व्यास क्रिएशनच्या आरोग्यम दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांचा लेख
‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे त्याच्या पूजेत मग्न असणारे. तेजाच्या म्हणजे अग्नीच्या पूजेत रत असलेल्या लोकांचा समूह म्हणजे भारत. ही व्याख्याच सांगते की आपण समस्त भारतीय मूलतः तेजाचे पुजारी आहोत. ऋग्वेदाच्या पहिल्या सूक्तातील पहिली ऋचा अग्नीच्या पूजनाचीच आहे:
ओऽम् अग्निम्। ईळे । पुरःऽहितम् । यज्ञस्य | देवम् ।
ऋत्विजम् । होतारम् । रत्नऽधातमम् ।। १.१.१
अग्नी रूपातील ईश्वराचं यात पूजन केलं आहे. वेदांचा उपवेद असलेल्या आयुर्वेदात देखील अग्नीला तितकंच महत्त्व आहे. मानवी शरीरातील अग्नी ही आयुर्वेदाची एक स्वतंत्र संकल्पना असून अन्य कोणत्याही वैद्यकात ती आढळत नाही.
आयुर्वेदाच्या मते- पुरुषोऽयं लोकसम्मितः । म्हणजे मनुष्याचं शरीर ही सृष्टीची एक छोटी प्रतिकृती आहे. साहजिकच बाह्य सृष्टीत जे जे घटक जी जी कामं करत असतात, ते ते घटक शरीरात देखील तीच कामं करत असतात.
उदा. बाह्य जगात कोणत्याही वस्तूला गती देण्याचं काम वारा करतो, त्याप्रमाणे शरीराच्या आणि शरीरातील सगळ्या हालचाली शरीरातील वायू (वात दोष) करतो. बाह्य सृष्टीत एका वस्तूचं दुसऱ्या वस्तूत रूपांतर किंवा परिवर्तन (जशी कणकेची पोळी, तांदळाचा भात, डाळीचं वरण इत्यादी) करण्याचं कार्य अग्नी करतो. आपल्या शरीरात देखील आपण घेत असलेल्या अन्न, हवा, पाणी यांचं रक्त, मांस, हाडं, मेद आदि शरीरघटकांमध्ये रूपांतर करणारा जो भाव असतो तोच अग्नी होय. म्हणजेच शरीराचे घटक बनवण्यात अग्नीचा वाटा सिंहाचा आहे.
रक्त, मांस, अस्थी, मेद इत्यादी आपल्या या शरीर घटकांवरच आपलं आरोग्य अवलंबून असतं. सर्व शरीरघटक जर उत्तम असतील तर आपलं शरीर बलवान होतं. अर्थातच असे बलवान घटक, बाहेरून शरीरात आलेल्या कुठल्याही शत्रूशी किंवा बाह्य विपरीत परिस्थितीशी लढायला सक्षम असतात. थोडक्यात बलवान शरीराचं व्याधिक्षमत्व चांगलं असतं.
शरीरघटक योग्य प्रमाणात आणि योग्य गुणांचे बनायला हवे असतील तर जसा उत्तम प्रकारचा आहार आवश्यक आहे, तसाच त्या आहाराचं शरीरघटकांमध्ये रूपांतर करणारा अग्नी देखील उत्तम असणं आवश्यक आहे. किंबहुना खाल्लेल्या कोंड्याचा मांडा करून घ्यायची क्षमता या अग्नीमध्येच आहे.
आयुर्वेदामध्ये या अग्नीला फार महत्त्व दिलं आहे. आजारांचे उपचार म्हणजे आयुर्वेदाच्या भाषेत त्याची व्याख्या सांगताना शास्त्रकार म्हणतात, ‘कायो नाम अंतराग्नी तस्य चिकित्सा कायचिकित्सा ।’ काय म्हणजे अंतराग्नी आणि त्याची चिकित्सा म्हणजेच कायचिकित्सा. म्हणूनच कोणत्याही रोगावर केले जाणारे उपचार हे प्राधान्यानं अग्नीवरच केले जातात.
आता हा अग्नी कुठे असतो? कसा दिसतो (लाल/ पिवळा की निळा)? ओळखायचा कसा? तो उत्तम कसा ठेवायचा? असे प्रश्न सामान्य व्यक्तीला पडल्याशिवाय राहणार नाहीत.
तर बाह्य जगातला अग्नी जसा ज्योतिरूपाने आपल्या डोळ्यांना दिसतो, तसा हा पोटातला अग्नी आपल्याला शरीरात ज्योतीच्या स्वरूपात डोळ्यांना दिसत नाही. त्याचं अस्तित्व त्याच्या उष्णतेमुळे आणि तो करत असलेल्या रूपांतराच्या कामामुळे जाणवतं. तो शरीरभर व्यापून असला तरी त्याचं मुख्य स्थान आहे आपलं पोट. आपल्याला रोज ठराविक वेळेला चांगली भूक लागत असेल आणि भुकेला साजेसा आहार घेतल्यावर तो ३ ते ५ तासात नीट पचत असेल तर आपला अग्नी उत्तम काम करतोय असं समजावं. अचानक भूक
व्याधिक्षमत्व
कमी झाली, अन्नपचन नीट होईनासं झालं, मलप्रवृत्ती बिघडली तर हा अग्नी बिघडला आहे असं समजावं. अग्नी बिघडणं ही आजारी पडण्याची पहिली पायरी असते. ‘रोगा: सर्वेऽपि मंदेग्नौ’ म्हणजे प्रायः सगळे रोग हे अग्नी बिघडल्यानेच होतात असं आयुर्वेदात स्पष्ट सांगितलं आहे.
प्रत्येक मनुष्यात या अग्नीचा स्वभाव वेगवेगळा असतो. काही लोकांचा अग्नी तीक्ष्ण असतो. त्यांना फार भूक लागते. एकदा भूक लागली की ती सहन होत नाही आणि खाल्लेलं अन्न लवकर पचतं. काही जणांचा अग्नी मंद असतो. म्हणजे त्यांना भूक कमी लागते, ती सहन होते आणि एकदा आहार घेतला की तो पचवायला वेळ लागतो. काही जणांचा अग्नी विषम म्हणजे अनियमित असतो. या लोकांचा काहीच भरवसा नसतो. कधी यांना कडकडून भूक लागते, कधी लागत नाही, कधी अन्न लवकर पचतं तर कधी उशिरा. थोडक्यात काय तर प्रत्येकाचा अग्नी वेगळा असतो. म्हणून प्रत्येकाची भूक, खाण्याची क्षमता आणि पचनशक्ती देखील भिन्न असते. (मग आता सांगा, रोज प्रत्येकाने अमुक इतकी ग्राम प्रोटीन्स खायला हवीत, इतके ग्राम धान्य खायला हवं, इतके लीटर पाणी प्यायला हवं…. असे सरसकट नियम बनू शकतात का? ) म्हणूनच एकाच वयाची सगळी मुलं सारख्या प्रमाणात जेवतात असं नाही. (आता तरी समस्त काळजीवाहू मातांनी इतर मुलांच्या आहाराशी आपल्या मुलाच्या आहाराची तुलना करून चिंतित होणं ताबडतोब थांबवायला हरकत नाही.)
अशा या अग्नीचं महत्त्व सांगताना आचार्य काय म्हणतात बघा…
आयुर्वर्णो बलं स्वास्थ्यमुत्साहोपचयौ प्रभा ।
ओजस्तेजोऽग्नयः प्राणाश्चोक्ता देहाग्निहेतुका: ।।
शांतोऽग्नौ म्रियते युक्ते चिरंजीवति अनामयः ।
व्याधि: स्याद्विकृते, मूलमग्निस्तस्मान्निरुच्यते ||
यदन्नं देहधात्वोजोबलवर्णादिपोषकम् ।
तत्रग्निर्हेतुराहारान्न ही अपक्वाद् रसादयः ।।
मनुष्याचं आयुष्य, बल, स्वास्थ्य, उत्साह, शरीराची वाढ, प्रभा, ओज, तेज, अन्य अग्नि, आणि प्राण यांचं अस्तित्व पोटातील अग्नीवर असतं. हा पोटातील अग्नी शांत झाला तर मनुष्याला मृत्यू येतो. तो जर योग्य पद्धतीनं काम करत असेल तर मनुष्य दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगतो. तो जर बिघडला तर मनुष्य आजारी पडतो. म्हणूनच या अग्नीला जीवनाचं मुख्य कारण मानलं आहे. आपण घेतलेला आहार शरीराच्या बल, वर्ण, धातू यांची पुष्टी करत असेल तर त्यामागे योग्य अग्नी हेच कारण आहे. आहार कितीही उत्तम असला तरी तो अग्नीकडून अपाचित राहिला तर शरीराचं पोषण करू शकत नाही.
आपल्याला वारंवार आजार होतात याचाच अर्थ आपला अग्नी वारंवार बिघडतो.
अग्नी का बिघडतो?
- भूक नसताना खाल्ल्यानं- पौष्टिक आहाराची गरज ही संकल्पना आपल्यावर इतकी लादली आहे की आजकाल ९५% पेक्षा जास्त लोक भूक नसली तरी अशक्तपणा येईल म्हणून काही ना काही खात राहतात. अशा वेळी भूक नसल्यानं खाण्यासाठी चविष्ट पदार्थच निवडले जातात. ते बहुतांश जंक फूड कडे झुकणारे असतात. त्यामुळे ते जास्तच घातक ठरतात.
- भुकेच्या वेळी न खाल्ल्यानं – नोकरी करणाऱ्या लोकांची ही सार्वत्रिक समस्या आहे.
- भुकेपेक्षा कमी किंवा जास्त खाल्ल्यानं- रोज किती ग्राम अन्नघटक पोटात जायला हवेत याचा पुस्तकी अभ्यास करून जेवणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या आढळते. कारण ते भुकेप्रमाणे जेवत नाहीत.
- पचायला जड पदार्थ खाल्ल्यानं- जसे मांसाहार, पनीर, फ्रीजमधील गार पदार्थ, शिळे पदार्थ इत्यादी.
- सतत बदलते डाएट प्लान्स अंगीकारल्यानं – कधी दिवसातून दोन वेळा तर कधी दर दोन तासांनी असे सतत बदल करत राहिलं तर आपल्याला नक्की कधी काम करायचं आहे ते त्या अग्नीला कसं कळणार?
- आहारातून तेलातुपाला हद्दपार केल्यानं- कुठलाही अग्नी प्रज्वलित राहण्यासाठी स्नेहच आवश्यक असतो. (आपल्या दिव्यात तेल/ तूपच तर लागतं.)
- रात्री जागल्यानं – जागरणानं शरीरातील स्नेह कमी होऊन रुक्षता वाढते.
- दिवसा झोपल्यानं
- खूप पाणी प्यायल्यानं- कुठलाही अग्नी जास्त पाण्यानं विझतो.
- मनःस्थिती प्रसन्न नसल्यानं – टीव्हीसमोर बसून जेवताना मानसिक स्थिती टीव्हीवरील कार्यक्रमानुसार बदलत असते. तेव्हा यात धोका जास्त असतो. जेवताना भांडण, कटकट होत असेल तरी ती अग्नीला बिघडवते. एरवी देखील मनुष्याची मनः स्थिती बिघडली की सर्वात आधी त्याच्या भुकेवर परिणाम होतो हे आपण अनुभवत असतो.
- केमिकल औषधांच्या सतत सेवनानं – कृत्रिम औषधं ही यकृतावर दुष्परिणाम करणारी असल्यानं यामुळे भुकेचं मातेरं होतं.
- व्यसन – बहुतेक व्यसनं ही यकृतावर परिणाम करणारी असल्यानं भूक आणि पचनशक्ती कमी करतात.
तस्मात्तं विधिभिर्युक्तैरन्नपानेन्धनैर्हितैः ।
पालयेत् प्रयतस्तस्य स्थितौ ही आयुर्बलस्थितिः ।।
या सर्वाचा मथितार्थ असा की हितकर आणि शास्त्रात सांगितलेल्या विधीचं पालन करून आहार घ्यावा आणि या अग्नीचं प्रयत्नपूर्वक रक्षण करावं. कारण देह आणि देहबल यांचं अस्तित्व या अग्नीवरच अवलंबून आहे.
म्हणजे आपल्याला कुठल्याही आजाराशी लढण्याचं उत्तम व्याधिक्षमत्व हवं असेल तर आपल्याला अग्नीचा आदर करायला, त्याची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे. त्याचा अवमान करून मनाला हवा तसा, जिभेचे चोचले पुरवणारा आहार घेऊन चालणार नाही.
मग आता या अग्नी रक्षणाचे उपाय काय आहेत ते बघूया.
- भूक लागल्यावरच जेवावं. भूक नसेल तर हलका आहार घ्यावा किंवा लंघन करावं.
- कधीही पोटभर जेवू नये. अन्नाचे पचन होण्यासाठी थोडी जागा रिकामी ठेवावी. जेवणानंतर हसणं, चालणं, वाकणं, बोलणं, बसणं या क्रिया करणं अवघड जाणार नाही इतकंच जेवावं.
- गोड पदार्थ पचायला जड असतात. म्हणून ते जेवणाच्या सुरुवातीला म्हणजे भूक चांगली असताना खावेत. जेवणानंतर स्वीट डीश हे पचनशक्तीला ओव्हरटाईम करायला लावण्यासारखं आहे.
- कॅलरीज, प्रोटीन्स, सॅच्युरेटेड/अनसॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन्स यांच्या अगम्य आणि अव्यवहार्य जंजाळात न अडकता; षड्स आहार घ्यावा. गोड, आंबट, तिखट, खारट, कडू आणि तुरट या सहाही चवींनी युक्त आहार शरीराचं योग्य पोषण करण्यास समर्थ असतो.
- आपल्या पणजी/ पणजोबा यांनी खाल्लेले पदार्थ आहारात ठेवावे. त्यांनी न खाल्लेले पदार्थ नियमित खाऊ नयेत. उदाहरणार्थ वडापाव, नुडल्स, आईस्क्रीम, पास्ता, बर्गर वगैरे.
- आहार नेहमी उष्ण, ताजा (शिजवल्यानंतर तीन तासाच्या आत), स्निग्ध असावा.
- शांत चित्तानं, जमिनीवर बसून, गप्पा न मारता, खूप सावकाश नाही आणि खूप भरभर नाही अशा पद्धतीने जेवावं.
- जेवताना टीव्हीसमोर बसू नये. त्यावरील चित्रे बघत असताना मन शांत राहात नाही. अन्नाचा आस्वाद घेतला जात नाही. कधी कधी तर किती खाल्लं/ पोट भरलं की नाही याकडे देखील लक्ष राहात नाही.
- मोड आलेली कच्ची कडधान्यं रोज खावू नयेत. ती रुक्ष, वातूळ आणि पचायला जड असतात. कडधान्ये ही नेहमी शिजवून आणि तेला/ तुपाचा वापर सढळ हस्ते करूनच (तर्री युक्त) खावी.
- पालेभाज्या या अल्पायुषी असल्यानं रोज खाऊ नयेत. भारतीय पारंपरिक आहारात तंतुमय पदार्थ पुरेशा प्रमाणात असतात. फक्त मांसाहार घेणाऱ्या पाश्चात्त्य लोकांसाठी त्यांची गरज आहे आणि तिथंच असे शोध लागतात. ते जसेच्या तसे उचलून आपल्याला लागू करायचे नसतात. कधीतरी खाताना त्या वाफवून, पिळून, मग फोडणी देऊन खाव्या. रोज पालेभाजी सेवन हे शुक्र, ओज, बल, नेत्र यांना घातक ठरू शकतं.
- संध्याकाळचं जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यावं. आपल्या पोटातील पाचक स्रावांचं काम सूर्याभिमुख असतं. सूर्य मावळला की, अन्न पचवायला कोणीही मदत करू शकत नाही. म्हणूनच ‘दिव्यात वात, तोंडात हात’ अशी म्हण आहे. आज सरसकट सगळे जण रात्री नऊनंतर जेवतात आणि ते पचतं असा गैरसमज पोसतात. वास्तविक त्या आहाराचं योग्य पचन न झाल्यानंच डायबेटीस, हृदयविकार, स्थौल्य, दमा इत्यादी आजारांचं प्रमाण वाढलेलं दिसतं.
- आपल्या देशात ( २५ ते ५० कि. मी. परिसरात) नैसर्गिकरित्या येणारी पिकं ( धान्य, फळे, भाज्या इत्यादी) आपल्यासाठी आवश्यक, हितकर आणि पुरेशी असतात. विशिष्ट प्रदेशातील हवामानाला आवश्यक पदार्थ निसर्गतःच त्या भागात पिकत असतात. त्यामुळे परदेशी भाज्या आणि फळे यांच्या नादी लागू नये. आपल्या जमिनीत ती पिकवणं म्हणजे तर आपल्यासोबत निसर्गाच्याही आरोग्यावर घाला घालणं आहे.
- भारतीय वंशाच्या गायीचं दूध हे पूर्णान्न आहे. मात्र डेयरीचे दूध तसं नाही. त्यामुळे आपल्या गायीचं दूध उपलब्ध नसल्यास, मुलांना पिशवीतलं दूध बळजबरीने पाजू नये. आपण देखील पिऊ नये.
- ज्या ऋतूंमध्ये ज्या भाज्या/ फळे येतात ती खावी. उगीच बारमाही आंबा वगैरे खाणं चुकीचं आहे. एक तर इतर ऋतूत ती फळे उत्तम गुणांनी युक्त नसतात आणि त्या ऋतूत ती शरीराला आवश्यक देखील नसतात.
- ऊठसूट कुठल्याही आजारात, वजन किंवा कोलेस्टेरॉलच्या भीतीने तेल-तूप बंद करू नये. शरीर ही रोज झिजणारी गोष्ट आहे. ती झीज नियंत्रित करण्यासाठी स्नेहाची अत्यंत आवश्यकता असते.
- भारतीय गायीचं लोणी/तूप हे उत्तम पाचक, स्मरणशक्ती आणि बलवर्धक, दृष्टिदायक आहे. विद्यार्थ्यांना ते अवश्य द्यावं.
- लाकडी घाणीचं किंवा फिल्टर्ड तेल रोजच्या स्वयंपाकाला वापरावं. हे तेल तीळ, शेंगदाणे किंवा खोबऱ्याचं असावं. अन्य तेलांच्या भानगडीत पडू नये.
- जेवणानंतर शतपावली करावी. वज्रासनात बसावं. नागवेलीचं पान, चुना, कात, लवंग, कापूर, वेलदोडा युक्त विडा खावा.
- दुपारी जेवल्यानंतर झोपू नये. डाव्या कुशीवर पडून विश्रांती घ्यावी. जेवणानंतर कष्टाची कामं करू नयेत.
- संध्याकाळचं जेवण आणि झोप यात कमीतकमी तीन तासांचं अंतर असावं.
- रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावं. आपल्याला आवश्यक असलेली झोप रात्रीच घ्यावी.
- भूक वाढणं, अन्नपचन सुधारणं आणि आरोग्य उत्तम
व्याधिक्षमत्व
राखणं यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. नियमित भरपूर शारीरिक कष्ट किंवा व्यायाम करणाऱ्या लोकांनी वरील नियम कधीतरी मोडले तरी त्यांना त्रास होत नाही. व्यायाम न करणाऱ्या लोकांनी मात्र आहाराचे नियम पाळले नाहीत तर अग्नी बिघडू आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते.
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
‘वैश्वनराच्या रूपात मी सर्व प्राण्यांच्या शरीरात राहतो’ ही भगवंतांची प्रतिज्ञा आहे. त्यांच्या त्या रूपाचा आदर करून आपण आपलं अग्निबल, शरीरबल आणि व्याधिक्षमत्व उत्तम राखावं हेच श्रेयस्कर !
वैद्य. सुचित्रा कुलकर्णी
स्वस्ति आयुर्वेद,
नौपाडा, ठाणे
९३२२७९००४४
vaidyasuchitra.kulkarni@gmail.com
(व्यास क्रिएशनच्या आरोग्यम दिवाळी २०२० च्या अंका मधून)
Leave a Reply