अणुभट्टीत निर्माण होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांचे बहुविध उपयोग आहेत. यात काही वेळा किरणोत्सारी पदार्थांचा प्रत्यक्ष वापर होतो, तर काही वेळा किरणोत्सर्गी पदार्थांपासून उत्सर्जित होणाऱ्या किरणांचाच फक्त वापर केला जातो.
वैद्यकीय क्षेत्रात किरणोत्साराचा वापर निदान व उपचार या दोन्हींसाठी केला जातो. अल्पजीवी किरणोत्सारी पदार्थ शरीरात पाठवून त्याचा उपकरणांच्या साहाय्याने शरीराबाहेरून वेध घेतला जातो व त्यावरून शरीरातील व्याधीचं निदान केलं जातं.
कर्करोगात किरणोत्सारी पदार्थांकडून येणाऱ्या प्रारणांच्या माऱ्याद्वारे अनावश्यक वाढ झालेल्या पेशींचा नाश केला जातो.
वैद्यकीय उपयोगाच्या वस्तूंचं निर्जंतुकीकरण करण्यासाठीही अशी प्रारणं वापरली जातात. किरणोत्सार हा सजीव पेशींत जनुकीय बदल घडवून आणतो. अशा जनुकीय बदलाद्वारे शेतीमालाचा दर्जा उंचावता येतो, नवी वाणं तसंच कीडरोधक बियाणीही निर्माण केली जातात. किरणोत्साराच्या माऱ्याद्वारे फळं, कांदे-बटाटे, धान्य यांसारख्या मालांचं आयुष्यही वाढविता येतं. मोठ्या स्तरावरील कीडनियंत्रणासाठीही किरणोत्साराचा वापर उपयुक्त ठरला आहे.
औद्योगिक क्षेत्रातही किरणोत्साराचे अनेक उपयोग आहेत. किरणोत्सारी पदार्थांकडील प्रारणांच्या मदतीने घेतलेल्या एखाद्या वस्तूच्या छायाचित्राद्वारे, त्या वस्तूच्या ओतकामात वा जोडणीत दोष राहिला असल्यास तो कळू शकतो. पत्रे तयार करताना त्यांची जाडी योग्य आहे की नाही, हे त्या पत्र्याने शोषलेल्या प्रारणांच्या प्रमाणावरून कळू शकतं. किरणोत्सारी पदार्थांकडून येणाऱ्या प्रारणांच्या वापराद्वारे, एखाद्या बंदिस्त टाकीतील द्रवाची पातळी किती आहे, हे बाहेरून केलेल्या निरीक्षणांद्वारे कळू शकतं.
तेलासारखे द्रवपदार्थ वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतील गळतीसारखे दोष, या वाहिन्यांतून अल्पजीवी किरणोत्सारी पदार्थ पाठवून व त्यांचा माग काढून, शोधून काढता येतात. किरणोत्सारी पदार्थांच्या वापराद्वारे नदीच्या पाण्यातील गाळ कोणत्या दिशेने व कसा साचतो आहे हे कळतं. आगीची सूचना देणाऱ्या काही संवेदनशील उपकरणांत अत्यल्प प्रमाणात अमेरीशियमसारख्या किरणोत्सारी मूलद्रव्यांचा वापर केला जातो. अतिदूरवर पाठविल्या जाणाऱ्या अंतराळयानातील ऊर्जापुरवठा हा विशिष्ट प्रकारच्या प्लुटोनियमच्या किरणोत्साराद्वारे केला जातो.
Leave a Reply