नवीन लेखन...

पैली ते सात्वी

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये डॉ. महेश केळुसकर यांनी लिहिलेला हा लेख


इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वडीलांकडून आणि आमच्या गुरुजींकडून मी जो मार खाल्लाय, तो मी कधी जन्मात विसरणार नाही. या माराने मला जीवन शिक्षणाचे पहिले धडे दिले. आमच्या मराठी शाळेचे नावच मुळी होते, ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर.’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट या गावातली ही प्राथमिक शाळा अख्ख्या पंचक्रोशीत गाजलेली. का? तर या शाळेचे जे मुख्याध्यापक होते, त्यांची शिस्त, विद्यार्थ्यांवरील त्यांचं प्रेम, गरीब पोरांबद्दलचाच नव्हे तर त्यांच्या पालकांबद्दलचा कळवळा, परोपकारी स्वभाव सगळ्या तालुक्यालाच माहीत होता. त्यांचं नाव अ. ला. सावंत गुरुजी. आम्ही त्यांना गुरुजी म्हणायचो. पण सगळा गाव अला मास्तर म्हणून ओळखायचा.

पांढरा शुभ्र लेहेंगा, पांढरा नेहरू शर्ट, डोळ्यांवर चष्मा, तरतरीत चालताना खांद्यावर खाकी कापडी पिशवी आणि मोठी छत्री, मूळची गोरी अंगकांती उन्हात फिरून रापलेली असे आमचे अला गुरुजी पटेलवाडीतून ते चार किलोमीटर्स चालत शाळेत यायचे, परत संध्याकाळी शाळा सुटल्यावर गावातली आपली कामं आटोपून चालत घरी जायचे. जाताना त्यांच्या एका हातात चार सेलची मोठी बॅटरी असायची. त्या बॅटरीचा हलता उजेड मला अजून आठवतो…

गुरुजींकडे एक जुनी सायकलही होती. अधूनमधून ते सायकलवर दिसायचे. पण त्यांचं पायी चालणंच अधिक फेमस होतं. त्यांनाही चालत फिरणंच आवडत असावं. कारण चालता चालता मधे सतरा वेळा थांबून वाटेत भेटलेल्यांची जिव्हाळ्यानं चौकशी करणं आणि लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचं काम स्वत:हून अंगावर घेणं त्यांना शक्य व्हायचं. कुणाला पाय मुरगळल्यावर औषध सुचव, कुणाला आर.आय.एट बियाणं कुठं मिळेल ते सांग, तर कुणाच्या मुलीसाठी कुठल्या घरी योग्य स्थळ मिळेल याचा सल्ला दे असे गुरुजींचं सारखं सुरू असायचं. शाळेतल्या निवडक मुलांना स्कॉलरशिप्सच्या परीक्षांना बसवून, त्यांच्यासाठी ज्यादा क्लास घेऊन, त्यांना आपल्या खिशातले पैसे खर्च करून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या गावी घेऊन जाणे आणि परत घरी आणून सोडणे, हे तर गुरुजी आपलं कर्तव्यच मानायचे.

या सगळ्यामुळे व्हायचं काय की गुरुजींनी काही चूक झाल्यावर फाडकन मुस्कटात मारली तरी घरी सांगायची कुठल्या पोराची बिशाद नव्हती. कारण घरी दुप्पट मार मिळायची भीती नाही तर अगदी खात्रीच असायची. “अला गुरुजी वगीच मारुच्ये नाय… सांग काय केलंस सांग आदी…” असं दरडावत पालक आपल्या मुलांना असे काही धपाटे घालायचे की बोलता सोय नाही.

तर सांगायचा मुद्दा काय की आमचं बालपण रम्य ते होतंच, पण ‘मारम्य’ही होतं. जीवन शिक्षण विद्यामंदिर, फोंडाघाट शाळा क्र. १ मध्ये मी पहिली ते सातवी शिकलो. पहिली ते तिसरी पाटी-पेन्सिल होती. इयत्ता चौथीत गेल्यावर कित्ता गिरवण्यासाठी, अक्षर सुधारण्यासाठी बोरू आणि शाईची दौत घ्यायला लागली. पाचवीत गेल्यावर शाईचं फौंटन पेन वापरायची परवानगी मिळाली. आमच्या शाळेसमोर एक पिंपळाचं झाड होतं आणि त्याभोवती दगडी पार बांधलेला होता. आम्ही पाटीवर लिहण्याच्या पेन्सिलींना त्या पारावरच्या दगडावर घासून टोकं काढायचो. प्रत्येक पोराच्या खिशात मोडलेल्या पेन्सिलींचे दहा-वीस तुकडे असायचे. कित्ता गिरवायला बाजारात स्टेशनरीच्या दुकानांमध्ये बोरू मिळायचे. पण पोरं शक्यतो आपापल्या घरांसमोरचे चिवे (लहान बांबू) तोडून घरच्या मोठ्या माणसांकडून बोरू तयार करून घ्यायचे. दोन पैशांना एक निळ्या शाईची पुडी मिळायची. रीतसर दौत बाटल्या दोघा-चौघांकडेच असायच्या. बाकीची पोरं घरात मिळेल त्या रिकाम्या बाटलीत शाई खलवून दौती तयार करायची. दौतीला घट्ट सुतळ बांधलेली. पण अर्ध्याअधिक पोरांच्या चड्डयांवर, शर्टावर शाईचं रंगीत काम झालेलं असायचं. युनिफॉर्म वगैरे प्रकार नव्हता. शाळेतलेच कपडे घरी वापरावे लागायचे किंवा मग घरी बहुतेक पोरं उघडीच राहायची. कपड्यांवर शाईचे डाग पाडून आल्यावर घरी आया बोंबलायच्या, मार द्यायच्या, पण कपडे धुवून, सुकवून पुन्हा शाळेत पाठवायच्या. पावसाळ्यात कपडे सुकत नसत. मग आम्ही अर्ध्या ओल्या, अर्ध्या सुक्या चड्डया नि शर्ट तसेच घालून वर्गात बसायचो. पाठीला, मांड्यांना खाज यायची पण तिकडं हात गेला तर डोसक्यात डस्टर नेम धरून बसलीच म्हणून समजा.

अला गुरुजी मुख्याध्यापक होते. पण मनात आलं की ते कुठल्याही वर्गावर जायचे. शुद्धलेखन घालायचे किंवा फळ्यावर गणित मांडून निघून जायचे. बसा सोडवत. एकदा ते आमच्या तिसरीच्या वर्गावर आले. पाच ओळींचं शुद्धलेखन घातलं. एक वाक्य झालं की ते ‘पूर्णविराम’ म्हणायचे. सगळ्या पोरांचं पटापट लिहून झालं. मी तिसऱ्या ओळीवरच अडलेलो. वाक्य लक्षात ठेवून शेवटी शुद्धलेखन पूर्ण केलं. माझा नंबर आल्यावर गुरुजींनी माझी पाटी हातात घेतली.बघितली नि कधी नव्हे ते गुरुजी खो खो हसायला लागले. शेजारच्या वर्गातून आणखी दोन शिक्षकांना त्यांनी बोलावलं नि मग माझी पाटी बघून तेही हसायला लागले. पोरांना कळेना की सगळे गुरुजी एवढं कशाला हसताहेत.

“ये, इकडे ये बाबा…”माझे पाय लटपटायला लागले. आता मार बसणार या भीतीनं. गुरुजींनी पाटीवरच सगळं वाचायला सांगितलं. प्रत्येक वाक्यानंतर मी ‘पूर्णविराम’ असंही वाचत होतो. कारण मी गुरुजींचे शब्द अगदी ‘अक्षरशः’ लिहून घेतले. वाचन झाल्यावर मग गुरुजी हसत माझ्या पाठीवर एक धपाटकी, हाणत म्हणाले, “गाढवा, पूर्णविराम हे विरामचिन्ह असतं. वाक्य पूर्ण झाल्यावर ते चिन्ह नुसतं लिहायचं असतं. काय रे तुम्हाला मराठी कोण शिकवतात?”

“इरकुळकर गुरुजी…’ सगळा वर्ग.

“विरामचिन्ह शिकवली नाहीत?”

“शिकवली गुरुजी…” सगळा वर्ग.

“तू गैरहजर होतास का रे त्या दिवशी? मी गप्प राहिलो. त्या दिवशी मी गैरहजरच असणार. त्याशिवाय का इतकी फजिती होती माझी…पण गुरुजी एवढे मोठ्या मनाचे नि प्रेमळ की त्यांनी माझ्यासाठी पूर्ण वर्गाला पुन्हा एकदा सोदाहरण विरामचिन्ह शिकवली. त्यानंतर सहसा माझ्याकडून मराठी लिहिताना विरामचिन्हांच्या चुका झाल्या नाहीत.

अमुक हौदातून तमुक पाणी सोडलं नि ढमुक हौदातून अमुक हौदात इतकं इतकं पाणी सोडलं या टाईपची गणितं मात्र मला कधीच जमली नाहीत. चक्रवाढ व्याजाची गणितं गुरुजींनी घातली की मी शुंभासारखा ढिम्म बसून राहायचो. माझे वडील लाखांच्या बेरजा-वजाबाक्या, गुणाकार-भागाकार क्षणार्धात करायचे. ते पंचक्रोशीतल्या सगळ्या व्यापाऱ्यांचे अकाऊंट्स लिहायचे. सेल्स टॅक्स, इन्कमटॅक्सच्या कामांसाठी माझ्या वडीलांशिवाय व्यापाऱ्यांचं पान हालायचं नाही. खुद्द फोंडा गावातच जे पंधरा-वीस बड़े व्यापारी होते ते दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी भाऊ केळुसकरांनी चोपड्यांना गंधाक्षता लावल्याशिवाय पुढचे मंत्रोपचार भटजींना सुरू करायला द्यायचे नाहीत. त्या रात्री गोड बत्ताश्यांनी आम्हा भावंडांचे खिसे भरून जायचे. अशा वडीलांचा मी मोठा मुलगाआणि माझं गणिताचं घोडं पेंड खात बसलेलं पाहून गुरुजींना राग येणार नाही तर काय? सटासट पट्ट्या बसायच्या हातावर. घरी पण मार मिळायचा. मात्र गणितात कच्चा राहण्याची जिद्द मीही शेवटपर्यंत सोडली नाही.

मराठी कविता म्हणायला नि नाटुकल्यांमध्ये भाग घ्यायला आणि खणखणीत भाषण करायला मात्र मी सगळ्यांच्या पुढं असायचो. इयत्ता चौथीत असताना संपूर्ण मनाचे श्लोक बिनचूक म्हटल्याबद्दल मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. (आता म्हणायला सांगू नका पण…) शाळेला लागूनच मारुतीचं देऊळ. दर शुक्रवारी संध्याकाळी शाळा सुटल्यावर, आम्ही विद्यार्थ्यांना ते सारवायला लागायचं. देवळात इयत्ता पहिली ते चौथी असे चार वर्ग बसायचे. शनिवारी सकाळी प्रार्थनेचा वेळ मोठा असायचा. अला सावंत गुरुजी स्वत: हार्मोनियमवर असायचे. पहिल्यांदा प्रार्थना. मग दिनदर्शिका आणि सुविचार वाचन. त्यानंतर बातमीपत्राचं वाचन. ही बातमीपत्रं आम्हाला स्वत:च लिहायला, आणि वाचायला लागायची. असे आम्ही चार-पाच निवडक विद्यार्थी न्यूज रीडर्स’ होतो. बातम्या जुन्या असल्या तरी चालत. कुठल्याही रद्दीतल्या वर्तमानपत्रातल्या जशाच्या तशा उचलून आणलेल्या असल्या तरी चालत. पण दर शनिवारी बातमीपत्र वाचनाचा कार्यक्रम चुकत नसे. आमच्या गावात त्या काळी फक्त तीन-चार व्यापाऱ्यांकडेच वर्तमानपत्र यायचं. कुणाकडे ‘पुढारी’, तर कुणाकडे ‘सत्यवादी.’ बस्स! आम्हाला ताजी वर्तमानपत्रं कुठून मिळणार? मग मी जायचो नामा नेरूरकरांच्या हॉटेलात. तिथे वर्तमानपत्रांच्या रद्दी कागदातून दिलेला शेवचिवडा खाऊन लोकांनी ते कागद फेकले की मी गोळा करायचो. घरी आणायचो. भाग घ्यायला आणि खणखणीत भाषण करायला मात्र मी सगळ्यांच्या पुढं असायचो. इयत्ता चौथीत असताना संपूर्ण मनाचे श्लोक बिनचूक म्हटल्याबद्दल मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. (आता म्हणायला सांगू नका पण…) शाळेला लागूनच मारुतीचं देऊळ. दर शुक्रवारी संध्याकाळी शाळा सुटल्यावर, आम्ही विद्यार्थ्यांना ते सारवायला लागायचं. देवळात इयत्ता पहिली ते चौथी असे चार वर्ग बसायचे. शनिवारी सकाळी प्रार्थनेचा वेळ मोठा असायचा. अला सावंत गुरुजी स्वत: हार्मोनियमवर असायचे. पहिल्यांदा प्रार्थना. मग दिनदर्शिका आणि सुविचार वाचन. त्यानंतर बातमीपत्राचं वाचन. ही बातमीपत्रं आम्हाला स्वत:च लिहायला, आणि वाचायला लागायची. असे आम्ही चार-पाच निवडक विद्यार्थी न्यूज रीडर्स’ होतो. बातम्या जुन्या असल्या तरी चालत. कुठल्याही रद्दीतल्या वर्तमानपत्रातल्या जशाच्या तशा उचलून आणलेल्या असल्या तरी चालत. पण दर शनिवारी बातमीपत्र वाचनाचा कार्यक्रम चुकत नसे. आमच्या गावात त्या काळी फक्त तीन-चार व्यापाऱ्यांकडेच वर्तमानपत्र यायचं. कुणाकडे ‘पुढारी’, तर कुणाकडे ‘सत्यवादी.’ बस्स! आम्हाला ताजी वर्तमानपत्रं कुठून मिळणार? मग मी जायचो नामा नेरूरकरांच्या हॉटेलात. तिथे वर्तमानपत्रांच्या रद्दी कागदातून दिलेला शेवचिवडा खाऊन लोकांनी ते कागद फेकले की मी गोळा करायचो. घरी आणायचो. मग ठळक ठळक बातम्या निवडून त्या जशाच्या तशा थोडक्यात लिहून काढायचो. कधी कधी वडीलांनी व्यापाऱ्यांच्या दुकानातून रात्री घरी आणलेल्या पेपरांमधून बातम्या उचलायचो. त्यामुळे माझ्या बातमीपत्रात शिळ्या आणि ताज्या बातम्यांचा अपूर्व संगम व्हायचा. शुक्रवारी रात्री. मग शनिवारी उत्साहानं बातमीपत्र वाचताना मजा यायची. गुरुजींची शाबासकी मिळायची. वर्गांमधल्या पोरांनी वर्गणीतून आणलेला नारळ मारुतीरायाला मानवून फोडल्यावर सगळ्यांना खोबऱ्याच्या शिखणीचा प्रसाद मिळायचा. त्या खोबऱ्याची चव अजून जीभेवर आहे.

आमच्या वर्गात आम्ही दोघे-चौघे त्यातल्या त्यात हुशार विद्यार्थी म्हणून गणलो जायचो. पण वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने. कुमार नाडकर्णी, अजित पटेल, बापू आपटे आणि मी… आणि कधी कधी विनय सामंत… अशा आमच्या मैत्रीपूर्ण लढती व्हायच्या. हाणामाऱ्या पण बक्कळ असायच्या, वर्गात आणि वर्गाबाहेर. मोठी माणसं एकमेकांना शिव्या देताना, पुन्हा एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना आम्ही बघितलेलं असायचं. आम्ही भांडणांमध्ये त्या मोठ्यांची सही सही नक्कल करायचो. धमाल यायची. शाळेत असताना अस्सल पन्नासेक कचकचीत शिव्या मला तोंडपाठ होत्या. पण पुढे पुढे त्यांचा वापर कंजुषीने करत गेल्यामुळे तो मूळचा साठा आटत गेला. शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या शेताच्या रिकाम्या कुणग्यांमध्ये आम्ही हुतूतू, खोखो वगैरे खेळ खेळायचो. क्रिकेटला ‘बॅट-बॉल’ म्हणायचा. पण आम्हाला बारक्या पोरांना कोणी बोलिंग किंवा बॅटींग द्यायचे नाहीत. आम्ही त्यांचे फटकावलेले चेंडू धावत जाऊन परत आणून द्यायला मात्र आम्ही त्यांना लागायचो. लगोया आणि सूरपारंब्या खेळण्यात मात्र आम्ही पटाईत होतो. गावातल्या शिंप्याच्या मशीनखाली जमलेल्या चिंध्यांचे चेंडू बनवून आम्ही ते लगोरी आणि आबाधुबी खेळण्यासाठी वापरायचो.

बाजारात दहा पैशांना पाच गोट्या मिळायच्या. प्रत्येकाचा चड्डीचा खिसा गोट्यांनी भरलेला असायचा. विटीदांडूचा खेळही जोरात असायचा. शिवाय पोरांमध्ये ‘चिकोटी’ हा प्रकार फारच पाप्युलर होता. म्हणजे आपापल्या चड्डीच्या खिशात हात ठेवून तर्जन्या एकमेकांना चिकटवून चिकोटी धरायची. आठ किंवा पंधरा दिवसांसाठी. या अवधीत चड्डीच्या खिशातून हात काढलेल्या भिडूला दिसला तर ‘चिकोऽऽटी’ असं ओरडुन तो दुसऱ्याला दहा बुक्के हाणणार, सर्वांसमक्ष. तो हाणत असताना बाकीची पोरं ‘जोरात मार… जोरात मार…’ असा कल्ला करत चेकाळत टाळ्या पिटत राहणार. आमच्यासारख्या वेंधळ्या पोरांना असे चिकोटीचे बुक्के वारंवार खायला लागायचे. काजूबियांच्या दिवसात आम्ही सुक्या बिया जमवून जुगार खेळायचो किंवा एक कुणी तरी आपली काजूबी दहा फुटांवर एका पॉईंटवर ठेवायचा नि खेळणाऱ्याने नेम धरून दहा फूटांवरून त्या बीला ठोकून मारलं तर ती काजू बी त्याची व्हायची. नेम चुकला तर ती बी त्या पॉईंटवाल्याला. नेमबाजीत मी नाना पाटेकरपेक्षा भारी असल्यानं माझ्या दोन्ही खिशात खूप काजूबिया खुळखुळत असायच्या. जमलेल्या काजू बिया मग न्हाणीतल्या निखाऱ्यात घालून भाजून फोडणे नि मग काजूगर मटकावत राहणे, ही चैन असायची.

आमच्या गावची ‘उगबाई’ नदी डोंगरातून येऊन आमच्या शाळेच्या बाजूने वाहत जाऊन पुढे ‘झरियाला जाऊन मिळते. सुट्ट्यांच्या दिवसात या नदीत डुंबत राहायला खूप मजा यायची. ‘सावरीचा कोंड’ म्हणून एक खतरनाक खोल पाण्याची जागा नदीत होती. नदीच्या काठावर उभं राहून थोराड पोरं कोंडीत ‘सूर’ मारून पुन्हा वर येऊन पोशा पोशा अलिकडच्या काठावर येताना आम्ही अचंब्याने पाहत राहायचो. पावसाळ्यात नदीच्या रोरांवत येणाया लालभडक काळ्या गढूळ पाण्याचा आवाज अजूनही माझ्या कानात आहे. नदी अशी भडकली की आम्ही लहान मुलं चार हात दूरच राहायचो. पण आमच्या शाळेतली दांडगी पोरं ‘गरीला काडू (म्हणजे गांडुळ) लावून त्या तुफानी पाण्यात नदीतले ‘खवळ’ आणि ‘खडस’ मासे पकडीत तासन् तास गटवत राहायची.

आमच्या शाळेसमोरच्या रस्त्याच्या कोफ्यावर कोल्हापूरहून खाली कोकणात येणारे ऊस भरलेले ट्रक थांबायचे. ड्रायव्हर-क्लिनर चहाला दूर गेले की आम्ही ट्रकच्या मागे जाऊन उड्या मारून खाली लोंबकळणारे ऊस खेचून काढायचो नि पळून जाऊन दूर कुठेतरी उभे राहून वाटण्या करून कचाकचा दातांनी खायचो. एकदा ऊस काढण्यात दंग असताना मागून कुणीतरी माझी मानगूट पकडली. मी अख्खाच्या अख्खा वर उचलला गेलो नि वरून दाणकन खाली रस्त्यावर पडलो. कुल्ले असे काही झेंजरले नि त्या ड्रायव्हरच्या कोल्हापुरी अस्सल शिव्या अशा काही खाल्ल्या की पुढे कधीच ऊसाच्या ट्रकच्या जवळ जायची हिम्मत मी केली नाही.

मे महिन्यात सुट्ट्या पडल्या की सायकली घेऊन घाटात जायचो. तासाला २० पैसे भाडं होतं त्यावेळी. सातवीतली पोरं आम्ही जोसात सायकली हाणायचो. मग रस्त्याच्या कडेला सायकली लावून घाटातली बोरं, करवंदं, जांभळं, तोरणं, आटकं फस्त करायचो. डोंगरातून खाली -येणारं शुद्ध निर्मळ पाणी प्यायचो. मे महिन्यात दुसऱ्यांच्या झाडांवरच्या कच्च्या कैऱ्या चोरून ‘खिरमट’ करून मटकावायचो. आणखी एक नाद आम्हाला होता. एकजण घरातून गूळ आणायचा, दुसरा तिखट आणि मीठ. कैऱ्यांच्या फोडींना ते फासलं की झाली खिरमट तयार. अजूनही खिरमटीच्या आठवणीनं माझ्या तोंडाला पाणी सुटतं. असे ते बालपणीचे आंबट-गोड-खारट-तिखट दिवस!

– डॉ. महेश केळसकर

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..