बातमी : विठ्ठल-रखुमाईचें दर्शन आतां २४ तास
संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. ७ जुलै २०१६
• हिंदू देव-देवतांची एक गंमत आहे. माणसांप्रमाणेंच मंदिरातली मूर्ती दुपारीं वामकुक्षी करते, आणि रात्रीं शयन करते. (भक्तांनी दर्शनासाठी वाट पाहिती तरी चालेल !) मग, पहाटे काकड-आरती करून देवाला ज़ागवतात! काय गंमत आहे पहा : दैवत्वाचे गुण माणसाला लागण्याऐवजी, माणसाचे गुणच मंदिरातील देवाला लागले ! !
• देव, भक्त, मंदिर आणि पुजारी या व्यवस्थेवर विदारक टीका करणारी कविता कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे ; शीर्षक आहे ‘गाभारा’ . गाभार्यातील देव भक्ताला भेटण्यासाठी मंदिराबाहेर पडतो ; व म्हणून पुजारी ठरवतात की आतां तो परत आला तरी त्याला आंत घ्यायचें नाहीं, जयपूरहून नवी मूर्ती ऑर्डर करायची ; अखेर, ‘गाभारा सलामत तर मूर्ती पचास’ ! . जिज्ञासूंनी ती कविता मुळातूनच वाचावी.
( कुसुमाग्रजांशी स्वत:ची तुलना मला कदापि अभिप्रेत नाहीं. केवळ या विषयावरील एक अन्य ‘टिप्पणी’ म्हणून, मी माझ्या, ‘देव आतां पावणार नाहीं’ या गझलमधील एक शेर देत आहे –
व्यर्थ आक्रंदूं नका, हा बंद दरवाजा पहा
झोपलाहे देव अजुनी , जागणार नाहीं ! )
• या सगळ्या पार्श्वभूमीवर , ही ताजी बातमी नक्कीच welcome news आहे की, आतां पांडुरंगाचें मंदिर दर आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वेळी,कांहीं दिवस कां होईना, पण, २४ तास उघडें राहील. पंढरपुरला दूरवरून वारी करून येणार्या भक्तांच्या सोयीसाठी असा स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल, प्रांताधिकारी, विठ्ठल-मंदिर समिती आणि बडवे यांचे अभिनंदन करावें तेवढें थोडेंच. कारण, मुख्यत्वें , मंदिर उघडें ठेवण्याची बाब, ही धार्मिक नसून, ती सामाजिक प्रश्नाशी निगडित आहे, ‘ह्यूमेऽन अप्रोच’शी संबंधित आहे.
• हरिजनांना ( दलितांना ) मदिर-प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी पंढरपुरला केलें आमरण उपोषण ही घटना साधारणपणें २०व्या शतकाच्या मध्यावरली. म्हणजे, त्यानंतर फार काळ लोटलेला नाहीं. त्या बॅकग्राउंडवर, आतां मंदिर २४ तास खुलें ठेवण्याचा निर्णय , हा अधिकच उठून दिसतो.
• विठ्ठल हें एक लोकदैवत आहे. ( त्यासंबंधीचें रा. चि. ढेरे यांचें संशोधन पहावें). ज्ञानदेव-नामदेव आणि जातीजातींमधील इतर संतांनी, कृतीतून, विठ्ठलाचें लोकदैवतपण दाखवून दिलें. शतकानुशतकें चालत आलेली वारीही हेंच दाखवते.
• अशा या लोकदैवताला ‘बंधनांत’ न ठेवता, भक्तांना मोकळेपणानें तिन्हीत्रिकाळ त्याला भेटायची संधी प्राप्त झाली, ही फारच आनंदाची बातमी आहे. अभिनंदन, अभिनंदन .
—–
टीप :
सध्या मी ‘पंढरीचा राणा’ याअंतर्गत कांहीं काव्य वेबवर पोस्ट करतो आहे. योगायोग असा की, ‘उघडें मंदिर आहे’ हे काव्य मी अगदी पोस्ट करणारच होतो, तेवढ्यात वरील बातमी वाचली. तें काव्य आतां पोस्ट केलें आहे. या काव्यामागील अध्याहृत पार्श्वभूमी म्हणजे, साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी उघडें व्हावें म्हणून, वर उल्लेखलेलें, उपोषण. (काव्यात तसा उल्लेख नाहीं). पण, हें काव्य, ‘२४ तास मंदिर उघडें राहण्याला’ही लागूं होतें, हा एक मजेदार योगायोग .
आतां, प्रस्तुत बातमीनंतर मी लिहिलेलें, ‘विठ्ठलमंदिर राहिल उघडें’ हें काव्यही मी वेबसाईटवर पोस्ट केलें आहे.
वर उल्लेख केलेली ‘देच आतां पावणार नाहीं’ ही गझलही वेबवर पोस्ट होईलच.
हें सारें आपण माझ्या वेबसाईटवर, तसेंच मराठी सृष्टीच्या वेबसाईटवरही वाचूं शकाल.
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply