दुपारचे सेशन सुरु झाले होते. न्यायमूर्ती श्रीकांत यांचे कोर्ट खचाखच भरले होते. त्याला, तसे कारण हि होते. चार वर्ष्याखाली, झालेल्या एका बलात्काराच्या केसचा आज निकाल होता. आरोपी अत्यंत महत्वाची व्यक्ती होती. आर्थिक बाजू भक्कम असलेली! पॉलिटिकल वरदहस्त लाभलेली. पीडित, त्यामानाने सामान्यच होती. आरोपीच्या शेतातील मजुराची बायको! अनेक अशी प्रकरण, कोर्टापर्यंत पोहचत नाहीत. पण बाईने लावून धरले! त्या टग्याच्या ‘साम, दमा, आणि दंडाला’ बाई पुरून उरली! शेवटी कोर्टात खेचलाच त्याला!
कोर्ट, हॉल मध्ये दाखल झालं तसे, आत्तापर्यंत चालू असलेली कुजबुज एकदम शांत झाली. हॉल मधील सर्व व्यक्ती आदराने उभ्या राहिल्या. कोर्ट, स्थानापन्न झाल्यावर, सगळे जण खाली बसले. एक न्यायनिष्ठुर जज म्हणून, कोर्टात श्रीकांतचा दरारा होता.
श्रीकांतानी, चष्म्याच्या वरच्या कडातुन, एकदा समोरचा जनसमुदाय नजरेखालून घातला. घसा साफ करून, त्यांनी समोरचे एकशवीस पानी निकाल पत्र वाचायला घेतले. दोन अडीच तास त्याचे वाचन, लोक श्वास रोखून ऐकत होते. शेवटी समारोप करताना ते म्हणाले,
“बलात्कार, हा थंड डोक्याने केलेल्या खुनाइतकाच गंभीर गुन्हा आहे. या केस मधील सर्व पुरावे, आणि साक्षी, ज्या, या कोर्टासमोर प्रस्तुत झाल्या. त्या बारकाईने अभ्यासल्या असता, हे कोर्ट खालील निर्णयाप्रत पोहंचले आहे.
आरोपी, संपत, यांनी गुन्हा केल्याचे स्पष्टपणे सिद्ध होऊ शकत नाही! त्यांना संशयाचा फायदा, कायद्याने द्यावा लागत आहे!
म्हणून हे कोर्ट त्यांना, त्यांच्या ‘बलात्काराच्या’ आरोपातून मुक्त करत आहे!
तसेच फिर्यादीस हा निर्णय मान्य नसल्यास, ते अपिलात जाऊ शकतात. त्यासाठी पंचेचाळीस दिवसांची मुदत हे कोर्ट देत आहे!
तसेच, काही कलाटणी देणारे पुरावे हाती आल्यास, केस रिओपन करण्याचा अधिकार, हे कोर्ट राखून ठेवत आहे.”
जनसमुदाय आश्चर्याने स्तिमित झाला होता.
अखंड शांतता!
कारण, हा निकाल जनसामान्यांना अपेक्षितच नव्हता!
श्रीकांतानी आरोपीच्या पिजऱ्यातील संपतकडे नजर टाकली. तो पहिल्या दिवशी दिसला, तितकाच आजही, उग्र आणि मग्रूर हास्य करत होता! आज, त्यात एक प्रकारचा छद्मीपणाची झलक त्यांना स्पष्ट दिसत होती!
फिर्यादीच्या आईने जो, टाहो फोडला होता, तो त्यांना ऐकवेना! ते झटक्यात आपल्या चेम्बरमध्ये निघून गेले.
०००
श्रीकांत आपल्या क्वार्टर मध्ये परतले. त्यांनी अंगावरचा तो कोर्टाचा पोशाख काढून हँगरला लावून टाकला. शॉवर घेऊन पांढरा झब्बा आणि विजार, हा घरगुती ड्रेस घातला, तेव्हा त्यांना कुठे थोडे हलके वाटले. या कायद्याच्या कपड्यांचे ओझे खूप असते. त्यांचा मनात येऊनच गेले.
त्यांनी घड्याळात नजर टाकली. सात वाजत आले होते! मकरंद तास भरात येणार होता.
“शंकरकाका!” त्यांनी घरकामास असलेल्या काकांना हाक मारली.
“जी, मालक!” खांद्यावरच्या लाल फडक्याला हात पुसत काका हजार झाले.
“काका, आज आमचा मित्र, मकरंद भेटीस येणार आहे. आता तो आठला येणार म्हणजे, जेवूनच जाईल. तेव्हा काही तरी स्वीटची तयारी असू द्या! आणि हो, मी आज जेवणार नाही. तुमच्या दोघांपुरतेच करा. आता मात्र, मला एक तुमच्या हातची कॉफी मात्र करून द्या. त्या कपाटात डोके दुखीची गोळी असेल कॉफीसोबत ती पण आणा!”
“जी!” म्हणत शंकर काका किचनकडे वळले.
या साहेबांचा काय चालू असत माहित नाही. दर महिन्यात एखादा दिवस अचानक, रात्रीच जेवायत नाहीत. आज तर यांचा मित्र जेवायला येणार, अन हे, उपास करणार! मोठया लोकांच्या काय भानगडी असतात, एकतर त्यांनाच माहित, नाहीतर त्या पांडुरंगाला माहित. आपण काय? फक्त हुकमाचे ताबेदार! चला गोडाचा भात करावा, लै दिस झालेत खाऊन! पण आधी कॉफी. मग पुढचं. शंकरकाका कामाला लागले.
०००
बरोबर आठच्या ठोक्याला त्यांच्या घराची बेल वाजली. दारात कॉलेजचा मित्र मकरंद उभा होता. आजचा तो एक नावाजलेला क्रिमिनल लॉयर! केवळ कोर्टात उभे रहाण्यासाठी, तो म्हणेल ती रक्कम पायावर ठेवणारे लोक तयार असतात! त्याने आणि श्रीने एकाच कॉलेजात वकिलीच्या परीक्षा दिल्या होत्या!
आज तो दहा वर्षांनी भेटत होता.
श्रीने दोन्ही हात पसरून मक्याला मिठी मारली!
“मक्या, अबे विसरलास कि काय मला?”
“श्री, कसा विसरेन, यार तुला? तुझ्या नोट्सवर तर, मला वकिलीची डिग्री मिळालीय! बर, तू जज साठी परीक्षा दिल्याचं कानावर आलं होत. कुठं कुठं बदलीच्या निमित्याने फिरल्यास? आणि लग्नबिग्न केलंस का नाही?”
“नाही रे. तुला तर माहीतच आहे. देवकीचा बाप नाही म्हणाला. देवकी बापाला टाळू शकली नाही. तिची हिम्मत झाली नाही. माझे मन इतर कोणाशी लग्न करायला तयार होईना. म्हणून अजून तसाच आहे! तुझं काय?”
“माझं? मला लग्नाची गरज कॉलेजातही नव्हती, आणि आजही नाही! आपलं लग्न ‘वकिलीशी’ लावून घेतलंय! पैसा -पैसा आणि पैसाच पैसा!!”
मग बराच वेळ ते दोघे कॉलेजच्या जुन्या आठवणीत गुंतून गेले. शंकरकाकांनी मधेच लिंबाचे शरबत आणि खारे काजू आणून दिले होते. त्यावर ते अधन मधनं हात मारत होते.
“मक्या पण, मस्त झालं तू मुद्दाम भेटीला आलास ते. मला खूप आनंद झाला.”
“श्री, एक विचारू? तू इतका टँलेन्टेड. खरे तर तू या नौकरीच्या जोखडात कशाला स्वतःस कैद करून घेतलंस? तू जर फिल्ड मध्ये असतास, तर खोऱ्याने पैसा ओढला असतास! माझ्या सारखा!”
“मक्या, अरे काही काळ मी हि ‘वकिलीत’ उम्मेदवारी केली आहे. त्यातली ‘व्यवहाराची’ आणि ‘तडजोडीची’ बाजू मला झेपेना! ‘न्याया’साठी लढावे तर आर्थिक नुकसान समोर यायचे. तरीही मी जमेल तस समोरा गेलोच. मग पुढे पुढे एकटा पडू लागलो. ती विरोधी पार्टीची आमिषे, प्रसंगी धमक्या, पैशाच्या जोरावर होणारी ‘हेराफेरी’, मला ते जमेना! मनालाहि पटेना. मग म्हणून मी हि जजची परीक्षा दिली. पण —”
“पण? पण काय?”
“पण काही नाही! या नौकरीतली ‘व्यथा’ वेगळीच आहे. कायदा खूप नाजूक आणि तितकाच तीक्ष्ण असतो. हे तुलाही माहित आहे. येथे मी ‘न्यायधीश’ आहे. पण मी देतो, तो ‘न्यायचं’ असतो का? असा माझी मलाच, खूप वेळेस प्रश्न पडतो. वकील, जे माझ्या समोर मांडता, त्या कुंपणात राहूनच, मला न्यायदानाच कार्य करावं लागत! खूप वेळेस आरोपी गुन्हेगार असल्याचं जाणवत, तपास यंत्रणेनेकडून सुटलेले दुवे दिसतात, पण आरोपीस ‘बा इज्जत बरी!’ करावं लागत! माझ्या मनाची घुसमट, येथेही तशीच राहिली आहे!” विषाण मनानं श्री बोलत होता.
“जस आजच्या ‘संपत’ केस मध्ये झाले!” मकरंद हळूच म्हणाला.
“तुला काय माहित ‘संपत’ केस? तिचा वकील तर, तू नव्हतास!”
” मी नसलो तरी, मीच, ते प्रकरण हाताळतोय. म्हणजे माझी फर्म! श्री, एक मित्र म्हणून तुला सल्ला देतो! इतकं इमोशल असून, या जगात, जगता येत नाही! प्रॅक्टिकल हो! दे सोडून हि चार टिकल्याची नौकरी. माझी फर्म जॉईन कर! ओपन ऑफर! प्रॉफिट शेयरिंग, तू म्हणशील तस!”
“बेईमानीच्या पैशात बरबटलेली तुझी ऑफर मला नको! आज मला, एक समाधान या नौकरीत आहे. किमान, मी अन्यायात प्रत्यक्ष तरी, सामील नसतो. माझ्या आगतिकतेमुळे, मला नेहमीच सत्याच्या बाजूने उभे रहात येत नाही! आणि त्याचे प्रायश्चित म्हणून मी, अश्या निकाला दिवशी उपवास करतो! तू हि सत्यासाठी लढावसं! ‘संपत’ सारख्या केसेस, हाती नको घेऊस! तुझ कायदेशी ज्ञानाचा फायदा ‘न्याया’ साठी होऊ दे! हि माझी ऑफर पटली तर पहा!”
श्रीकांत मकरंदच्या डोळ्यात पहात म्हणाले.
“जी, मालक, जेवण घेऊ का वाढायला. साडे नऊ झालेत म्हनून इचारतो.” इतका वेळ दारा आडून ऐकणाऱ्या शंकर काकांनी, नरम आवाजात विचारले.
दोन्ही मित्र एकदम सावरून बसले.
“मकरंद चल जेवण करूनच जा. शंकरकाकांनी तुझ्यासाठी स्पेशल स्वीट बनवलं असेल!”
“थँक्स, शंकरकाका! पण, आज मला माफ करा! पुन्हा केव्हातरी मुद्दाम येईन!”
मकरंद निघून गेला!
आपण इतकं स्पष्ट बोलायला नको होत का?
हा प्रश्न श्रीकांताना बराच वेळ छळत राहिला.
०००
त्या रात्री तीन जण उपाशी झोपले! आपले साहेब, का ‘उपास’ करतात हे कळल्यावर, शंकरकाकांच्या घश्या खाली गोडाचा घास उतरेना!
आणि मकरंद! त्याने श्रीकांतची ऑफर मनोमन स्वीकारली होती!!
(मी, या कथेचा लेखक, पेशाने वकील नाही. माझ्या अज्ञानाने काही वावगे लिहण्यात असेल तर, क्षमा असावी. वकिलांचा किंवा न्याय संस्थेचा उपमर्द करण्याचा हेतू मुळीच नाही. हे लिखाण काल्पनिक आहे.)
— सु र कुलकर्णी.
तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
Leave a Reply