पुण्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक जिन्नसचे काही ना काही वैशिष्ट्य असावेच लागते.
खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात पण…
“आमचे येथे रसाळ खजूर मिळतील” हे फक्त पुण्यात !
एरवी जर्दाळू सगळीकडे, पण
“पौष्टिक जर्दाळू” फक्त पुण्यात मिळतात !
केशरात “असली” केशर फक्त पुण्यात.
सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या भारतात असली तरी
“वेलचीयुक्त चहा” ही पाटी फक्त पुण्यात दिसते.
परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली-
‘गणपती कारखाना’ पण तेच पुण्यात बघितले तर
“आमचे येथे पेणच्या सर्वांगसुंदर गणेश मुर्ती मिळतील”!
एकदा अप्पा बळवंत चौकात चालत असतांना
“चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट प्रतिच्या दासबोधावर पाच टक्के घसघशीत सूट” अशी पाटी वाचल्यावर उत्सुकतेनं दुकानात शिरलो.
उत्सुकता ही की उत्कृष्ट प्रतीचा वेगळा काही दासबोध समर्थांनी खास या दुकानाच्या प्रमोशनसाठी लिहीलाय की काय? चौकशीअंती कळलं की उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे कापडी बांधणीतला दासबोध ! समर्थ रामदासांच्या नशीबानं मजकूरात काही बदल नाही.
एका बिल्डरनं “अप्पा बळवंतच्या ‘निसर्गरम्य’ परिसरात स्वस्तात फ्लॅट मिळवा” अशी जाहिरात अगदी कालपरवा केली होती म्हणे!
मला असा विश्वास वाटू लागलाय की जगातील आद्य ऍड गुरू हा पुण्याच्या बोहरी आळी ते नागनाथ पार किंवा हिराबाग ते ओंकारेश्वर
याच पट्ट्यात कुठेतरी जन्मला असणार !
शनिपाराजवळच्या एका दुकानासमोरच्या पाटीवरचा मजकूर वाचून मी कोलमडायच्याच बेतात होतो. ती पाटी म्हणजे
“येथे टिकाऊ आणि दर्जेदार जानवीजोड मिळतील !!!”
पुण्यात याची देही याची डोळा पाहिलेल्या दोन अविस्मरणीय पाट्या!
येथे खास मालवणी पद्धतीने बनवलेले ओरिजनल चायनीज मिळेल.
पुढील अजून कहर…
येथे सेकंडहॅंड कवळ्या स्वस्तात मिळतील !!!
येथे गेलेल्या फटाक्यांना वाती लावून मिळतील.
ह्या सगळ्या पुणेरी विनोदाबरोबर मी स्वत: १ पाटी वाचली होती. आम्ही एका पुलाजवळ थांबलो होताे तिथे दुकानात “येथे वैकुंठालंकार मिळतील” असे लिहिले होते. मी उत्सुकतेने पाहिले की काय असेल तिथे तर काय सांगू? अंत्यविधीला लागणाऱ्या सामानाचे ते दुकान होते.
— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
Leave a Reply