ब्रिटीश सरकारने एक रूपयाची नोट चलनात आणल्याला आज एकशे चार वर्षे पूर्ण झाली. या शंभर हून अधिक वर्षांत एक रूपयाच्या नोटेने पाचव्या जॉर्जच्या छायाचित्रापासून महात्मा गांधी, अशोक स्तंभापर्यंतचा प्रवास केला आहे. या प्रवासात नोटेने अनेक रंग, आकार बदलेले असले तरी या नोटा सर्वसामान्यांच्या स्मरणात कायमच राहिल्या आहेत.
भारतावर इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी देशात प्रथम १८६१ मध्ये नोटा छापण्यास सुरुवात केली. पण ब्रिटीश सरकारने सर्वात प्रथम एक रूपयाची नोट ३० नोव्हेंबर १९१७ मध्ये चलनात आणली. ही नोट इंग्लंडमध्ये छापण्यात आली होती. या नोटेवर पाचव्या जॉर्जचे छायाचित्र होते. या नोटेची पांढऱ्या हातकागदावर छपाई केली होती. एक रूपयाची नोट चेकबुकप्रमाणे पंचवीस नोटांच्या संख्येत मिळत होती. तेवीस वर्षांनी म्हणजे २४ जुलै १९४० मध्ये छापलेल्या एक रूपयाच्या नोटेवर पाचव्या जॉर्जचे तर २४ जुलै १९४४ मध्ये काढलेल्या नोटेवर सहाव्या जॉर्जचे छायाचित्र होते.
स्वतंत्र भारतातील पहिली एक रूपयाची नोट १२ ऑगस्ट १९४९ मध्ये चलनात आली. यावर अर्थ सचिव के. आर. के. मेनन यांची सही होती. त्यानंतर १९५० व १९५३ मध्ये व्हॉयलेट रंगात छापलेल्या एक रुपयाच्या नोटेवर के. जी. आंबेगावकर यांची सही होती.
महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २ ऑक्टोंबर १९६९ रोजी छापलेल्या एक रूपयाच्या नोटेवर महात्मा गांधीचे छायाचित्र होते तर अर्थसचिव डॉ.आय.जी. पटेल यांची सही होती. भारतीय राज्यघटनेची अमंलबजावणी झाल्यानंतर एक रुपया नोटेची नियमित छपाई होत गेली. या नोटांवर अनुक्रमे अर्थसचिव के. आर. के. मेनन, के. जी. आंबेगावकर, एच. एम. पटेल, ए. के. रॉय, एल. के. झा, एस. भूतीलिंगम, एस.जगन्नाथन, डॉ.आय. जी. पटेल, एम. जी. कौल, डॉ. मनमोहन सिंग, आर. एन. मल्होत्रा, एम. नृसिंह, प्रताप किसन कौल, एस. वेंकटरमन, गोपी किसन अरोरा, विमल जलान, एस. पी. शुक्ल, माँटेकसिंग अहलुवालिया यांच्या सह्या आहेत. या एक रुपयांच्या नोटेवरून प्रेरणा घेऊन पोर्तुगीज आणि फ्रान्सने १९१९, १९२४ आणि १९२९ मध्ये अशीच नोट बाजारात आणली होती. १९८५ मध्ये एस. वेंकटरमन यांची सही असलेली एक रुपयांची नोट आणली होती. २१ जानेवारी २०१७ ला झालेल्या लिलावात ही नोट चक्क २,७५,००० रुपयांना विकण्यात आली होती. आतापर्यंत १२५ हून अधिक वेळा एक रुपयांची नवी नोट बाजारात आली आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply