यांदा मुंबईत आला.तेंव्हा हा आमचा दिलदार दोस्त आम्हां ३—४ मित्रांना घेऊन गुरुवारी तिकडे घेऊन जायचा व आम्हाला पावभाजी खाऊ घालायचा.तेंव्हा ती ५.२५ ₹ ला मिळायची.पण अश्या २ गुरुवारनंतर मी त्याच्याबरोबर जायचं टाळायला लागलो.तेंव्हा त्याने मला एकदा गाठून याचं कारण विचारलं.मी म्हणालो , अरे राजा , ३ महिन्यांचा गोरेगांव—विलेपार्ले रेल्वेचा पास काढल्यावर व पार्ले—दादर नाॅन कन्सेशनल पास काढल्यावर ( कारण ११ वी—१२ वी मी दादर टी.टी.ला अग्रवाल क्लासेस ला जायचो! ) उरलेले पैसे मी पाॅकेटमनी म्हणून वापरतो.आपल्या कँटीनला मिळणारा २५ पैसे चहा , ५० पैसे सामोसा सुद्धा मला फार वेळा खाता येत नाही ! मग ३—४ वेळा तू पैसे भरल्यावर , मी एकदा तरी बिल भरण्याएवढी माझी ऐपत नसताना मी कां तुझं फुकटचं खावं ? तुझी तशी अपेक्षा नाहीये मला माहित आहे रे , पण फक्त घेणं मनाला पटत नाही रे !
आज डायर्या खूप मिळतात , पण लिहिण्यासारखं काही नाही आणि त्यावेळच्या डायर्यांएवढं अप्रूपही आता राहिलं नाही ! पण वर्षाअखेर म्हटलं की सच्चिदानंदाची डायरी आठवते , शिवसागरची पावभाजी आठवते आणि डोळे भरून येतात ! हा माझा दोस्त आता पुण्याला रहायला गेलाय , पण तो अजूनही तसाच दिलदार व निष्कपट सरळ मनाचा आहे व माझ्या संपर्कात असतो कायम !
तर मंडळी , सांगण्याचा मुद्दा असा की…..
जाणार्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाला आनंदाने सामोरं जाताना , या वर्षांत जे जे धन आपण गमावलं ( माझ्यालेखी धन म्हणजे ही अमूल्य अशी माणसं! ) ते जरूर आठवा , त्यांच्या घरच्यांसाठी दोन हात परमेश्वरापाशी जोडा आणि म्हणा
: Happy New Year !
कळावे ,
तुमचा दोस्त,
उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
मंगळवार—२६ डिसेंबर २०२३ — सकाळी ११.१२ वा.
Leave a Reply