साप्पोरो पासून ओतारू अवघ्या ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. होन्शू (मेन लॅन्ड) वरून ओतारूला थेट पोहोचता येईल अशा फेरी बोट सुद्धा आहेत असं ऐकलंय. बस, रेल्वे आहेतच पण त्याच बरोबर एक मार्ग म्हणजे ‘रेंटल कार’. ह्या रेंटल कार फक्त ओतारूच नाही तर, संपूर्ण होक्काइदो मध्ये फिरण्याकरता सुद्धा वापरता येतात. त्यासाठी साधीशी आणि बंधनकारक अट, ‘चालक परवाना’ (लायसेन्स) असायला हवे. तर नुसतंच वाहनचालक असून भागत नाही. बऱ्याच अटींची पूर्तता केल्यास आपण कारने होक्काइदो ची सफर करू शकतो. त्याविषयीची विस्तारित माहिती गूगल सेन्सेई देतील. (सेन्सेई म्हणजे शिक्षक)
जपान मध्ये अगदी सर्रास या ‘सेन्सेई’ शब्दाचा वापर होतो. अगदी डॉक्टरांना सुद्धा म्हणतात सेन्सेई. “कोणीही उठतो आणि शिकवायला लागतो” ह्या तत्कथित उक्ती प्रमाणे, कोणी वागलेलं मी तरी अजून पाहिले नाही. “शिकवणे” नाही तर “शिकणे “महत्वाचे मानत असावेत हे जपानी.
तर साप्पोरो स्टेशन वरून “हाकोदाते लाईन” आपल्याला साधारण पाऊण तासात ओतारूला घेऊन जाते. जपानमध्ये साधारणपणे शंभर तरी निरनिराळ्या रेल्वे लाईन पाहायला मिळतात. हे लाईन प्रकरण थोडक्यात सांगायचं तर, प्रत्येक ठिकाणच्या विशिष्ट भागांना जोडणाऱ्या मार्गांवर, प्रवासी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या अनेक रेल्वे कंपन्या आहेत. आणि त्यांच्या किंवा महत्त्वाच्या ठिकाणांच्या नावांवरून ती विशिष्ट लाईन ओळखली जाते. जपान मध्ये रेल्वेचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जगातील 50 सर्वाधिक व्यस्त स्थानकांपैकी 46 जपानमध्ये आहेत म्हणजे बघा! मोठ्या प्रमाणात वापर असल्याने रेल्वेचा विस्तार सरकारमार्फत करण्यात आला, ज्यामध्ये बऱ्याच खाजगी कंपन्यांचा सुद्धा हातभार लागलेला आहे.
ओतारूसाठी निघाल्यानंतर वाटेमध्ये लागणाऱ्या बऱ्याच स्टेशन्स वरती, प्रवाशांची येजा दिसून येत होती. गाडी जशीजशी पुढे पळत होती तशीतशी आजूबाजूची दृश्य मागे पडत होती. अगदी क्वचित एखाद्दुसरीच उंच इमारत, बाकी सगळीकडे सुंदर जपानी कौलारू घरांची रांग पाहायला मिळत होती आणि अचानक, गाडीच्या उजव्याबाजूने समुद्र किनारा दिसायला लागला.
अक्षरशः “किनाऱ्यावरील चकाकणाऱ्या रेतीवरूनच रेल्वे पळत आहे,” असा भास व्हावा इतका जवळ समुद्र दिसत होता. पूर्ण प्रवासात २०मिनिटे तरी नक्कीच ह्या समुद्राचं आणि समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या, खडकांवर आदळणाऱ्या लाटांचं दर्शन आपल्याला घडत राहतं. अवर्णनीय!
लहानपणी जस कुतूहल असतं नवीन काही पाहिल्यानंतर तसंच काहीसं वाटत होतं मला अनपेक्षित समुद्र बघून. ह्या फुलराणीने (मी फुलराणी म्हणते आपलं या ट्रेनला) मज्जा आणली एकदमचं! रेल्वे या वाहनाची पहिली ओळख मला करून दिली ते म्हणजे पुण्याच्या पेशवे बागेत असणाऱ्या फुलराणीने. बागेतल्या फुलराणीत बसल्यावर सभोवतालची बाग हेच जग आहे असं वाटायचं त्यावेळी. पण ही फुलराणी मात्र विशाल समुद्र आणि समोर दिसणारं क्षितिज दाखवून म्हणतं होती, पल्याडचे जग खूप विशाल आहे. एक्सप्लोर!
ओतारू हे ऐनू वस्तीचे शहर, “ओतारू” हे नाव सुद्धा मूळचे ऐनू भाषेतुन घेण्यात आले आहे. ऐनु म्हणजे उत्तर जपानमधील एक जमात आहे. ह्या ऐनु जमातीचे लोकं साधारणपणे सध्या फक्त होक्काइदो मध्ये आढळून येतात. सांस्कृतिक पार्श्वभूमी सुद्धा बहुतेक करून उर्वरित जपानमधल्या लोकांपेक्षा वेगळी आहे. भाषा आणि संस्कृती मध्ये वेगळेपण आहे. ऐनु संस्कृती विषयक पुरावे आणि विस्तारित माहिती देणारी अनेक ठिकाणे होक्काइदो मध्ये आहेत.
ओतारूला पोहोचले तेंव्हां जरा भुरभुर पाऊस होता आणि खूप थंडी पडली होती. त्यामुळेच अचानक वातावरण थोडंसं कंटाळवाणं होऊन गेलं होत. मस्त छान एक डुलकी काढावी असा काहीसा विचारसुद्धा तरळून गेल्याचं मला स्पष्ट आठवतंय. तो विचारबाजूला सारत मी स्टेशन बाहेर पडले. समोरच कॉफी हाऊस दिसलं. गरमागरम कॉफी आणि डोनट असा ब्रेकफास्ट झाल्यामुळे कंटाळा कुठच्याकुठे पळाला. आणि तोवर बाहेर पाऊस जाऊन, छान ऊन पडलेलं.
या शहरात मी एकच ठिकाण पाहिलं “ओतारू कॅनाल”. हा कॅनाल कित्त्येक वर्षांपूर्वी व्यस्त बंदराचा मध्य भाग होता. जहाजांनी भरून आणलेला माल उतरवून घेतल्यानंतर, या कालव्याद्वारे काठावर असलेल्या गोदामांमध्ये पोहोचवला जात असे. कालांतराने वापर थांबल्यानंतर, पुनर्बांधणी करून ह्या कालव्याचे जतन प्रेक्षणीय स्थळ म्हणून करण्यात आले.
स्वच्छ पाण्यात निळ्या आकाशाचे सुंदर प्रतिंबीब, एका कडेने बांधलेली पायवाट, त्याला साजेसे व्हिक्टोरियन शैलीचे उंच दिवे, तर दुसऱ्या बाजुला घरांसारखी दिसणारी, कालव्याच्या पाण्यात स्वतःच रूप पाहत उभी त्याकाळची कोठारे (वेअरहाऊस). हा ओतारू कॅनाल खरंच कमाल दिसतो.या कालव्यात बोटिंग करता येते. कालव्याच्या बाजूला असलेल्या पायवाटेवरून फेरफटका मारणे म्हणजे सुख! बरेच विदेशी पर्यटक व त्याबरोबरच जपानी लोकं इथे फोटो काढण्यात मग्न होते.
हिवाळ्याच्या दिवसांत “ओतारू युकी आकारी नो मीची “(Otaru snow light path) फेस्टिवल साजरा केला जातो. रस्त्यावर पडलेलं बर्फ, चमचमणारे उंच दिवे आणि कालव्यात सोडलेल्या मिणमिणत्या दिव्यांची सजावट फार अप्रतिम दिसते. मी ह्या ठिकाणी गेले होते त्यावेळी हिवाळा नसल्याने तो फेस्टिवल पाहता आला नाही. पण जवळपासच्या खरेदीविक्री करणाऱ्या दुकानातील फोटोंमध्ये संग्रहित केलेले क्षणं त्याचे वर्णन करीत असलेले मी पाहिले.
फिरताना ऊन-पावसाचा खेळ मात्र सतत चालू होता. कॅनाल पाहून झाल्यावरमी परतीची वाट धरली. वाटेत जुन्या काळच्या खुणा बऱ्याच दिसून येत होत्या.पुर्वीच्या काळी वापरात असणारे रेल्वेचे रुळ (Temiya old railway line) वगैरे पाहत ओतारू स्टेशनला येऊन पोहोचले.
ओतारू वरून परत येताना पुन्हा एकदा, तो समुद्र पाहून शाळेत शिकलेली (अजूनही तोंडपाठ असलेली) कुसुमाग्रजांची ‘किनारा’ कविता आठवली.
“घननीळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरींमधील गाणी”
आणि लाटांवर तरंगत ओतारू मागे टाकून गाडी साप्पोरोला येऊन कधी थांबली हे कळलंच नाही!
— प्रणाली मराठे
(पुढील भागात बीएई …)
Leave a Reply